राज्य सरकारने पुन्हा पसरले केंद्राकडे हात, 630 कोटींची मागणी

fund
fund

सोलापूर : राज्यातील कोकण विभागासह कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर आणि जळगाव, धुळे, नंदूरबार, नाशिक या जिल्ह्यांमधील तब्बल पाच लाख 70 हेक्‍टरवरील पिकांचे सुमारे एक हजार 995 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्‍त केला आहे. या पार्श्‍वभूमीवर दुष्काळ निधीनंतर आता राज्य सरकारने पुन्हा केंद्राकडे मदतीचे हात पसरले असून, 630 कोटी 70 लाखांच्या मदतीचा प्रस्ताव तयार केल्याचे सूत्रांनी सांगितले. 

दरम्यान, मुंबईसह कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांमधील दमदार पावसामुळे कृष्णा, भिमा, नीरा, पंचगंगा, गोदावरी, तापी या नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे दुष्काळाशी सामना करीत पावसाच्या आशेवर लागवड केलेल्या पिकांचे पूरामुळे मोठे नुकसान झाले आहे. आता जगावे की मरावे अशी स्थिती बळीराजावर ओढावल्याचे चित्र असतानाही राज्य सरकारकडून पंचनाम्याची प्रतीक्षा केली जात आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी मदत करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने केंद्राकडे एनडीआरएफ मधून निधीची मागणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, केंद्राकडून निधी मिळाल्याशिवाय शेतकऱ्यांच्या पदरात नुकसान भरपाई पडणार नाही. कोरडवाहू पिकांसाठी हेक्‍टरी सहा हजार 800 तर बागायती पिकांसाठी 13 हजार 500 आणि बहूवार्षिक पिकांसाठी 18 हजारांप्रमाणे मदत करावी, असा सूर अधिकाऱ्यांच्या बैठकीत निघाला. मात्र, प्रत्यक्षात किती मदत करायची अद्याप ठरले नसून केंद्राकडून निधी आल्यावरच ते ठरेल, असे मदत व पुनवर्सन विभागाकडून सांगण्यात आले. 
 

राज्यातील नुकसानीची स्थिती 
क्षेत्र बाधित 
5.70 लाख हेक्‍टर 
नुकसानग्रस्त जिल्हे 
11 
प्रत्यक्षातील नुकसान 
1,995 कोटी 
केंद्राकडे मदतीची मागणी 
630.70 कोटी 


राज्यातील पुरामुळे नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे करुन तत्काळ अहवाल पाठविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. काही भागातील पूर अद्याप ओसरला नसल्याने पंचनामे करण्यास विलंब लागत आहे. पंचनाम्यातील नुकसानीनुसार राज्य सरकार एनडीआरएफमधून केंद्राकडे निधीची मागणी करेल. 
- सुभाष उमराणीकर, उपसचिव, मदत व पुनवर्सन विभाग, मुंबई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com