आणि मजूर लिंगाप्पा बनले पाहुणे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 मे 2019

कोल्हापूर - एरवी खड्डे खणणारे, ट्रॉलीत माती भरणारे, बांधकामावर पाणी मारणारे लिंगाप्पा भागोजी आज चक्क पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शेजारी व्यासपीठावर बसले होते. आमदार सतेज पाटील यांच्यासोबत नारळ फोडून त्यांनी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंटच्या इमारतीचे उद्‌घाटन केले.

कोल्हापूर - एरवी खड्डे खणणारे, ट्रॉलीत माती भरणारे, बांधकामावर पाणी मारणारे लिंगाप्पा भागोजी आज चक्क पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शेजारी व्यासपीठावर बसले होते. आमदार सतेज पाटील यांच्यासोबत नारळ फोडून त्यांनी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंटच्या इमारतीचे उद्‌घाटन केले.

अर्धी विजार, सदरा आणि खांद्यावर पंचा टाकलेल्या लिंगाप्पांना व्यासपीठावर प्रमुख पाहुण्यांच्या भूमिकेत पाहून उपस्थितांना आश्‍चर्याचा धक्का बसला. संस्थेचे संस्थापक शरद सामंत यांनी या छोट्या कृतीमधून श्रमप्रतिष्ठेचा सन्मान केला.

नागाळा पार्क येथे विवेकानंद महाविद्यालयासमोर महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट या संस्थेची इमारत उभी राहिली आहे. आज याचे उद्‌घाटन करण्यात आले. उद्‌घाटनासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सतेज पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार उपस्थित होते. 

प्रास्ताविक झाल्यावर अचानक शरद सामंत माईकसमोर आले आणि म्हणाले, ‘‘ज्यांनी भूमिपूजनाची पहिली कुदळ मारली, गेली ३७ वर्षे कष्ट करून त्यांनी श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली, अशा लिंगाप्पा भागोजी यांच्या हस्ते आपण इमारतीचे उद्‌घाटन करणार आहोत.’’ असे सांगून सर्व मान्यवर इमारतीच्या फलकाकडे गेले. तेथे त्यांनी लिंगाप्पा यांच्या हस्ते श्रीफळ फोडून इमारतीचे उद्‌घाटन केले.

त्यानंतर सर्व मान्यवर व्यासपीठावर स्थानापन्न झाले. सवयीप्रमाणे लिंगाप्पा समोर मांडलेल्या सर्वांत शेवटच्या खुर्चीवर जाऊन बसले; पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांना हाक मारून बोलावले आणि शेजारील खुर्चीवर बसवले. त्यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या. यावेळी लिंगाप्पा यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. शरद सामंत यांच्या एका छोट्याशा कृतीने श्रमप्रतिष्ठेचा सन्मान केला.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Institute of research and development building inauguration