'राजकीय मनोवृत्तीतून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

कन्नड भाषेला वचन साहित्य देऊन कन्नड समृद्ध केलेल्या महात्मा बसवेश्वरांची मंगळवेढा ही कर्मभूमी आहे. त्यांच्या कर्मभूमीत त्यांचे स्मारक करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जमिनीबाबत ठराव केला आहे. लवकरच त्यांचे स्मारक बनविण्यात येईल.
- विजयकुमार देशमुख, पालकमंत्री व संमेलन स्वागताध्यक्

सोलापूर : कृष्णा-भीमेचे पाणी, सिद्धरामेश्वर-बसवेश्वर, भाषा, संस्कृती आणि परंपरा या माध्यमातून कर्नाटक आणि महाराष्ट्राचे चांगले संबंध आहेत; पण राजकारणाच्या स्वार्थासाठी सौहार्दाचे वातावरण गढूळ करण्याचे काम काही मनोवृत्तींकडून होत आहे. ही दुर्दैवी बाब आहे. वाद-विवाद करण्यात काहीच अर्थ नाही. काही स्वार्थी राजकीय मनोवृत्तींमुळे भाषा व सीमावाद निर्माण होत असल्याचे मत कर्नाटकचे जलसंपदा मंत्री एम. बी. पाटील यांनी व्यक्त केले.

कन्नड साहित्य परिषदेअंतर्गत महाराष्ट्र कन्नड साहित्य परिषद शाखेतर्फे हुतात्मा स्मृती मंदिरात सुरू असलेल्या पहिल्या कन्नड साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन एम. बी. पाटील यांनी केले. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख होते. या वेळी संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. बी. बी. पुजारी, भालकी मठाचे डॉ. बसवलिंग पट्टदेवरू, होटगी मठाचे उत्तराधिकारी डॉ. मल्लिकार्जुन महास्वामी, कन्नड साहित्य परिषदेचे राजाध्यक्ष डॉ. मनू बळीगार, खासदार शरद बनसोडे, महापौर शोभा बनशेट्टी आदी उपस्थित होते.

कन्नड भाषेला वचन साहित्य देऊन कन्नड समृद्ध केलेल्या महात्मा बसवेश्वरांची मंगळवेढा ही कर्मभूमी आहे. त्यांच्या कर्मभूमीत त्यांचे स्मारक करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जमिनीबाबत ठराव केला आहे. लवकरच त्यांचे स्मारक बनविण्यात येईल.
- विजयकुमार देशमुख, पालकमंत्री व संमेलन स्वागताध्यक्ष

आठव्या व नवव्या शतकात इंग्रजी भाषा बाल्यावस्थेत होती. त्यापूर्वी तर इंग्रजी अक्षरशः रांगत होती; मात्र जागतिकीकरणामुळे ही भाषा ज्ञानभाषा झाली आणि सगळ्या प्रादेशिक भाषांना अवकळा आली. इंग्रजीच्या मागे लागून आपली संस्कृती आणि भावना विसरू नका, मातृभाषेतूनच शिक्षणासाठी आग्रह धरा.
- मनू बळीगार, राजाध्यक्ष, कन्नड साहित्य परिषद

संमेलनामुळे धैर्य वाढते, बळ येते. सांस्कृतिक चळवळ वाढू लागते. साहित्यात डोके खराब न करण्याचे सामर्थ्य आहे. लिहिणे हे पुढच्या पिढीसाठी देणगी असून, सगळ्यात जास्त दिवाळी अंक मराठीतून निघतात आणि सगळ्यात जास्त वृत्तपत्र मराठीत आहेत. वाचकही कन्नडच्या तुलनेत महाराष्ट्रात आहेत.
- प्रा. डॉ. बी. बी. पुजारी, संमेलनाध्यक्ष

Web Title: 'Maharashtra-Karnataka borderism' through political mindset