महाराष्ट्र क्रांती सेनेचे उमेदवार २३ रोजी जाहीर करणार - सुरेश पाटील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

गडहिंग्लज - महाराष्ट्र क्रांती सेनेतर्फे कोल्हापूर लोकसभेसह चंदगड, कागल व राधानगरी विधानसभा निवडणूक लढविणार आहे. त्यादृष्टीने पक्षाचा संपर्क दौरा सुरू असून, महत्त्वाच्या उमेदवारांशीही सकारात्मक चर्चा झाली आहे. २३ डिसेंबरच्या येथील मेळाव्यात नावेही जाहीर करणार असल्याची माहिती पक्षप्रमुख सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पाटील म्हणाले, ‘‘सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन जाणारा हा पक्ष येणाऱ्या निवडणुकीत होतकरू, नवखा आणि जनमाणसात मिसळणारा उमेदवार देणार आहे. संभाव्य उमेदवारांच्या गाठीभेटीसाठी दौरा सुरू केला आहे. पक्षात ५० टक्के महिलांना प्राधान्य आहे. त्यासाठी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या ग्रामीण जिल्हा महिला प्रमुखपदी लता पालकर, तर उपप्रमुखपदी दीपाली कंग्राळकर यांची निवड केली आहे. संपर्क मोहीम झाल्यानंतर ८ डिसेंबरला नाशिक, २३ डिसेंबरला गडहिंग्लज आणि २४ डिसेंबरला कोकणात विभागीय मेळावे घेऊन उमेदवारांची नावे जाहीर करू.’’

मराठा आरक्षणाबाबत ते म्हणाले, ‘‘सरकारने दिलेले आरक्षण योग्य आहे. परंतु, ते कायद्याच्या कसोटीवर टिकते की नाही, हे १५ दिवसांत कळेल. न्यायालयात त्याला स्थगिती मिळाल्यास पुन्हा नव्याने संघर्ष करून राज्य व केंद्राची परवानगी घ्यावी लागेल. क्रांती सेनेबरोबर ५० टक्के मराठा समाज आहे. समाजात विविध संघटना असल्या तरी त्यांच्यासह सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन जाणार आहे.’’

यावेळी जिल्हाप्रमुख परेश भोसले, भरत पाटील, मोहन मालवणकर, संतोष कांदेकर, चंद्रकांत पाटील, आशा देवार्डे, विनायक कलढोणे, संदीप गोटे, शिवाजी नरके आदी उपस्थित होते.

गडहिंग्लजचा आमदार हवा
पाटील म्हणाले, ‘‘कागल विधानसभा मतदारसंघात गडहिंग्लजचाही भाग आहे. क्रांती सेनेतर्फे कागलचा आमदार हा गडहिंग्लजचा असावा, असा प्रयत्न आहे. प्रत्येक कामासाठी जनतेला कागलला जावे लागते. यात वेळ जाण्यासह त्रासही होतो. त्यासाठी गडहिंग्लजचाच आमदार व्हावा, अशी पक्षाची भूमिका आहे.’’

Web Title: Maharashtra Kranti Sena Suresh Patil Press