Republic Day 2020 : जाणुन घ्या... महाराष्ट्राचे चित्ररथ केव्हा नव्हते संचलनात

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 January 2020

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत हाेणारे पथसंचलनात गृहमंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयानं महाराष्ट्राच्या चित्ररथाला यंदा परवानगी नाकारली आहे. यामुळे मराठी रंगभूमीची 175 वर्षे या संकल्पनेवर साकारण्यात येणारा चित्ररथ यंदा दिसणार नाही. यापुर्वीही नऊ वेळा महाराष्ट्राचे चित्ररथ दिल्लीतील संचलनात नव्हते.

सातारा :  साऱ्या जगाचे लक्ष लागून राहणाऱ्या आपल्या देशाच्या प्रजासत्ताक दिनी (ता. 26 जानेवारी) दिल्लीतील राजपथावर होणाऱ्या संचलनात यंदा महाराष्ट्राचा चिरत्रथ असणार नाही. खरंतर चित्ररथाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती, शौर्याची परंपरा याचे दर्शन सर्वांना होत होते.

देशभरात स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत राजपथावर होणारे संचलन हे डोळ्याचे पारणे फेडणारे असते. या संचलनात लष्करी जवान, लष्काराचे बॅंड, विविध राज्यांच्या रथापूढे कलाकारांनी सादर केलेल्या लोककला, लोकनृत्य तसेच लष्कराच्या जवानांच्या मोटारसायकलवरील कवायती, विमानांचे चित्तथरारक उड्डाणे, त्यांचे हवेतील कसरती, लष्करातील अत्याधूनिक आयुधे, रणगाडे हे सारे संपुर्ण देश डोळ्यात साठवून ठेवत असतो. प्रतिवर्षी यासाठी सारेजण प्रजासत्ताक दिनाकडे डोळे लावून बसलेले असतात. देशाचे हे कौतुक पाहण्यासाठी देश-विदेशातील नागरीक दिल्लीत येत असतात. या संचलनाथ देशातील विविध राज्यांचे चित्ररथ सहभागी होत असतात.

यामध्ये महाराष्ट्र राज्याचा चित्ररथाचा देखील समावेश असतो. या चित्ररथाच्या माध्यमातून महाराष्ट्रने आपल्या इतिहासाची, संस्कृतीची, शौर्याची परंपरेचे दर्शन घडविले आहे. आजपर्यंत महाराष्ट्राने गणेशोत्सव, बापू स्मृती, हापूस आंबे, शताब्दी, पंढरीची वारी, शिवराज्याभिषेक, बैलपोळा असे चित्ररथ साकारले होते. त्यातील पंढरीची वारी आणि शिवराज्याभिषेक या संकल्पनेवर आधारित चित्ररथांनी प्रथम क्रमांक पटकाविला होता.

यापूर्वी सन 1972, 1987, 1989, 1996, 2000, 2005, 2008, 2013 तसेच 2016 या कालावधीत महाराष्ट्राचा चित्ररथाचा प्रजासत्ताक दिनी समावेश नव्हता. दरम्यान यंदा दोन अपवाद वगळले तर केंद्रात आणि राज्यात कॉंग्रेसचंच सरकार होतं. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच महाराष्ट्र आणि पश्‍चिम बंगाल यांना वगळले अशी टीका आत्ताच का होते आहे अशी चर्चा आणि प्रश्न राजकीय वर्तुळातून विशेषतः भाजपाच्या गाेटातून विचारले जात आहेत. 

चित्ररथांचा समावेशासाठी अशी असते प्रक्रिया... 

दरवर्षी विविध राज्यांतून प्रजासत्ताक दिनाच्या चित्ररथासाठी प्रवेशिका मागवल्या जातात. यंदा 56 पैकी 22 प्रस्तावांच निवड केल्याची माहिती केंद्रीय मंत्रालयाने नुकतीच दिली आहे. त्यामध्ये प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या सोहळ्यात महाराष्ट्र आणि पश्‍चिम बंगालचा चित्ररथांचा समावेश करण्यात आलेला नाही. परिणामी केंद्रीय नेतृत्वावर विरोधकांनी काही दिवसांपुर्वीच जोरदार हल्लाबोल केला. भाजपा विरहीत सरकार असलेल्या राज्यांना मुद्दामहून वगळण्यात आल्याचे म्हटले जात आहे. त्यावरुन बराच काळ वांदग देखील निर्माण झाला हाेता.

खासदार सुप्रिया सुळे, संजय राऊत यांनी महाराष्ट्राचा चित्ररथ नाकारण्याचा डाव असल्याचा आरोप केंद्रातील भाजप सरकारावर केला. त्यांच्या टीकेस भारतीय जनता पक्षाने देखील उत्तर दिले. भाजपाने ट्विटरच्या माध्यमातून त्यावेळी केंद्रात आणि राज्यात आमचे (भाजप) सरकार नव्हते असे ही म्हटले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Tableau Not In Republic Day Parade Marathi News