पृथ्वीराज चव्हाणांनी भेदले चक्रव्यूह I Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

अतुल भोसले यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देवून भाजपने ताकद दिली. मात्र, ती ताकद अपेक्षित यश खेचून आणू शकली नाही.

कराड - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण  हे कराड दक्षिण मतदारसंघातून  9 हजार 130 मतांनी विजयी झाले आहेत. चव्हाण यांना 92 हजार 296 मते मिळाली आहेत. भाजपचे अतुल भाेसले यांनी 83 हजार 166 तसेच अपक्ष उमेदवार उदयसिंह पाटील यांना 29 हजार 401 मते मिळाली आहेत. 

या मतदारसंघातून पृथ्वीराज यांना घरी बसविण्याची घोषणा करून, त्याच तयारीने विधानसभेच्या मैदानात उतरलेल्या भाजपला अपेक्षित यशापर्यंत पोचता आले नाही. त्यामागे अनेक कारणे असली तरी पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या विकासकामांसह त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला मतदारांनी पसंती दिल्याचे पुन्हा स्पष्ट झाले.

 
आमदार आनंदराव पाटील यांचा विरोध, कऱ्हाडच्या बहुतांश नगरसेवकांचा भाजपच्या अतुल भोसले यांना पाठिंबा, कॉंग्रसचेच ऍड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी केलेले बंड मतदारांनी मात्र साफ नाकारले. विरोधकांच्या चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूसारखी पृथ्वीराज चव्हाण यांची अवस्था होती. मात्र, चव्हाण यांनी तितक्‍याच भेदकपणे तो चक्रव्यूह भेदल्याचेही अधोरेखित झाले आहे.

 
माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना अडचणीत आणण्यासाठी भाजपने अतुल भोसले ताकदीनिशी रिंगणात उतरले. मात्र, आमदार चव्हाण यांच्या गटाने आव्हाने परतावून विजय खेचून आणला. आमदार आनंदराव पाटील यांनीही भाजपलाच ताकद पुरवली. कऱ्हाडच्या 33 पैकी 22 नगरसेवकांची भाजपला साथ मिळून, शहरी मतांमध्ये भर पडेल, अशी पक्षीय खेळी होती. मात्र, ती लोकांनी स्वीकारली नाही, असेच निकालातून दिसते. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी अन्यायाच्या भावनेने चव्हाण यांच्याविरोधात दंड थोपटून बंड पुकारले. पण, त्यांचाही फारसा करिष्मा चालला नाही. तिघांच्याही सभांना गर्दी होत होती. मात्र, त्या गर्दीचे मतात रूपांतर करण्याची किमया चव्हाण यांच्या व्यक्तिमत्तवामुळेच साधता आली. त्यामुळेच कॉंग्रेसचा बालेकिल्ला अशी कऱ्हाड दक्षिणची ओळख कायम राहिली.
 
पृथ्वीराज चव्हाण यांचे समर्थक आनंदराव पाटील प्रचारात नेहमी आघाडीवर असायचे. यावेळी त्यांनीही विरोध केला होता. भोसले यांच्या प्रचारासह त्यांचे पुत्र व पुतण्याने भाजपमध्ये प्रवेश केला होता. आनंदराव पाटील यांचे सारे सैन्य अतुल भोसले यांच्या प्रचारात होते. पण, त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. बंडखोरी करणारे उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनाही लोकांना स्वीकारल्याचे दिसत नाही. सरदार एकीकडे तर सैन्य पृथ्वीराज चव्हाणांकडे अशीच स्थिती मतदारसंघात होती.
 
पृथ्वीराज चव्हाण यांचे व्यक्तिमत्त्व, त्यांनी नव्याने बांधलेला गट, त्याची आखणी, विकास करताना प्रत्येक भागाला न्याय देण्याची घेतलेली भूमिका, ग्रामीण भागात पृथ्वीराज चव्हाण यांनी वाढवलेला संपर्क या सगळ्या गोष्टी मतदारांनी स्वीकारल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासारख्या नेत्यांच्या सभांचाही अतुल भोसलेंना फारसा उपयोग झाला नाही. भाजपने मोठी ताकद लावून पृथ्वीराज चव्हाण यांना कऱ्हाडलाच खेळवून ठेवण्याचा प्रयत्न केला. अतुल भोसले यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देवून भाजपने ताकद दिली. मात्र, ती ताकद अपेक्षित यश खेचून आणू शकली नाही. भाजपचे संघटन कौशल्य कमी पडले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election Karad South final result Congress Won