तासगाव : सुमनताई पाटील आघाडीवर | Election Results 2019

रवींद्र माने
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

तासगाव विधानसभा मतदारसंघ आर. आर. विरुद्ध संजय पाटील यांच्यातील कडव्या संघर्षामुळे राज्यात चर्चेत असे. या मतदारसंघात कवठेमहांकाळ आल्यापासून आर. आर. यांच्यासाठी ही निवडणूक सोपी झाली.

तासगाव - तासगावमध्ये दुसऱ्या फेरीत राष्ट्रवादीच्या सुमनताई पाटील यांनी १०४१५ मतांनी आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीत त्यांनी 5588 मतांची आघाडी घेतली.

दरम्यान सुमनताई पाटील यांना पहिल्या फेरीत त्यांना ९१२३ मते मिळाली तर शिवसेनेचे अजितराव घोरपडे यांना ३५३५ मते मिळाली आहेत. बसपचे उमेदवार शंकर माने यांना १३९, बाळासाहेब पवार 68, अपक्ष सुमनताई पाटील १५९ मते मिळाली आहेत. 

तासगाव विधानसभा मतदारसंघ आर. आर. विरुद्ध संजय पाटील यांच्यातील कडव्या संघर्षामुळे राज्यात चर्चेत असे. या मतदारसंघात कवठेमहांकाळ आल्यापासून आर. आर. यांच्यासाठी ही निवडणूक सोपी झाली. मात्र आता खासदार संजय पाटील तासगावमधून आणि कवठेमहांकाळमधून अजितराव घोरपडे यांच्या महायुतीपुढे नवख्या आमदार सुमन पाटील यांना सामोरे जायचे आहे.

आर.आर. यांच्या निधनामुळे झालेली पोटनिवडणूक सहानुभूतीच्या लाटेतील होती. आता मात्र सुमन पाटील यांची परीक्षा पाहणारी ही निवडणूक असेल. त्यांच्यासमोर अजितराव घोरपडेंनी कडवे आव्हान दिले आहे.

विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता संपला आहे. आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर पहिली निवडणूक ! आबांचे चिरंजीव रोहित यांच्या राजकारणातील प्रवेशामुळे चर्चेत राहिली आहे. मतदारसंघातील शेती आणि पाणी या  विषयावर व्यापक चर्चा होतेय. सुरवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतर्फे सुमनताई पाटील यांची उमेदवारी निश्‍चित असल्यामुळे त्यांनी प्रचारात  आघाडी घेतली होती. आर.आर. यांची प्रतिमा आणि कामे हीच त्यांची  आजही जमेची बाजू आहे. आर.आर. यांना ज्या पद्धतीने संजय पाटील आणि घोरपडे लक्ष्य करीत होते तसा आक्रमक प्रचार करण्यात या दोन्ही नेत्यांना मर्यादा येत आहेत. 

तासगाव - कवठेमहांकाळ मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीवेळी संजय पाटील यांनी घेतलेले भरभक्कम मताधिक्‍य ही घोरपडे यांच्यासाठी आशादायी गोष्ट आहे. त्याचवेळी खासदार आणि आमदारही तासगावचाच ही सोशल मीडियावरील व्हायरल पोस्ट धोक्‍याची आहे. भाजपवासी झालेल्या अजितरावांना ऐनवेळी शिवसेनेचे धनुष्यबाण घ्यावे लागले. आता नाही तर कधीच नाही या इर्षेने ते रिंगणात उतरले आहेत. खासदार संजय पाटील यांनी युती धर्माचे पालन करत घोरपडे यांच्या पाठीशी आपला ताकद उभी केली आहे. ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. खासदारांनाही लोकसभेचा पैसा फेडण्याची संधी आहे. तासगावमधून घोरपडेंना मिळणारी मते ही त्यांच्यासाठीही परीक्षा असेल. 

सध्या येथील निवडणुकीत सर्वाधिक चर्चा ज्युनियर आर. आर. म्हणून प्रमोट केल्या जाणाऱ्या रोहित पाटील यांचीच आहे. त्यांची २०२४ ची उमेदवारी जयंत पाटील यांनी तासगावमध्ये जाहीर करून टाकली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election result Sangli Tasgaon trends first phase