सांगलीत काँग्रेस राष्ट्रवादी पाच, तर युती तीन मतदारसंघात आघाडीवर | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष, आमदार विश्‍वजीत कदम यांनी एक लाखाहून अधिक मताधिक्‍याने विजय मिळवण्याच्या दृष्टीने घोडदौड सुरु केली आहे. त्यांनी मतदार संघात मोठी मुसंडी मारली आहे.

सांगली - जिल्ह्यातील आठ मतदार संघात  दोन भाजप, तीन राष्ट्रवादी, दोन काँग्रेस तर एक शिवसेनेचे उमेदवार आघाडीवर आहेत. एकंदरीत काँग्रेस - राष्ट्रवादीचाच जोर सांगलीत पाहायला मिळत आहे. 

भाजपच्या गडात जतला कॉंग्रेसचा "विक्रम' 

जत - गेल्या तीन निवडणुकांमध्ये भाजपचा गड राहिलेल्या जत विधानसभा मतदार संघात कॉंग्रेसने जोरदार कम बॅक केले. कॉंग्रेसचे उमेदवार विक्रमसिंह सावंत यांनी दुपारी बारापर्यंत 24 हजार मतांची निर्णायक आघाडी घेतली होता. भाजपचे विद्यमान आमदार विलासराव जगताप यांचा पराभव निश्‍चित मानला जात आहे. डॉ. रवींद्र आरळी यांचे बंड भाजपले भोवले आहे. कॉंग्रेसने येथे जल्लोष सुरु केला आहे. 

जतला पहिल्या फेरीपासून विक्रम सावंत यांनी मताधिक्‍य घ्यायला सुरवात केली. तिसऱ्या फेरीत विक्रम सावंत यानी सुमारे 14 हजाराचे मताधिक्‍य घेतले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरवात केली. प्रत्येक फेरीगणीक सावंत याचे वाढणारे मताधिक्‍य जगताप यांना विजयापासून दूर नेणारा ठरले. विशेष म्हणजे जत शहरासह पूर्व भागातहून सावंत यांना मतदारांना पाठींबा दिल्याचे प्राथमिक चित्र समोर आले. अकराव्या फेरीत सावंत यांनी 22 हजार 299 मतांची आघाडी कायम ठेवली. 

जगतापांविरोधात भाजपच्या दुसऱ्या फळीतील सहा नेत्यांनी बंड केले. त्यानंतरही त्यांना उमेदवारी देण्यात आल्याने भाजप येथे अडचणीत आले. त्यात डॉ. आरळी यांच्या बंडाने कोंडी केली. सातत्याने कॉंग्रेसचा गट बांधत निघालेल्या सावंत यांच्या पथ्यावर या पडल्या. सक्षम विरोधक म्हणून जतमध्ये रुजलेल्या सावंत यांचा विधानसभेतील प्रवेश निश्‍चित म्हटला पाहिजे. 

इस्लामपुरात जयंत "जय हो' ! 

इस्लामपूर - राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विरोधकांतील फुटीचा पुरेपूर फायदा उठवत सलग सातव्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली. त्यांची सप्तपदी पूर्ण होणार याचा अंदाज येताच वाळवा तालुक्‍यातील समर्थकांनी एकच जल्लोष केला. दुपारी बारापर्यंत जयंत पाटील 26 हजार 931 मतांनी आघाडीवर होते. 
इस्लामपुरात तिरंगी लढत झाल्याने जयंत पाटील यांना रोखण्यात विरोधकांना यश येते का? याकडे लक्ष होते. शिवसेनेचे उमेदवार गौरव नायकवडी यांचा ग्रामीण भागातील आणि अपक्ष निशिकांत पाटील यांचा इस्लामपूर शहरातील कामगिरीचा वेध घेतला जात होता. परंतू, या दोन्ही भागात जयंत पाटील यांना रोखण्यात त्यांना अपयश आल्याचे समोर आले आहे. चौथ्या फेरीत जयंत पाटील यांनी 19 हजार 626 मतांची आघाडी घेतली. सर्वच फेऱ्यांत त्यांच्या आघाडीत सातत्य राहिले. चौथ्या फेरीत जयंत पाटील 8 हजार 80, निशिकांत पाटील 2 हजार 457, गौरव नायकवडी यांनी 2 हजार 453 अशी स्थिती होती. 

मिरजेत खाडेंची हॅट्‌ट्रीक ? 

मिरज -  मिरज विधानसभा मतदार संघात भाजप उमेदवार, सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांचा विजय निश्‍चित मानला जात आहे. त्यांनी 16 हजाराहून अधिक आघाडी घेतली आहे. लाखाचे मताधिक्‍य मात्र धूसर होताना दिसते आहे. 
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार बाळासाहेब होनमोरे यांनी खाडे यांच्यासमोर आव्हान उभे केले होते. त्याचा परिणाम म्हणून होनमोरे यांनी अपेक्षेहून अधिक चांगली मते घेतल्याचेही समोर येत आहे. दहाव्या फेरीनंतर सुरेश खाडे यांनी 60 हजार 742 मते घेतली होती. बाळासाहेब होनमोरे यांना 39 हजार 637 मते मिळाली होती. येथे जनता दलानेही उमेदवार दिला होता. त्या सदाशिव खाडे यांना 1 हजार 707 मते मिळाली. 
सुरेश खाडे यांच्या मताधिक्‍याची येथे चर्चा राहिली. विरोधकांना शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवार ठरवता आला नव्हता. राष्ट्रवादीतील बाळासाहेब होनमोरे यांच्या गळ्यात माळ घातली. माजी खासदार राजू शेट्टी, कॉंग्रेस नेते विशाल पाटील यांनी येथे ताकद लावली, मात्र सुरेश खाडे यांनी तळागाळात उभे केलेले नेटवर्क भेदण्यात अपयश आले. खाडे यांची हॅट्‌ट्रीक आता निश्‍चित झाली. 

आबांच्या गडात सुमनताई जोरात 

तासगाव - तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघातील आर. आर. आबांच्या गडात श्रीमती सुमनताई पाटील यांचा करिश्‍मा कायम राहिला आहे. अंतिम माहिती हाती आली त्यावेळी राष्ट्रवादीने तब्बल 65 हजार मतांनी निर्णायक आघाडी घेतली. येथे शिवसेनेकडून लढणाऱ्या माजी मंत्री अजितराव घोरपडे यांना प्रभावच पाडता आलेला नाही. 

अकराव्या फेरीअखेर सुमनताई पाटील यांनी 86,316 तर अजितराव घोरपडे यांनी 33,615 मते घेतली होती. येथे गेल्या पाच वर्षांपासून घोरपडे यांनी भाजपकडून तयारी केली होती. मात्र ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली. घोरपडे यांना शिवसेनेकडून लढावे लागले. परिणामी निवडणूक उभी करताच आली नाही. भाजपचे खासदार संजय पाटील यांनी घोरपडे यांचा प्रचार केला, मात्र त्याचा प्रभाव दिसला नाही, असे आकडेच सांगतात. सुमनताई पाटील यांनी मात्र राष्ट्रवादीचा गड मजबूतपणे बांधून ठेवला. आबांच्या पश्‍चात कार्यकर्त्यांना ताकद दिली, कार्यकर्त्यांनीही निष्ठा ठेवून काम केले. युवा चेहरा रोहित पाटील यांचा मोठा प्रभाव राहिला आणि या साऱ्याची बेरीज म्हणून सुमनताईंनी मोठी आघाडी घेतल्याचे चित्र दुपारपर्यंत दिसत होते. ही आघाडी कितीची असेल, याकडे लक्ष असणार आहे. 

खानापुरात अनिल बाबर यांची मुसंडी 

विटा - जिल्ह्यातील सर्वात अटीतटीच्या मानल्या गेलेल्या आणि सर्वपक्षिय अपक्ष फॅक्‍टरने गाजलेल्या खानापूर विधानसभा मतदार संघात काट्याची लढत सुरु आहे. पहिल्या टप्प्यात किरकोळ आघाडीनंतर शिवसेनेचे आमदार अनिल बाबर मध्यावर माघारी पडले होते. त्यानंतर त्यांनी अपक्ष सदाशिवराव पाटील यांच्या विरोधात मुसंडी मारल्याचे चित्र समोर आले. ही त्यांची आघाडी निर्णायक ठरते का, याकडे आता लक्ष असणार आहे. 

बाबर विरुद्ध सदाशिवराव ही लढत काट्याची झाली. अगदी शे-पाचशे मतांच्या फरकाने फेऱ्या सुरु होत्या. पहिल्या टप्प्यात बाबर 300 मतांनी आघाडीवर होते. काही क्षणांत ते 100 मतांनी पिछाडीवर गेले. सदाशिवराव समर्थकांसाठी ही गुड न्यूज होती, मात्र ती फार काळ टिकली होती. दुपारी साडेअकराच्या सुमारास सहाव्या फेरीअखेर अनिल बाबर यांनी सदाशिवरावांना 1800 मतांनी मागे सोडले. अजून इथला निकाल काय लागेल याविषयी धाकधूक कायम मानली जात आहे. अकराव्या फेरीनंतर मात्र बाबर यांनी 10 हजार मतांची मोठी आघाडी घेत विजयाकडे मुसंडी मारली. 

विश्‍वजीत यांची लाखाकडे वाटचाल 

कडेगाव - कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष, आमदार विश्‍वजीत कदम यांनी एक लाखाहून अधिक मताधिक्‍याने विजय मिळवण्याच्या दृष्टीने घोडदौड सुरु केली आहे. त्यांनी मतदार संघात मोठी मुसंडी मारली आहे. 

सातव्या फेरीअखेर विश्‍वजीत कदम यांना 79 हजार 732 मते मिळाली होती. नोटाला 13 हजार 789 मते तर शिवसेनेच्या संजय विभुते यांना 3 हजार 446 मते मिळाली होती. 
येथे दुसऱ्या क्रमांकाची मते ही "नोटा' या बटणाला पडली असल्याने तो राज्यभर चर्चेचा विषय ठरणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष, भाजप नेते संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनी तेथे नोटाला मते दिल्याचे चित्र समोर आले आहे. शिवसेनेचे उमेदवार संजय विभुते यांना येथे मतदारांनी स्पष्टपणे नाकारले आहे. विश्‍वजीत कदम यांचे मताधिक्‍य किती, हाच या मतदार संघातील औत्सुक्‍याचा विषय होता. त्याकडेच आता लक्ष असणार आहे. 

"शिव-सत्य'ला मानसिंगरावांचा दे धक्का 

शिराळा - शिराळा विधानसभा मतदार संघात अपेक्षेप्रमाणे धक्कादायक निकाल नोंदवत राष्ट्रवादीच्या मानसिंगराव नाईक यांनी विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांना धक्का देत त्यांनी नाईक व सत्यजित देशमुख यांच्या एकीने नेस्तनाबुत करण्यात यश मिळवल्याचे मानले जात आहे. मानसिंगराव नाईक येथे दहा हजार मतांनी आघाडीवर होते. 

सातव्या फेरीअखेर मानसिंगराव नाईक यांना 40 हजार 121, शिवाजीराव नाईक यांना 30 हजार 446, सम्राट महाडिक यांना 16 हजार 910 मते मिळाली होती. येथे भाजपला धोक्‍याची घंटा वाजली होती, मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष करणे भाजपला अंगाशी आले आहे. तेथे आमदार नाईक यांना उमेदवारी अडचणीची ठरू शकते, असा इशारा होता. पण, सत्यजीत देशमुख यांना भाजपने घेत बेरजेचे राजकारण केले, मात्र एक अधिक एक दोन होत नाही, हेच या निवडणुकीत स्पष्ट होत आहे. सम्राट महाडिक यांची बंडखोरीही भाजपच्या पराभवाला कारणीभूत ठरल्याचे स्पष्ट होत आहे. 

सांगलीत धाकधुक कायम 

सांगली - सांगली मतदार संघाकडेही राज्याचे लक्ष आहे. विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासमोर कॉंग्रेसचे नवखे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी चांगलेच आव्हान उभे केले आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत दहाव्या फेरीअखेर आमदार गाडगीळ यांनी 10 हजार मतांची आघाडी घेतली होती, मात्र ती पुन्हा कमी होत 4 हजार 660 वर आली. त्यामुळे सांगलीत प्रचंड धाकधुक निर्माण झाली आहे. 

सुरुवातीस एकतर्फी वाटणारी ही लढत आव्हानात्मक करण्यात कॉंग्रेसचे पृथ्वीराज पाटील यांना अखेरच्या टप्प्यात यश आले. त्यामुळेच मतमोजणीच्या सुरुवातीला पृथ्वीराज पाटील यांनी आघाडी घेतली होती. पोस्टल मतांमध्येही त्यांनी दोनशे मतांची आघाडी घेतली. पण तिसऱ्या फेरीत सुधीर गाडगीळ यांनी पुन्हा आघाडी घेतली. सुरुवातीस तीन मतांची आघाडी नंतर 52 वर गेली. त्यानंतर हा आकडा वाढतच गेला. पण सातव्या फेरीत ही आघाडी 363 मतांपर्यंत खाली आल्याने पुन्हा भाजपची धाकधूक वाढली. मात्र आठव्या आणि दहाव्या फेरीत गाडगीळांनी मुसंडी मारली आणि त्यांची आघाडी नऊ हजार मतांपर्यंत वाढली. मात्र शहरातील मतदारांनी कुणाला कौल दिला हे समजण्यासाठी आणखी वाट पहावी लागणार आहे. त्यामुळे सांगलीत गाडगीळ आपले गेल्यावेळचे 14 हजार मतांचे लीड राखणार की त्यांना धक्का बसणार, याकडे लक्ष असेल. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election result Sangli trends afternoon