Vidhan Sabha 2019 : पाडापाडीच्या राजकारणाची सुरूवात संत नगरीतूनच

हुकूम मुलाणी 
Sunday, 6 October 2019

विधानसभा निवडणुकीच्या पंढरपूरातील जागेवरून सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराविरूध्द अर्ज टाकलेले समाधान आवताडे, शैला गोडसे तर आघाडीतील जागेच्या वादावरुन आ. भालके विरोधात शिवाजी काळुंगे यानी अर्ज दाखल केल्याने यात कोण माघार घेणार याकडे लक्ष लागले असताना, यात उमेदवार आपआपल्या मुद्यावर ठाम राहिले, तर पाडापाडीच्या राजकारणाची सुरूवात संत नगरीतूनच होते की काय याची चर्चा सुरू झाली.

विधानसभा 2019 : मंगळवेढा - विधानसभा निवडणुकीच्या पंढरपूरातील जागेवरून सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराविरूध्द अर्ज टाकलेले समाधान आवताडे, शैला गोडसे तर आघाडीतील जागेच्या वादावरुन आ. भालके विरोधात शिवाजी काळुंगे यानी अर्ज दाखल केल्याने यात कोण माघार घेणार याकडे लक्ष लागले असताना, यात उमेदवार आपआपल्या मुद्यावर ठाम राहिले, तर पाडापाडीच्या राजकारणाची सुरूवात संत नगरीतूनच होते की काय याची चर्चा सुरू झाली.

दाखल अर्जावर पक्षश्रेष्ठी काय तोडगा काढतात याकडे सर्वांचे लक्ष लागले. शिवसेनेच्या जागेत वरिष्ठ पातळीवरून तडजोड करत ही जागा रयत क्रांती संघटनेला दिली. त्यातून सुधाकरपंत परिचारक यांना उमेदवारी दिली. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून आमदारकीसाठी तयारी केलेल्या शैला गोडसे यांचे समर्थक नाराज होऊन गोडसे यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यास लावले. गत निवडणुकीत 43 हजार मते घेणारे समाधान आवताडे यांनी निवडणुकीनंतर दोन साखर कारखाने, सुतगिरणी, जिल्हा परिषद ,पंचायत समिती सह निम्याहून अधिक ग्रामपंचायतीवर वर्चस्व असल्यामुळे आपण आमदारकीचा प्रबळ दावेदार असून पक्ष श्रेष्टीने विचार करावा या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले. संधी न दिल्याने त्यांनी देखील कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव अर्ज दाखल केला.

आघाडीच्या जागावाटपात ही जागा काँग्रेस पक्षाकडे असल्याने शिवाजीराव काळुंगे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला, व पक्षाकडे पाठपुरावा करून ए.बी.फार्म जोडून अखेर ते काँग्रेस पक्षाचे उमेदवार झाले. युतीतील बंडखोरीमुळे पक्षाच्या उमेदवाराची अडचण झाली, तर आघाडीतील दोघाला उमेदवारी दिल्यामुळे काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या आ. भालके समोर अडचण निर्माण केली. या अडचणीचा बदला राष्ट्रवादीने घेत सोलापूर शहर मध्य मध्ये आपला उमेदवार उभा केला आहे.

राष्ट्रवादीने दाखल केलेल्या उमेदवारीमुळे उमेदवार प्रणिती शिंदे यांच्याबरोबर सुशीलकुमार शिंदे यांना धक्का बसला आहे. अशा परिस्थितीत उद्या उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिवस असल्यामुळे वरिष्ठ पातळीवरून युति व आघाडीतील नेते यामध्ये कोणता पर्याय वापरून तोडगा करतात, याकडे मात्र मतदारांचे लक्ष लागले असले तरी यात मागे कोण घेणार की आपला अर्ज कायम ठेवणार हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhansabha 2019 Aghadi Congress NCP Politics