Vidhan Sabha 2019 : सातारा जिल्हा : शिवसेनेतील बंडखोरी युतीला भोवणार?

उमेश बांबरे
Thursday, 3 October 2019

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावून विधानसभेवर आपले पाच आमदार पाठविण्याची जोरदार तयारी भाजपने चालवली आहे. माण, सातारा, वाई, कऱ्हाड दक्षिण आणि फलटण मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केलेय; तर शिवसेनेच्या इच्छुकांनी बंडाचे निशाण उभारल्याने माण, वाई, कऱ्हाड उत्तरेत विद्यमान आमदारांना निवडणूक सोपी होणार आहे. कोरेगाव आणि साताऱ्यात चुरशीची; तर पाटण, कऱ्हाड दक्षिण, फलटणमध्ये प्रतिष्ठेच्या लढती होतील.

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावून विधानसभेवर आपले पाच आमदार पाठविण्याची जोरदार तयारी भाजपने चालवली आहे. माण, सातारा, वाई, कऱ्हाड दक्षिण आणि फलटण मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केलेय; तर शिवसेनेच्या इच्छुकांनी बंडाचे निशाण उभारल्याने माण, वाई, कऱ्हाड उत्तरेत विद्यमान आमदारांना निवडणूक सोपी होणार आहे. कोरेगाव आणि साताऱ्यात चुरशीची; तर पाटण, कऱ्हाड दक्षिण, फलटणमध्ये प्रतिष्ठेच्या लढती होतील.

जिल्ह्यात राष्ट्रवादीचे पाच, काँग्रेसचे दोन आणि शिवसेनेचा एक, असे आठ आमदार आहेत. विधानसभेची निवडणूक लागेपर्यंत भाजपने साम, दाम, दंड, भेद अशा मार्गांचा अवलंब करून फोडाफोडीची रणनीती अवलंबली.

राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले भाजपमध्ये गेले. राष्ट्रवादीचा बुरूज ढासळला. राष्ट्रवादीने सावध भूमिका घेताना विरोधी युतीच्या उमेदवारांशी दोन हात करण्याच्या इर्ष्येने लढण्याची तयारी केली आहे.

भाजपने माण, सातारा, वाई, कऱ्हाड दक्षिण आणि फलटण मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केलेय. पण, जागावाटपात नाराज शिवसैनिकांनी बंडाचे निशाण उगारलंय. त्यामुळे भाजपच्या मनसुब्याला शिवसेनेचे बंडखोरच सुरुंग लावू शकतात. पाटण, कऱ्हाड दक्षिण, वाई आणि सातारा येथे पारंपरिक लढती होतील. फलटण मतदारसंघ राखीव असल्याने येथे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारांत प्रतिष्ठेची लढत होईल. सध्यातरी येथील उमेदवार गुलदस्तात आहेत. वाईमधून राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटलांविरोधात भाजपने किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसलेंना रिंगणात उतरवलेय. शिवसेनेतून इच्छुक पुरुषोत्तम जाधव अपक्ष अर्ज भरणार आहेत. त्यामुळे होणाऱ्या तिरंगी लढती युतीची मते विभागून राष्ट्रवादीला फायदा होऊ शकतो. 

साताऱ्यातून भाजपच्या शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले दीपक पवार यांच्यात सरळ सामना होईल. येथे राष्ट्रवादीची मते विभागली जातील, तर शिवेंद्रसिंहराजे आणि उदयनराजे यांच्या मतांच्या बेरजेचा फायदा भाजपला होईल. जावळीतील मते पवार आणि शिवेंद्रसिंहराजेंमध्ये विभागण्याची शक्‍यता आहे.

कोरेगावात राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदेंची भाजपमधून शिवसेनेत प्रवेशलेले महेश शिंदे यांच्याशी लढत होईल. युवा सेनेचे जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसलेंना ऐनवेळी माघार घ्यावी लागल्याने त्यांची मते कोणाच्या पारड्यात, यावर युतीच्या उमेदवाराचे भवितव्य ठरेल. सध्यातरी राष्ट्रवादीचे पारडे जड दिसते.

कऱ्हाड उत्तरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील आणि काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले धैर्यशील कदम यांच्यात सरळ लढत असेल. पण, येथून भाजपचे मनोज घोरपडे हेही इच्छुक होते. ते अपक्ष रिंगणात उतरणार आहेत. येथे युतीच्या मतांच्या विभाजनाचा परिणाम होऊन राष्ट्रवादीला निवडणूक सोपी जाऊ शकते.

कऱ्हाड दक्षिणेत पारंपरिक काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपचे डॉ. अतुल भोसले अशी थेट लढत आहे. पण, माजी आमदार विलासराव पाटील उंडाळकर यांचे पुत्र ॲड. उदयसिंह पाटील हेही रयत संघटनेच्या माध्यमातून अपक्ष रिंगणात असणार आहेत. त्यामुळे कृष्णाकाठावरची मते विभागल्याने अतुल भोसलेंना तोटा होण्याची चिन्हे आहेत. येथे चव्हाण यांची बाजू भक्कम दिसते.

पाटणमध्ये शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीचे सत्यजितसिंह पाटणकर यांच्यात पारंपरिक लढत होईल. देसाईंचे संपर्क अभियान आणि विकासकामांमुळे सध्यातरी त्यांची स्थिती मजबूत आहे. पण, युतीविरोधातील लाटेने पाटणमध्ये किमया दाखविल्यास पाटणकरांना लढत सोपी ठरेल.

माणमध्ये काँग्रेसचे माजी आमदार जयकुमार गोरेंनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यांना उमेदवारीही मिळाली. त्यांच्याविरोधात सर्वपक्षीय आघाडीकडून अनिल देसाई उमेदवार आहेत. गोरेंचे बंधू शेखर शिवसेनेतून इच्छुक होते. हा शिवसेनेच्या वाट्याचा मतदारसंघ भाजपने घेतल्याने शेखर यांची अडचण झाली आहे. पण, ते रिंगणात असणार आहेत. सर्वपक्षीय आघाडीत उमेदवारीवरून फूट पडली आहे. त्यामुळे माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख आणि शिवसेनेचे रणजित देशमुख स्वतंत्र भूमिका घेतल्यास सर्वपक्षीय आघाडीची मते विभागणार आहेत. परिणामी, गोरे बंधूंमध्येच चुरस असेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra VidhanSabha 2019 Satara District Shivsena Rebel Yuti Politics