Vidhan Sabha 2019 : उमेदवार निश्चिती ऐवजी पक्ष बदलाची अधिक चर्चा 

हुकूम मुलाणी
रविवार, 29 सप्टेंबर 2019

विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने वरिष्ठ पातळीवरून युतीची घोषणा अद्याप झाली नसल्यामुळे पंढरपूर मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांचे उमेदवारी निश्चिती ऐवजी पक्ष बदलाच्या बातम्या मात्र सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात चर्चिल्या जात आहेत. त्यामुळे पक्षीय उमेदवारी कोणाला मिळते याकडे मात्र कार्यकर्त्यांसह मतदाराचे लक्ष लागले.

विधानसभा 2019 : मंगळवेढा - विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने वरिष्ठ पातळीवरून युतीची घोषणा अद्याप झाली नसल्यामुळे पंढरपूर मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांचे उमेदवारी निश्चिती ऐवजी पक्ष बदलाच्या बातम्या मात्र सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात चर्चिल्या जात आहेत. त्यामुळे पक्षीय उमेदवारी कोणाला मिळते याकडे मात्र कार्यकर्त्यांसह मतदाराचे लक्ष लागले.

लोकसभा निवडणुकीपासून ते ईडी च्या धसक्यामुळे भाजपा मध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. अशा परिस्थितीमध्ये पंढरपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये ही जागा कोणत्या पक्षाला द्यावी याबाबत मात्र अजून निर्णय झाला नसला तरी लोकसभेतच विधानसभेच्या रंगीत तालमीत काॅग्रेस उमेदवाराला मताधिक्य देवून आ. भालके पास होवूनही त्याच्या पक्षबदलाच्या बातम्या अधिक जोरात असून कार्यकर्त्याकडून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे, तर दुसर्‍या बाजूला ही जागा सेनेकडे असल्यामुळे ते सेनेच्या संपर्कात असलेल्या बातम्या देखील सोशलमिडीयात सुरू झाल्या, तर दुसर्‍या बाजूला कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर निवडणूक लढणार असल्याचे सुधाकर परिचारक यांनी सांगितले.

परंतु सुरुवातीला भाजपकडून उमेदवारी मिळते का नाही हे पाहून निर्णय घेणार असल्याचे सांगितले. दुसऱ्या बाजूला त्यांनी राष्ट्रवादी अद्याप सोडली नसल्यामुळे ते राष्ट्रवादीचे उमेदवार होऊ शकतात, अशी देखील चर्चा सुरू झाली. तर गत निवडणुकीतील शिवसेनेने उमेदवार समाधान आवताडे यांना सध्या भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याचे त्यांचे समर्थक सांगू लागले आहेत. कालपासून सोशल मीडियात ते देखील राष्ट्रवादीच्या संपर्कात असून राष्ट्रवादीतून त्यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याचे वृत्त समर्थकानी सोशल मीडियावर टाकले. सध्या शिवसेनेकडून शैला गोडसे यांनी एकमेव मुलाखत दिली असल्यामुळे त्या शिवसेनेच्या या क्षणाला उमेदवार आहेत. काँग्रेस पक्षाकडून शिवाजीराव काळुंगे यांनी मुलाखत दिल्यामुळे ते देखील काँग्रेसचे उमेदवार आहेत, परंतु सध्या नेत्यांचा पक्ष बदलाच्या बातम्यांमुळे कार्यकर्त्यांसह मतदार मात्र कोण कोणाच्या पक्षात जावून उमेदवार होणार या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhansabha 2019 social media BJP Shivsena Politics