Vidhan Sabha 2019 : पंढरपुरची जागा रयतला गेल्याने भाजप-सेना नेते नाराज

हुकूम मुलाणी
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

मेघाभरतीमुळे राज्यात शिवसेना व भाजपाची ताकद वाढली असताना देखील पंढरपूरची जागा रयत क्रांती संघटनेला सोडल्यामुळे इच्छुक भाजपातून  दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे व शिवसेनेच्या शैला गोडसे यांच्या प्रयत्नांवर पाणी पडल्यामुळे ते सध्या बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्यामुळे भूमिकेकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

मंगळवेढा - मेघाभरतीमुळे राज्यात शिवसेना व भाजपाची ताकद वाढली असताना देखील पंढरपूरची जागा रयत क्रांती संघटनेला सोडल्यामुळे इच्छुक भाजपातून  दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे व शिवसेनेच्या शैला गोडसे यांच्या प्रयत्नांवर पाणी पडल्यामुळे ते सध्या बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्यामुळे भूमिकेकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून कोण कोणत्या पक्षाचा उमेदवार होणार याची उत्सुकता होती. परंतु आ. भारत भालके यांच्या शिवसेना व भाजपाच्या प्रवेशाच्या बातम्या माध्यमातून आल्या, त्यांनी महिनाभर सस्पेन्स ठेवत काँग्रेस मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यामुळे शिवसेना-भाजपातील उमेदवारासमोरील एक स्पर्धक कमी झाला. परंतु, अशा परिस्थितीमध्ये या मतदारसंघांमध्ये आ. प्रशांत परिचारक हे सहयोगी सदस्य झाल्यामुळे व दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांनी मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून सलगी केल्यामुळे या मतदारसंघात भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली असताना देखील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात हा मतदारसंघ शिवसेनेकडून -भाजपाकडे घ्यावा असा सूर भाजप कार्यकर्त्यांनी त्याच वेळेस आवळला. परंतु भाजप नेत्यांनी याकडे दुर्लक्ष केले, जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी 1995 च्या जागावाटपानुसार जागा सोडणार नसल्याचा इशारा दिला. परंतु यात कुठे माशी शिंकली कुणास ठाऊक, ना. सावंत यांची घोषणा हवेत विरली, तर भाजप नेत्यांनी याकडे दुर्लक्ष करत रयतकडे ही जागा देऊ केली. तालुक्याच्या ग्रामीण भागांमध्ये रयत क्रांती या संघटनेचे अस्तीत्व अल्प आहे, अशा परिस्थितीत परिचारकांच्या माध्यमातून या संघटनेचा प्रभाव वाढू शकतो. परंतु या मतदारसंघात भाजपा नेत्यांनी ही जागा रयत क्रांतीला का देऊ केली हे मात्र कार्यकर्त्यांना समजले नसल्यामुळे, आज दिनांक 3 रोजी अध्यक्ष समाधान आवताडे हे कार्यकर्त्यांना बोलावून भूमिका जाहीर करणार असल्याचे जाहीर केले. तर शैला गोडसे यांनी करून दाखवल, करतच राहणार असे पोस्ट टाकत हे अर्ज दाखल करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या दोघांनी बंडखोरी करून जर अर्ज दाखल केले तर युतीच्या उमेदवाराला याचा फटका बसणार की लाभ होणार याची चर्चा मात्र मतदार सुरू झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra VidhansSabha 2019 Pandharpur Rayat Kranti Sanghatana Politics