महारयत ऍग्रो इंडियाचा गैरव्यवहार उघड; कडकनाथ कोंबडी खाद्याचे अमिष

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

कडकनाथ कोंबडी व त्याचे खाद्य देण्याच्या अमिषाने शाहपुरीत महारयत ऍग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालकांविरोधात 3 कोटी 94 लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा शाहूपुरी पोलिसात आज दाखल झाला.

कोल्हापूर : कडकनाथ कोंबडी व त्याचे खाद्य देण्याच्या अमिषाने शाहपुरीत महारयत ऍग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालकांविरोधात 3 कोटी 94 लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा शाहूपुरी पोलिसात आज दाखल झाला. गुन्हा दाखल झालेल्यामध्ये सशयित सुधीर शंकर मोहिते व संदीप सुभाष मोहिते (दोघे रा. इस्लामपुर, ता. वाळवा, सांगली) यांच्यासह इतर संचालकांचा समावेश आहे. याबाबतची फिर्याद विजय विलास आमते (वय 39, रा. शिंगणापूर, करवीर) यांनी दिली. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, कडकनाथ कोंबडी पालनाचा प्रकल्पाने पश्‍चिम महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. महारयत ऍग्रो इंडिया प्रायव्हेट लिमीटेड इस्लामपूर विरोधात शेतकऱ्यांची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करा अशी मागणी जोर धरू लागली होती. दरम्यान शाहूपुरी पोलिसात याबाबतचा आज गुन्हा दाखल झाला. महारयत ऍग्रो कंपनीने गुंतवणुकीवर अधिक नफा देण्याचे अमिष सुधीर व संदीप मोहिते यांच्यासह संचालकांनी शहरातील अनेकांना दाखवले होते. त्या अमिषाला बळी पडून अनेक गुंतवणुकदार कंपनीत पैसे भरून सभासद होऊन त्यांनी गुंतवणूक केली. त्यांनी है पैसे त्यांनी जुलै ते 28 ऑगस्ट अखेर शाहूपुरीतील एका हॉटेलच्या इमारतीत आणि कंपनीच्या शाहूपुरी शाखेच्या बॅंक खात्यावर असे 3 कोटी 45 लाख 67 हजार रूपये जमा केले. त्याचबरोबर त्यांच्याकडून संचालकांनी कोंबडी खाद्यासाठी 48 लाख 92 हजार 930 रूपये अशी एकूण 3 कोटी 94 लाख 59 हजार 930 रूपये घेतले.

त्यात विजय आमते यांच्यासह सुमारे 181 सभासदांचा समावेश होता. पण कंपनीने केलेल्या करारातील कोणत्याही शर्तीचे पालन न करता निव्वळ आपल्या आर्थिक फायद्याचा विचार करून सभासदांची फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर आमते यांच्या वतीने सभासदांनी कंपनीच्या संशयित सुधीर व संदीप मोहितेसह संचालक मंडळाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharayat Agro Indias SCAM exposed Kadaknath Chicken Offered