महावितरणची मोबाईल सेवा लोकप्रिय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

सातारा - वीजबिलाचा तपशील, तसेच वीजपुरवठा बंद असण्याचा कालावधी व इतर माहिती वीज ग्राहकांच्या मोबाईलवर ‘एसएमएस’द्वारे पाठविण्याची सेवा ‘महावितरण’ने सुरू केली आहे. ‘महावितरण’कडे मोबाईल क्रमांकांची नोंदणी केलेल्या सातारा मंडलातील आठ लाख ८९ हजार १८० ग्राहकांपैकी आठ लाख ३८ हजार ८९० ग्राहक या सुविधेचा लाभ घेत आहेत.

सातारा - वीजबिलाचा तपशील, तसेच वीजपुरवठा बंद असण्याचा कालावधी व इतर माहिती वीज ग्राहकांच्या मोबाईलवर ‘एसएमएस’द्वारे पाठविण्याची सेवा ‘महावितरण’ने सुरू केली आहे. ‘महावितरण’कडे मोबाईल क्रमांकांची नोंदणी केलेल्या सातारा मंडलातील आठ लाख ८९ हजार १८० ग्राहकांपैकी आठ लाख ३८ हजार ८९० ग्राहक या सुविधेचा लाभ घेत आहेत.

बारामती परिमंडलात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषिपंपधारक व इतर असे एकूण २४ लाख २६ हजार ३३५ वीज ग्राहक आहेत. त्यापैकी २२ लाख ३९ हजार १९६ वीज ग्राहकांनी ग्राहक क्रमांकासोबत स्वतःचे मोबाईल क्रमांक ‘महावितरण’कडे नोंदवले आहेत. त्यात सातारा मंडलातील आठ लाख ८९ हजार १८० ग्राहकांपैकी आठ लाख ३८ हजार ८९० ग्राहकांनी आपले मोबाईल क्रमांक नोंदवले आहेत. 

मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीज ग्राहकांच्या मोबाईलवर वीज सेवेसंबंधित विविध माहिती ‘एसएमएस’द्वारे पाठविण्यात येते. वीजबिल तयार होताच ग्राहकाने किती वीज वापरली, मीटर रीडिंग, एकूण वीजबिल, सध्याचे रीडिंग, बिल भरण्याची अंतिम तारीख आदी माहिती ग्राहकांना देण्यात येते, तसेच तांत्रिक बिघाड किंवा नियोजित देखभाल व दुरुस्तीमुळे वाहिनीवरील बंद असलेला वीजपुरवठा पूर्ववत होण्याचा कालावधी वीज ग्राहकांना ‘एसएमएस’द्वारे कळविण्यात येतो. ‘महावितरण’ने कर्मचाऱ्यांसाठी तयार केलेल्या ‘कर्मचारी मित्र’ या मोबाईल ॲपद्वारे वीजपुरवठा बंद असलेल्या वीज वाहिनीची नोंद घेऊन संबंधित वीज ग्राहकांच्या मोबाईलवर वीजपुरवठा बंद बाबतचा कालावधी एसएमएसद्वारे नियमित कळविण्यात येतो. 

वीज ग्राहकांना स्वतःहून मोबाईल क्रमांकाची नोंदणी करता येणार आहे. त्यात त्यांनी नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून ९२२५५९२२५५ क्रमांकावर MREG (बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाईप करून एसएमएस केल्यास मोबाईल क्रमांकाची नोंदणी होणार आहे. MREG व ग्राहक क्रमांक यात स्पेस देणे आवश्‍यक आहे. त्याशिवाय २४ तास सुरू असणाऱ्या कॉल सेंटरचे १९१२ किंवा १८००-१०२-३४३५ आणि १८००-२३३-३४३५ हे तीन टोल फ्री क्रमांक उपलब्ध असून, कोणत्याही कंपनीच्या मोबाईल किंवा दूरध्वनीद्वारे या दोन्ही क्रमांकावर संपर्क साधता येतो. 

मराठीतही मिळणार मेसेज
भाषेची अडचण लक्षात घेऊन आता मराठी भाषेतही ‘एसएमएस’ पाठविण्यात येतात. त्यासाठी ग्राहकांनी मोबाईल क्रमांक ‘महावितरण’कडे नोंदवला असेल तर त्यावरून मराठी भाषेसाठी MLANG टाईप करून स्पेस देऊन आपला १२ आकडी ग्राहक क्रमांक टाकावा. त्यानंतर स्पेस देऊन १ क्रमांक टाकून ९२२५५९२२५५ या क्रमांकावर पाठवावा, असे आवाहन ‘महावितरण’ने केले आहे. 

मोबाईल क्रमांक नोंदवलेले ग्राहक
बारामती मंडल - २२,३९,१९६ 
सातारा मंडल - ८,३८,८९०

Web Title: mahavitaran mobile app electricity bill