आषाढी वारीसाठी महावितरणची यंत्रणा सज्ज 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जुलै 2018

सोलापूर : पंढरपूरमधील आषाढी एकादशी सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात पालखी सोहळ्याचे आगमन झाले आहे. महावितरणकडून वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीचे कामे पूर्ण करून यंत्रणा सज्ज केली आहे. सुरळीत वीजपुरवठ्यासह वीजसुरक्षा व अन्य सेवेसाठी रात्रंदिवस कार्यरत राहण्यासाठी 510 अभियंते व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. 

सोलापूर : पंढरपूरमधील आषाढी एकादशी सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात पालखी सोहळ्याचे आगमन झाले आहे. महावितरणकडून वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीचे कामे पूर्ण करून यंत्रणा सज्ज केली आहे. सुरळीत वीजपुरवठ्यासह वीजसुरक्षा व अन्य सेवेसाठी रात्रंदिवस कार्यरत राहण्यासाठी 510 अभियंते व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. 

पालखी सोहळा व पंढरपुरातील आषाढी यात्रेदरम्यान सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वीजयंत्रणेपासून सतर्क राहावे. वीजपुरवठ्यासाठी कोणत्याही प्रकारच्या वीजवाहिनी किंवा वीजयंत्रणेतून वीजचोरी करू नये. आकडा टाकू नये किंवा एखाद्या वीजजोडणीतून इतर ठिकाणी अनधिकृत वीजपुरवठा सुद्धा घेऊ नये. महावितरणकडून तात्पुरता वीजपुरवठा देण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. मागणीप्रमाणे तात्पुरती वीजजोडणी देण्याची कार्यवाही तत्काळ करण्यात येत आहे. 

आषाढी यात्रेसाठी सर्व पालख्या जिल्ह्यात दाखल होत आहेत. पालखी सोहळा मार्ग तसेच पंढरपूर शहर व परिसरातील वीजयंत्रणांची यापूर्वीच देखभाल व दुरुस्ती केली आहे. पालखी मार्गावर किंवा पंढरपूरमधील यात्रेदरम्यान कोणत्याही व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वीजयंत्रणेपासून सावध व सतर्क राहण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. सध्या संततधार पावसाचा जोर असल्याने विद्युत अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे वीजखांब, फिडर पिलर, डीपी बॉक्‍स किंवा अन्य वीजयंत्रणेपासून सुरक्षित अंतर ठेवावे. तुटलेल्या वीजतारा हटविण्याचा किंवा त्यास स्पर्श करण्याचा प्रयत्न करू नये. पालखी मार्गावर उपस्थित असलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यास त्याची तत्काळ माहिती द्यावी. सार्वजनिक ठिकाणच्या वीजयंत्रणेपासून धोका टाळण्यासाठी महावितरणने वीजसुरक्षेची पुरेपूर काळजी घेतली आहे.

याशिवाय महावितरणच्या सोलापूर मंडल कार्यालय व पंढरपूर विभाग कार्यालयात रात्रंदिवस नियंत्रण कक्ष सुरू राहणार आहे. प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांच्या मार्गदर्शनात मुख्य अभियंता सुनील पावडे, अधीक्षक अभियंता ज्ञानेश्‍वर पडळकर, पंढरपूर विभागाचे कार्यकारी अभियंता नारायण व्हनमाने आदींनी वीजसेवेचे नियोजन केले आहे. महावितरणचे 40 अभियंते व सुमारे 470 जनमित्र हे पालखी सोहळ्याचे मार्ग व मुक्कामाच्या ठिकाणी तसेच पंढरपूरमधील आषाढी यात्रेचा पालखी तळ व परिसरात वीजसेवेसाठी उपलब्ध असतील. जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रण कक्ष व पंढरपूरमधील पाच ठिकाणच्या इमर्जंसी ऑपरेशन सेल (Emergency Operation Center) आणि पोलिस विभागाच्या कंट्रोल रूममध्ये महावितरणच्या संबंधित अभियंत्यांची नावे, नियुक्तीचे ठिकाण व मोबाईल क्रमांकाची यादी दिली आहे. पंढरपूरमध्ये लाखो भाविकांचा मुक्काम असेपर्यंत महावितरणकडून ही सेवा रात्रंदिवस सुरू राहणार आहे. 

धोका पत्करू नका 
फलटणमध्ये विमानतळाजवळील पालखी मुक्कामी वीजवाहिनीवर आकडा टाकून वीजपुरवठा घेण्यात आला होता. वीजप्रवाह असलेल्या या आकड्याचा स्पर्श झाल्याने सोमवारी (ता. 16) पहाटे दोन वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. वीजचोरीमुळे किंवा अनधिकृत वीजवापरामुळे प्राणांतिक वीजअपघात होण्याची शक्‍यता आहे. वीजअपघात टाळण्यासाठी भाविकांनी किंवा अन्य कोणत्याही व्यक्तींनी महावितरणच्या वीजयंत्रणेपासून सतर्क राहावे. कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. 

Web Title: Mahavitran ready to ashadhi wari