हातकणंगले पंचायत समिती सभापतीपदी 'यांची' बिनविरोध निवड

अभिजित कुलकर्णी
Monday, 30 December 2019

हातकणंगले पंचायत समिती सभापतीपदासाठी आवाडे गटाचे महेश पाटील व उपसभापतीपदी काँग्रेसचे राजकुमार भोसले यांची बिनविरोध निवड झाली.

नागाव ( कोल्हापूर ) - हातकणंगले पंचायत समिती सभापतीपदासाठी आवाडे गटाचे महेश पाटील व उपसभापतीपदी काँग्रेसचे राजकुमार भोसले यांची बिनविरोध निवड झाली. भारतीय जनता पक्षाने ऐन वेळी निवडणूक प्रक्रियेतून माघार घेतल्याने ही निवड बिनविरोध जाहीर झाली.  

हातकणंगले पंचायत समिती सभापती निवडीसाठी सुरवातीपासूनच नाट्यपूर्ण घडामोडी घडत गेल्या. आवाडे गटाकडे पाच सदस्य असल्याने गटनेते आमदार प्रकाश आवाडे यांनी सुरवातीच्या टप्प्यातच शिवसेनेचे दोन सदस्य स्वतःकडे ठेवून जनसुराज्य शक्ती पक्षाला सोबत येण्याचे आवाहन केले. मात्र आमदार विनय कोरे यांनी आपण भारतीय जनता पक्षासोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात अंतर्गत मोर्चेबांधणी सुरू झाली. कोणत्याही परिस्थितीत भाजपला सत्तेत येऊ द्यायचे नाही यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस व शिवसेना एकत्रित येऊन त्यांनी आवाडे गटाला बळ दिले. त्यामुळे पंचायत समिती मध्ये भाजप - जनसुराज्य शक्ती पक्ष यांचे संख्याबळ अकरा होते. आणि आवाडे, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस व एका अपक्षासह अकराचेच संख्याबळ झाले.

हेही वाचा - सतेज पाटील यांची मंत्रीमंडळात वर्णी 

निवडणूक प्रक्रियेतून माघार घेणे केले पसंत

दोन्ही बाजूंनी समान संख्याबळ झाल्याने एक सदस्य फोडण्यासाठी वरिष्ठ नेत्यांच्या मदतीने हालचाली सुरू झाल्या. ऐन वेळी भारतीय जनता पक्षाच्या एका महिला सदस्यांनी दोन माजी आमदारांबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी पंचायत समिती सदस्य उत्तम सावंत यांनी अखेरपर्यंत प्रयत्न केले. शेवटी पक्षाचा व्हीप जारी करण्यात येणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले. पण संबंधित महिला सदस्यांची माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्याबद्दलची नाराजी दूर करण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. त्यानंतर त्यांनी महेश पाटील यांच्या समर्थनार्थ निवड प्रक्रियेपासून अलिप्त राहण्याचा निर्णय पक्षाला कळविला. त्यामुळे भारतीय जनता पक्ष व जनसुराज्य पक्षाचे एकत्रित संख्याबळ एक मताने घटले. ऐन वेळी संख्याबळ घटल्याने भारतीय जनता पक्षाला भराभव दिसू लागला आणि त्यांनी निवडणूक प्रक्रियेतून माघार घेणे पसंत केले. 

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची खेळी यशस्वी

दरम्यान माजी आमदार अमल महाडिक व राहूल आवाडे यांच्यात पंचायत समिती सभापती निवडीवरून चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये भाजप, जनसुराज्य व आवाडे गटाला पुढील पंचवीस महिन्यांसाठी समान संधी मिळणार असल्याचे समजते. पण आवाडे गट भाजप व जनसुराज्य पक्षासोबत असेल, तर उपसभापती काँग्रेसचा का हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. याबाबत माजी आमदार अमल महाडिक यांच्याशी संपर्क संपर्क साधला असता त्यांच्याकडेही याचे समाधानकारक उत्तर नाही असेच स्पष्ट होते. त्यामुळे तालूका पंचायत समितीच्या राजकारणात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची विरोधकांची खेळी यशस्वी झाली असेच म्हणावे लागेल. 

एका सदस्याच्या नाराजीचा पक्षाला फटका

हातकणंगले तालुक्यात अकरा जिल्हा परिषद सदस्य आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भारतीय जनता पक्षाचे पुलाची शिरोली येथील शौमिका महाडिक यांच्याकडे आहे. भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषदेतील गटनेतेपद हातकणंगलेचे अरुण इंगवले यांच्याकडे आहे. शिवाय भारतीय जनता पक्षाचे इचलकरंजीचे माजी आमदार सुरेश हाळवणकर व करवीरचे माजी आमदार अमल महाडिक हे दोन्ही नेते हातकणंगले तालुक्यातीलच आहेत. तालुक्यात पक्षाची एवढी मोठी ताकद असताना पंचायत समितीच्या एका सदस्याची नाराजी पक्षाला पराभवाचा मोठा धक्का देणारी ठरली.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahesh Patil As Hatkanagale Panchayat Samitti Sabhapati