महिंद धरणाला वाढतोय जलपर्णीचा विळखा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

ढेबेवाडी - वांग नदीवरील महिंद धरणात १८ वर्षांपासून साचलेला गाळ पडून असतानाच आता धरणाच्या जलाशयाला जलपर्णी आणि गारवेलाचा विळखा वाढू लागल्याने पाणीसाठ्यावर परिणाम होत आहे. धरणाच्या काठावर असूनही टंचाई काळात पिकांना पाणी मिळत नसल्याची सळवेतील शेतकऱ्यांची तक्रार आहे.

महिंद धरणात ८५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होतो. ३५.९८ चौरस किलोमीटरचे पाणलोट क्षेत्र आहे. २००० मध्ये धरणाची घळभरणी होऊन पाणीसाठ्याला सुरवात झाली. अतिवृष्टीचा परिसर असून पाण्याबरोबर गाळ व माती वाहून येण्याचे प्रमाणही जास्त आहे. तब्बल १८ वर्षे धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचून राहिल्याने पाणीसाठ्यावर परिणाम होत आहे. पावसाळ्याच्या पहिल्या टप्प्यातच धरण तुडुंब भरल्यासारखे दिसते. मात्र, पाणी कमी व गाळ जास्त असल्याने पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होतच नाही. यंदा पावसाळ्यापूर्वी धरणाच्या पडझड झालेल्या सांडव्याचे मजबुतीकरण करण्यात आले आहे. त्याच्याबरोबर गाळ काढण्याचा मुहूर्तही करण्यात आला होता. मात्र, वाहतूक खर्च परवडणार नसल्याने लांबच्या शेतकऱ्यांनी तिकडे पाठ फिरवली. जवळच्या शेतकऱ्यांनीही गाळ नेला नाही. धरणात ७० हजार घनमीटर गाळ असल्याचा पाटबंधारे विभागाचा अंदाज असून त्यापैकी किरकोळ प्रमाणात गाळउपसा झाला आहे. जलाशयाच्या कडेने हे प्रमाण जास्त आहे.

धरणाच्या जलाशयाला गाळाबरोबरच जलपर्णी आणि गारवेलचा विळखा पडला आहे. पाठीमागून जलाशय त्यानेच भरल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.
- उत्तम कदम, अध्यक्ष, तंटामुक्त समिती, सळवे

Web Title: mahind dam water jalparni