वयाच्या साठीतही महिपतीचा धावण्याचा उपक्रम

वयाच्या साठीतही महिपतीचा धावण्याचा उपक्रम

कोल्हापूर - ‘साठी बुद्धी नाठी’ असं म्हटलं जात असलं तरी त्यात तथ्य असतेच असे नाही, हे महिपती शंकर संकपाळ यांनी सिद्ध केले आहे. दर रविवारी ‘शिवाजी पूल ते जोतिबा डोंगर’ असा चालत नव्हे, धावतच जाण्याचा त्यांचा उपक्रम आजही सुरू आहे.

वयाच्या पंचेचाळिसाव्या वर्षी सुरू झालेल्या त्यांच्या ॲथलेटिक्‍समधील करिअरचा आलेख साठीतही चढताच आहे. धावता धावता किती धावावे, याचे समीकरण मात्र त्यांच्या लेखी नाही. त्यामुळेच केवळ राष्ट्रीय नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर धावणे व चालणे अशा दोन्ही गटांत त्यांच्या कर्तृत्वाची प्रचिती येते आहे.

श्री. संकपाळ यांचे मूळ गाव कसबा वाळवे सध्या ते जरगनगरमध्ये स्थायिक आहेत. त्यांचे डिप्लोमा इन इलेक्‍ट्रिकल इंजिनिअरिंगपर्यंत शिक्षण  झाले. ते महावितरणमध्ये दुय्यम अभियंता म्हणून मे १९८० ला देवगड येथे रुजू झाले. व्यायाम बंद झाल्याने त्यांचे दोन ते तीन किलो वजन वाढले. त्यामुळे महावितरणच्या क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग घेण्यास सुरुवात केली. १९८९ ला विवाह झाल्यानंतर व्यायामात पुन्हा खंड पडला. मात्र, २००४-०५ ला त्यांनी जोतिबा डोंगरावर चालत जाण्यास सुरुवात केली. कोल्हापूर जिल्हा मास्टर्स असोसिएशनची स्थापना २००८ ला झाली.

असोसिएशनतर्फे ते जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी झाले. या स्पर्धेत यश मिळविल्याने त्यांची ठाणे येथे आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत निवड झाली. स्पर्धेत त्यांनी पहिला क्रमांक मिळविला. मलेशिया येथे झालेल्या पाच किलोमीटर चालणे प्रकारात तृतीय तर धावणेमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. यानंतर त्यांच्या यशाचा आलेख उंचावत राहिला.

मे २०१७ ला ते सेवानिवृत्त झाले. याच वर्षी त्यांनी मुंबई मॅरेथॉनमध्ये धावण्याचे स्वप्न पूर्ण तर केलेच; शिवाय ४२ किलोमीटर गटात त्यांनी पहिला क्रमांक मिळविला. आजही ते सोमवार ते शनिवार दरम्यान विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर सकाळी धावतात. या मैदानाला ते रोज सतरा ते अठरा फेऱ्या मारतात.

न्यूझीलंडमध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत १०८ देश सहभागी होते. २१ किलोमीटर धावणे प्रकारात माझा पाचवा क्रमांक आला. हे अपयश धुवून काढण्यासाठी २०२१ ला जपान येथे होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत उतरण्याचा माझा निर्धार आहे. गुडघेदुखीचा त्रास होत आहे; मात्र उमेद हरलेलो नाही. या स्पर्धेत नक्कीच यश मिळवेन.
- महिपती संकपाळ,
संचालक, कोल्हापूर जिल्हा मास्टर्स असोसिएशन.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com