सावर्डे पाटणकरमधील डॉक्‍टरांच्या अपहरणातील मुख्य आरोपीस अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

राधानगरी - सावर्डे पाटणकर येथील डॉक्‍टरांचे अपहरण व खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी सुशांत बाळासाहेब देसाई (रा. गारगोटी, ता. भुदरगड) याला राधानगरी पोलिसांनी आज अटक केली. तो सहा महिने पोलिसांना गुंगारा देत होता. 

राधानगरी - सावर्डे पाटणकर येथील डॉक्‍टरांचे अपहरण व खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी सुशांत बाळासाहेब देसाई (रा. गारगोटी, ता. भुदरगड) याला राधानगरी पोलिसांनी आज अटक केली. तो सहा महिने पोलिसांना गुंगारा देत होता. 

सावर्डे पाटणकर येथील डॉ. सागर सुतार यांचे सहा महिन्यांपूर्वी सावर्डे ते सुळंबी दरम्यानच्या रस्त्यावरून अपहरण करण्यात आले होते. त्यांना गाडीत घालून खिंडी व्हरवडे घाटात नेऊन त्यांच्याकडून दहा हजार रुपये काढून घेतले व २५ लाख रुपयांची मागणी केली होती. या प्रकरणात सात जण असल्याची फिर्याद त्याचवेळी डॉ. सुतार यांनी राधानगरी पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानंतर पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येथील निरीक्षक अशोक इंदलकर यांनी तपास सुरू केला.

मोबाईल कॉलच्या माध्यमातून त्यांतील सहा आरोपींना दोन महिन्यांपूर्वी अटक केली आहे. या सायबर तपासासाठी संदीप मेटील यांनी विशेष प्रयत्न केले.

मुख्य सूत्रधार देसाई गुंगारा देत होता. घटनेनंतर तो जिल्ह्याबाहेर गेल्याने बेळगाव, निपाणी, पुणे, चिंचवड परिसरातही पोलिसांनी त्याचा शोध घेतला. अखेर त्याच्या मोबाईल कॉलवरून तालुक्‍यातील सरवडे येथे आल्याचे समजताच त्याला अटक केली. यात श्री. इंदलकर, उपनिरीक्षक श्री. कवितके, सुरेश मेटील, संदीप ढेकळे, राहुल केणे, कृष्णात यादव, सरदार भोसले, रणजित जाधव यांनी भाग घेतला. देसाईवर जुना राजवाडा पोलिसांतही गुन्हे नोंद आहेत, अशी माहिती श्री. इंदलकर यांनी दिली.

Web Title: main accused in the kidnapping of the doctor was arrested