कोल्हापूर : केशवराव भोसले नाट्यगृहात वाजली सुव्यवस्थेची घंटा ! 

Maintenance Done In Keshavrao Bhosale Theater  Kolhapur
Maintenance Done In Keshavrao Bhosale Theater Kolhapur

कोल्हापूर - संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहातील प्रलंबित कामे तत्काळ सुरू करण्याच्या सूचना आज महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिल्या. पिण्याच्या पाण्यासाठीचे नळ कनेक्‍शनच्या कामाला दुपारपासूनच प्रारंभ झाला असून दुसऱ्या टप्प्यातील कामाबाबत प्रत्येक महिन्याला आढावा बैठक घेतली जाणार आहे. त्याशिवाय "सीसीटीव्ही'च्या कामालाही प्रारंभ झाला आहे. जनरेटरची कामे लवकरच सुरू होतील. दरम्यान, याबाबतचे वृत्त "सकाळ'ने "सुव्यवस्थेची घंटा कधी वाजणार?' अशा मथळ्याखाली आज प्रसिद्ध केले होते. 

राज्य नाट्य स्पर्धेला उद्या (शुक्रवार) पासून प्रारंभ होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर किमान सुविधा उपलब्ध व्हाव्यात, अशी मागणी रंगकर्मींनी लावून धरली. त्यामुळे आज सकाळी आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना धारेवर धरले. 

मेमध्ये काही कामाबाबत सूचना देऊनही कार्यवाही का झाली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काही अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसाही बजावल्या. दुपारी दीडच्या सुमारास नाट्यगृहाची संबंधित अधिकाऱ्यांसह पाहणी केली. तत्काळ होणाऱ्या कामांना आजपासूनच प्रारंभ करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. नाट्यगृहातील साऊंड आणि लाईट सिस्टीम्स या सध्याच्या सर्वांत अद्ययावत सिस्टीम्स असून, त्याची किंमत सुमारे 70 ते 80 लाखांच्या घरात आहे; मात्र ही सारी यंत्रणा अगदी व्यवस्थितपणे सांभाळण्यासाठी तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची भरती अजूनही झालेली नाही. भरतीबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्याची सूचनाही त्यांनी दिली. सहभागी नाट्यसंस्थांना लेव्हल्स, स्पॉटलाईट, डिमर्स आदी गोष्टी उपलब्ध नाहीत. कॅंटीनची सोय नाही. मेकअप रूम, स्वच्छतागृहे सुसज्ज नाहीत. याबाबतही लवकरच सकारात्मक कार्यवाहीची ग्वाही त्यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com