भ्रूणहत्येचे स्वतंत्र गुन्हे 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मार्च 2017

मिरज - म्हैसाळ येथील भ्रूणहत्या प्रकरणात जमिनीत पुरलेले जे भ्रूण ताब्यात घेतले आहेत, त्याची न्यायवैद्यक प्रयोगशाळेत "डीएनए' तपासणी होणार आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर संबंधित दांपत्यांवर भ्रूणहत्येचे स्वतंत्र गुन्हे नोंदवले जाणार आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी आज या वृत्ताला दुजोरा दिला. दरम्यान, म्हैसाळ भ्रूणहत्या प्रकरणाचा तपास आता अंतिम टप्प्यात आला आहे. प्रत्यक्ष कारवाईपेक्षा सापडलेल्या पुराव्यांची सांगड घालून खटला मजबूत करण्याचे काम पोलिस करत आहेत. जिल्हा प्रशासनातर्फे दवाखान्यांची तपासणी व बनावट डॉक्‍टर तपासणी मोहीम अजूनही सुरूच आहे.

मिरज - म्हैसाळ येथील भ्रूणहत्या प्रकरणात जमिनीत पुरलेले जे भ्रूण ताब्यात घेतले आहेत, त्याची न्यायवैद्यक प्रयोगशाळेत "डीएनए' तपासणी होणार आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर संबंधित दांपत्यांवर भ्रूणहत्येचे स्वतंत्र गुन्हे नोंदवले जाणार आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी आज या वृत्ताला दुजोरा दिला. दरम्यान, म्हैसाळ भ्रूणहत्या प्रकरणाचा तपास आता अंतिम टप्प्यात आला आहे. प्रत्यक्ष कारवाईपेक्षा सापडलेल्या पुराव्यांची सांगड घालून खटला मजबूत करण्याचे काम पोलिस करत आहेत. जिल्हा प्रशासनातर्फे दवाखान्यांची तपासणी व बनावट डॉक्‍टर तपासणी मोहीम अजूनही सुरूच आहे. शिंदेवाडीतून ताब्यात घेतलेल्या तथाकथित डॉक्‍टरला माफीचा साक्षीदार म्हणून उभा करण्याबाबत हालचाली सुरू असल्याचेही कळते. 

डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याचा एजंट म्हणून काम करणाऱ्यांचा शोध पोलिस घेत आहेत. शिरोळ, अर्जुनवाड व कनवाड परिसरातील काही एजंट व गर्भपात केलेल्या तीन महिलांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत. खिद्रापुरेला औषधे पुरवणाऱ्यांचे जबाबदेखील पूर्ण झाले आहेत. सध्या कागदोपत्री गुन्हा मजबूत करण्याचे प्रयत्न पोलिस करत आहेत. या गुन्ह्यात वैद्यकीय बाबींची तांत्रिक माहिती असणाऱ्या काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. न्यायालयात साक्षीसाठी त्यांनाच साक्षीदार करण्याची तयारी सुरू आहे. काल शिंदेवाडी (ता. मिरज) येथून प्रकाश नामक एकाला (सर्जेराव पाटील नव्हे) ताब्यात घेण्यात आले. त्याने काही वर्षे एका औषध कंपनीत काम केले होते. त्यानंतर सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील डॉक्‍टरांना मधुमेहाची आयुर्वेदिक औषधे पुरवण्याचा व्यवसाय त्याने सुरू केला होता. डॉ. खिद्रापुरेच्या औषध पुरवठादार यादीत त्याचेही नाव असल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याला उद्या (ता.20) न्यायालयात हजर केले जाणार आहे. 

बनावट डॉक्‍टरांनी गाशा गुंडाळला 
तालुक्‍यात बनावट डॉक्‍टरांचा शोध व दवाखान्यांची तपासणी अजूनही सुरू आहे. पोलिसांची मोहीम पाहता बनावट डॉक्‍टरांनी गाशा गुंडाळला आहे. मोहीम गुप्तरित्या न राबवता बोलबाला झाल्याने ते सावध झाले आहेत; त्यामुळे तपास पथकांच्या हाती फार काही लागण्याची शक्‍यता नाही. खिद्रापुरेवर गुन्हा दाखल झाल्यानंतर म्हैसाळ येथील ओढ्याकाठी जेसीबी मशीनने खोदाई करून 19 भ्रूण ताब्यात घेतले होते. त्यांपैकी काही भ्रूणांचे अवशेष "डीएनए' चाचणीसाठी योग्य ठरले आहेत. डीएनए चाचणीनंतर जो अहवाल येईल त्यानुसार संबंधितांविरुद्ध भ्रूणहत्येचे स्वतंत्र गुन्हे नोंदवले जाणार आहेत. पोलिस अधिकाऱ्यांनीच याला दुजोरा दिला. त्यासाठी "डीएनए' अहवालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

Web Title: maishal-case