घनदाट जंगलाने दिले दमदार पावसाचे संकेत....! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

कोल्हापूर - घनदाट जंगलातील नीरव शांतेतून अरण्यवाचन सुरू होते...झाडावरची वाळवी आता खाली उतरली असून झाडं चकचकीत झाली आहेत...दणकट कड्यावर रानकेळ्यांना बहर आला आहे...हे दोन्ही संकेत पाऊस लवकर सुरू होण्याचे आणि तो ही दमदार बरसण्याचे. आजवर अपरिचित असणारी ही माहिती समजताच साऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद व्दिगुणीत झाला आणि मोहीम पुढे सरकत राहिली. निमित्त होते, सकाळ माध्यम समूह आणि मैत्रेय प्रतिष्ठान आयोजित दुर्ग-धारातीर्थ अरण्यदर्शन मालिकेंतर्गत मठगाव ते धुऱ्याची वाडी (गावओहोळाचे जंगल) या चौथ्या मोहिमेचे. 

कोल्हापूर - घनदाट जंगलातील नीरव शांतेतून अरण्यवाचन सुरू होते...झाडावरची वाळवी आता खाली उतरली असून झाडं चकचकीत झाली आहेत...दणकट कड्यावर रानकेळ्यांना बहर आला आहे...हे दोन्ही संकेत पाऊस लवकर सुरू होण्याचे आणि तो ही दमदार बरसण्याचे. आजवर अपरिचित असणारी ही माहिती समजताच साऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद व्दिगुणीत झाला आणि मोहीम पुढे सरकत राहिली. निमित्त होते, सकाळ माध्यम समूह आणि मैत्रेय प्रतिष्ठान आयोजित दुर्ग-धारातीर्थ अरण्यदर्शन मालिकेंतर्गत मठगाव ते धुऱ्याची वाडी (गावओहोळाचे जंगल) या चौथ्या मोहिमेचे. 

दरम्यान, "सकाळ'चे कार्यकारी संपादक मनोज साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोहिमेला प्रारंभ झाला. ते म्हणाले, "" पर्यटन म्हटले की आपल्या डोळ्यासमोर सिमला,कुलुमनाली,महाबळेश्‍वर,माथेरान हीच ठिकाणे येतात.याउलट आपल्या आसपास अशीच पर्यटन समृध्द ठिकाणे आहेत.या ठिकाणांचा आस्वाद घेता यावा,या उद्देशाने या मोहिमेचे आयोजन केले आहे.तसेच निसर्गाची अशी मुक्त उधळण आणि गड-किल्ल्यांसह अरण्यवाचनाची अनुभूती समाजातील सर्व घटकांना मिळावी,हाही उद्देश आहेच. त्याला कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे, यातच या मोहिमेचे यश आहे.'' मैत्रेय प्रतिष्ठानच्या वतीने यावेळी त्यांचा सत्कार झाला. 

पावसाळ्यानंतरच सारी सृष्टी हिरवीगार होते, अशी एक सर्वसाधारण मानसिकता. पण त्याच्याही पलीकडे निसर्गाचा बारमाही आविष्कार आपल्याच जिल्ह्यात अनुभवायला मिळतो. मात्र, तो साऱ्यांनाच अनुभवता यावा, या उद्देशाने प्रसिध्द दुर्ग अभ्यासक डॉ. अमर अडके, स्थानिक अभ्यासक डी. के. मोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम फत्ते झाली. 

सकाळी साडेपाच वाजता मोहीम मठगावकडे रवाना झाली. साडेआठच्या सुमारास मठगावात पसरलेल्या धुक्‍याच्या दुलईनेच सर्वांचे स्वागत झाले. परस्पर परिचय आणि न्याहारीनंतर साऱ्यांचीच पावलं जंगलाकडे वळली. अरण्यवाचन करताना कधीही न अनुभवलेल्या असंख्य गोष्टी साक्षात समोर दर्शन देत होत्या. मोहीम पुढे सरकत होती आणि तितक्‍याच एका वळणावर कोकणातील मनोहर मनसंतोषगडाचे विहंगम दर्शन साऱ्यांनाच आणखी प्रोत्साहन देणारे ठरले. जंगल घनदाट होवू लागले. वेड्या-वाकड्या रानवाटा आणि चढ उतारांनी मोहीम अधिक दमदार होत चालली आणि तितक्‍याच वारूळांचे दर्शन घडले. मुळात ही वारूळं म्हणजे जगातली पहिली आर्कि टेक्‍ट मंडळी. आपल्याकडे पूर्व-पश्‍चिम वारे वाहतात. त्यावर पाऊसही अवलंबून. त्यामुळेच त्यांची रचना पूर्व-पश्‍चिम. ती जमिनीच्या वर जितकी दिसतात. त्याच्या सातपट जमीनीखाली असतात आणि त्याची रचना इतकी सुंदर की त्या आधारावरच पूर्वी आपल्या घरांच्या रचना ठरल्या. वारूळांच्या तळाशी हमखास जलस्त्रोत असतो आणि त्याची माती इतकी टणक की जगातल्या कुठल्याही सिमेंटपेक्षा ती भारी, अशी अभ्यासपूर्ण माहिती यावेळी मिळाली. वारूळांच्या प्रदेशातून पुढे सरकताना बारमाही धबधबा आला आणि दमलेल्या पावलांसह नखशिखांत थंडगार पाण्यात चिंब होण्यासाठी सारे पुढे सरसावले. तासभराच्या या आनंदोत्सवानंतर आता साऱ्यांना केवड्याच्या पाण्याचे वेध लागले आणि मोहीम पुढे सरकली. जंगलाच्या पुनर्निर्मितीच्या काळातील पळस, पांगिरा आणि सारीच झाडं-वेली कशी नटलेली. भल्या मोठ्या रानकेवड्यांच्या साथीने पुन्हा साऱ्यांची पावलं पाण्यात पडली आणि विविधरंगी फुलांच्या गालिचातून मोहीम पुढे सरकली ती रानमेव्याच्या जणु प्रदेशातच पोचली. रानमेव्यावर मनसोक्त ताव मारल्यानंतरही या हिरव्याकंच प्रदेशातून पाय हटता हटत नव्हते. तरीही आभाळ आणखी गच्च होऊ लागल्यानं पुढं सरकणं अपरिहार्यच. एकापाठोपाठ एक मग सारी मंडळी पाटगावातील मौनी महाराजांच्या मठाकडे मार्गस्थ होवू लागली. साऱ्यांच्याच चेहऱ्यावर मोहीम फत्ते झाल्याचा आनंद झळकत राहिला. आपापल्या शरिरातील इंजीनं अजूनही घट्ट असल्याचा "कॉन्फिडन्स'ही वाढला आणि अशा रानवाटा वारंवार पिंजून काढण्याचा निर्धार करून मोहीम कोल्हापूरकडे परतीच्या मार्गाला लागली. 

- यांचे विशेष सहकार्य 
मौनी महाराज मठाचे मठाधिपती संजयसिंह बेनाडीकर, स्थानिक अभ्यासक डी. के. मोरसे, खादी प्रचारक हरिशचंद्र साळुंखे, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. हावळ आदींचे मोहिमेसाठी विशेष सहकार्य मिळाले. मोहिमेतून तब्बल सहा तास हे जंगल पिंजून काढताना मैत्रेय प्रतिष्ठानच्या टीम लीडर्सनी नेटके संयोजन केले. 

Web Title: Maitreya Pratishthan