कोल्हापुरात 2005 पेक्षा परिस्थिती गंभीर 

major flood condition in Kolhapur
major flood condition in Kolhapur

कोल्हापूर : जिल्ह्यात 1989, 2005 पेक्षा पूरस्थिती गंभीर बनली आहे. 2005 मध्ये पंचगंगेची पातळी 50 फुटापर्यंत पोहचल्यानंतर हाहाःकार उडाला होता, आज पंचगंगेने 52 फूटापर्यंत पातळी गाठल्याने शहरासह जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर झाली आहे. अजूनही पावसाचा जोर सुरूच आहे तर धरणांतून विसर्गही सुरू असल्याने दुपारनंतर ही परिस्थिती अतिगंभीर होण्याची शक्‍यता आहे. 

गेल्या सात दिवसांपासून पावसाची धार तुटलेली नाही, सूर्यदर्शनही या काळात झालेले नाही. प्रचंड पाऊस जिल्ह्याच्या सर्वच भागात सुरू असून पंचगंगेसह जिल्ह्यातील सर्वच नद्यांना महापूर आला आहे. नद्यांचे पाणी ग्रामीण भागात नागरी वस्तीत घुसल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. करवीर तालुक्‍यातील प्रयाग चिखली, आरे, आंबेवाडी, शिरोळ तालुक्‍यातील नृसिंहवाडी, टाकवडे आदि गांवे रिकामे करण्याची वेळ आली आहे. या गावांतील नागरीकांसह जनावरांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 1989 सालीही अशीच परिस्थिती होती, त्यानंतर 2005 ला ही पुराचा विळखा जिल्ह्याला पडला होता. त्याहीपेक्षा भयानक परिस्थिती यावर्षीच्या पावसाने निर्माण झाली आहे. 

कसबा बावडा व शहरातील नदी, ओढ्याकाठी असलेल्या घरांतही पाणी घुसल्याने तेथील लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महावीर कॉलेज परिसर, न्यु पॅलेस, रमणमळा, नागाळा पार्क, केव्हीज पार्क, बापट कॅम्प, मुक्त सैनिक वसाहत आदि परिसरात अजूनही काही लोक घर, अपार्टमेंटमध्ये अडकून पडले आहेत. यात महिला, ज्येष्ठ नागरीकांसह लहान मुलांचा समावेश आहे. आपत्तीच्या तुलनेत यंत्रणेवर फारच मर्यादा आल्या आहेत. तरीही जिल्हा प्रशासन, महापालिका अग्नीशमक दला, राष्ट्रीय आपत्ती पथक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे लोक प्रयत्नांची पराकाष्टा करून लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे काम करत आहेत. 

2005 ला ज्या परिसरात पाणी घुसले होते, त्या परिसरात यावेळी दोन दिवसांपुर्वीच पाणी घुसले आहे. पण त्यापेक्षा भयंकर परिस्थिती आता निर्माण झाली. ज्या परिसरात कधीही पाणी घुसणार अशी अटकळ होती, त्याठिकाणीही कंबरेएवढे पाणी घुसले आहे. लोक भयभयीत झाले असून मदतीची याचना करत आहेत. आज पंचगंगेची पातळी 52 फुट 6 इंच आहे. सद्या सुरू असलेला पाऊस, धरणांतील विसर्ग पाहता ही पातळी अजून किमान तीन ते चार फुटांनी वाढण्याचा धोका आहे. 

काही पुलावर पहिल्यांदाच पाणी 
कसबा बावडा-शिये मार्गावर यापुर्वीच पाणी आले पण या मार्गावर असलेल्या शिये पुलावर यावर्षी पहिल्यांदाच पाणी आले आहे. याशिवाय लक्ष्मीपुरीतील विल्सन पूलही पहिल्यांदाच पाण्याखाली गेला आहे. 

जिल्हाधिकारी, आयुक्त रस्त्यावरच 
शहर व जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर बनल्याने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासह आयुक्त मलिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख हे स्वतः रस्त्यावर उतरून पुरात अडकलेल्या लोकांना हलवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पहाटेपासून मध्यरात्री उशीरापर्यंत हे अधिकारी पूरस्थितीचा आढावा घेऊन मदत कार्यात सक्रिय आहेत. कलशेट्टी तर स्वतः गुडघाभर पाण्यात उतरू लोकांच्या मदतीला धावून गेले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com