बालनाट्यातून घडलेला "फेस'मेकर...! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

बॉलिवूडचे प्रसिद्ध मेकअपमन विक्रम गायकवाड... दोनशेहून अधिक चित्रपट आणि हजारहून अधिक जाहिरातपटांसह विविध मालिकांसाठी रंगभूषा... अनेक पुरस्कारांनी सन्मान... प्रोस्थेटिक म्हणजेच संपूर्ण किंवा काही भागावर मुखवटा लावून केल्या जाणाऱ्या मेकअपचा बादशहा... मात्र इथपर्यंतचा त्यांचा सारा प्रवास घडला तो बालनाट्यातून. 

बॉलिवूडचे प्रसिद्ध मेकअपमन विक्रम गायकवाड... दोनशेहून अधिक चित्रपट आणि हजारहून अधिक जाहिरातपटांसह विविध मालिकांसाठी रंगभूषा... अनेक पुरस्कारांनी सन्मान... प्रोस्थेटिक म्हणजेच संपूर्ण किंवा काही भागावर मुखवटा लावून केल्या जाणाऱ्या मेकअपचा बादशहा... मात्र इथपर्यंतचा त्यांचा सारा प्रवास घडला तो बालनाट्यातून. 

कदाचित त्यांनी बालनाट्ये केली नसती तर एका मोठ्या मेकअप आर्टिस्टला आपण मुकलो असतो, असे म्हटले तर वावगे ठरणार नाहीच. आज (गुरुवारी) "किफ'मध्ये त्यांचा चित्रमहर्षी आनंदराव पेंटर पुरस्काराने गौरव होणार आहे आणि त्यानिमित्ताने एका "सेलिब्रिटी' मेकअप आर्टिस्टला भेटता येणार आहे. मुळात मेकअपमन म्हणजे पडद्यामागचा तसा दुर्लक्षित घटक. पण त्याला "सेलिब्रिटी' बनवणं असो, चांगले पैसे मिळवून देणं असो किंवा अगदी केंद्र सरकारला रंगभूषेसाठी राष्ट्रीय पुरस्कार देण्यासाठी भाग पाडणं असो, या साऱ्या गोष्टी घडवल्या, त्या विक्रमजी यांच्या प्रयोगशील मेकअप्सनीच हे मात्र नक्की. 

बबनराव शिंदे यांच्यासारखे गुरू विक्रमजींना लाभले. शिंदे यांचा बालनाट्यासाठी वेशभूषा (ड्रेपरी) पुरवण्याचा व्यवसाय. त्यांच्या घरी गेल्यानंतर अर्थातच घराच्या व्हरांड्यात बसून राक्षसाचे, चेटकिणीचे असे विविध प्रकारचे मुखवटे ते करत असल्याचे जवळून पाहायला मिळायचे. हळूहळू मग विक्रमजी त्यांना मदत करू लागले. कुणाला दाढी किंवा मिशी लाव, कुणाचा चेहरा रंगव अशी कामे ते करू लागले आणि शाळेतील अभ्यासापेक्षा आपल्याला याच कामात अधिक रस असल्याची जाणीवही त्यांना झाली. अस्तित्वात नसलेल्या गोष्टीचा हुबेहूब भास निर्माण करायचं आव्हान त्यांना खुणावू लागलं. त्यातून घरातले कुंकू आणि काही मोजक्‍या गोष्टी घेऊन खरोखरच लागल्याची, शरीरावर जखम तयार करण्याची किमया त्यांनी साध्य केली. पुढे कुणाला राक्षस बनव, राजकन्या बनव, राक्षस किंवा चेटकिणीसाठी मोठे नाक तयार करून लाव, अशी जबाबदारी विक्रमजींवर पडू लागली आणि आपल्यातील "क्रिएटिव्हिटी' पणाला लावून ती जबाबदारी ते लीलया पार पाडू लागले. अनेक नाटकांची कामं त्यांना मिळू लागली. सुरवातीला एका प्रयोगासाठी पंचाहत्तर रुपये नाईट मिळू लागली. पुढे ती वाढून तीनशे रुपये झाली. मात्र जाणीवपूर्वक नोंद घ्यावी अशी गोष्ट म्हणजे त्यावेळी एका प्रयोगासाठी मातब्बर नटांना दोनशे रुपये नाईट असायची आणि विक्रमजी मात्र त्यांच्या दीडपट म्हणजे तीनशे रुपयांचे पाकीट घेऊन घरी जायचे. 

महोत्सवात आज 
सुपर इगोज (जर्मनी), शेषा दृष्टी (ओडिशा), ट्रॅव्हवर (इराण), मागुनिरी शागाडा - मागुनी की बैलगाडी (ओडिशा) आदी चित्रपटांची आज (गुरुवारी) महोत्सवात पर्वणी असेल. सायंकाळी साडेसहाला महोत्सवाची सांगता होणार असून त्यात चित्रमहर्षी आनंदराव पेंटर पुरस्काराचे वितरण होईल. त्यानंतर इराणच्या "ट्रॅक 143' या चित्रपटाने महोत्सवाची सांगता होईल.

Web Title: make-up artist Vikram Gaikwad