esakal | इथेनॉल व अल्कोहोल बरोबर सीएनजी गॅसही तयार करा : शरद पवार
sakal

बोलून बातमी शोधा

Make CNG gas along with ethanol and alcohol: Sharad Pawar

साखर उद्योगावर आधारित प्रकल्प उभे करायला हवेतच; पण मानसिंगराव आता कारखान्यात इथेनॉल व अल्कोहोल बरोबर सीएनजी गॅस तयार करण्याचा प्रकल्प हाती घ्या, असा सल्ला प्रतिपादन ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले.

इथेनॉल व अल्कोहोल बरोबर सीएनजी गॅसही तयार करा : शरद पवार

sakal_logo
By
शिवाजी चौगुले

शिराळा : साखर उद्योगावर आधारित प्रकल्प उभे करायला हवेतच; पण मानसिंगराव आता कारखान्यात इथेनॉल व अल्कोहोल बरोबर सीएनजी गॅस तयार करण्याचा प्रकल्प हाती घ्या, असा सल्ला प्रतिपादन ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले. चिखली (ता. शिराळा) येथे लोकनेते फत्तेसिंगराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणानंतर ते बोलत होते. नवीन व्यावसायिक दालने सुरू करा. लागेल ती मदत करू, असे त्यांनी सांगितले.

श्री. पवार म्हणाले,""कारखान्यांमार्फत सीएनजी गॅसची निर्मिती झाल्यास कमी दरात लोकांना गॅस मिळू लागल्यास पैसे वाचतील. फत्तेसिंगराव नाईक यांचा पुतळा नव्या पिढीत चेतना निर्माण करून प्रेरणा देण्याचे काम करेल.'' पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले,""उत्तर भागाच्या पाण्याच्या प्रश्नाचे आप्पांचे स्वप्न वाकुर्डे योजनेच्या माध्यमातून दोन वर्षांत पूर्ण झालेले दिसेल. मितभाषी व सर्वांना बरोबर घेऊन जाणाऱ्या आप्पांचा आदर्श नव्या पिढीला प्रेरणादायी ठरेल. मानसिंगराव नाईक यांच्या प्रयत्नातून चांदोली पर्यटनास लवकरच गती मिळेल.''

माजी आमदार शिवाजीराव नाईक म्हणाले,""डोंगरी विभागासाठी आप्पांनी केलेले काम दिशादर्शक आहे. सानिध्यात आलेल्या लोकांना ते साथ देत. निवडणुकीकडे राजकारणात पुरते पाहून सर्वांगीण विकासासाठी झटणारे त्यांचे नेतृत्व होते.'' 

खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले,""आप्पांच्या कार्याची प्रचिती व त्यांनी दिलेला विश्वास न विसरण्यासारखा आहे. शिराळा, वाळवा व कऱ्हाड तालुक्‍याच्या पाण्यासाठी त्यांनी भगीरथ प्रयत्न केले.'' आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले,""आप्पांनी शेतीच्या पाण्याचा ध्यास घेऊन काम केले. उत्तर भागाला पाणी मिळण्याचे स्वप्न जयंत पाटील यांच्या माध्यमातून पूर्ण होईल.'' 

विराज नाईक यांनी स्वागत, आमदार मानसिंगराव नाईक यांनी प्रास्ताविक केले. सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, सहकार, कृषी व सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार धैर्यशील माने, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, आमदार मोहनराव कदम, सुमनताई पाटील, अरुण लाड, कारखान्याचे उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील, माजी आमदार सत्यजित पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख, अमरसिंह नाईक, राजेंद्रसिंह नाईक, साम्राटसिंह नाईक, ऍड. भगतसिंग नाईक, सुनीतादेवी नाईक, नगराध्यक्षा सुनीता निकम, दिनकरराव पाटील, शिवाजीराव घोडे, विष्णू पाटील, विश्वास कदम, कार्यकारी संचालक राम पाटील उपस्थित होते. 

तत्त्वाला जागणारा शिराळा 
यशवंतराव चव्हाण यांचे नेतृत्व मानून शब्दाला जगण्याची भूमिका या तालुक्‍यातील लोकांची आहे. बिळाशीचे बंड व शिराळाचा उल्लेख केल्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होत नाही. तत्त्वाशी तडजोड न करणे व लाचारी न स्वीकारणे हा इतिहास आहे, असे गौरवोद्‌गार शरद पवार यांनी काढले. 

संपादन : युवराज यादव

loading image