ग्रामपंचायत बिनविरोध करा, 30 लाख मिळवा

बादल सर्जे 
Saturday, 26 December 2020

जत : तालुक्‍यातील 30 ग्रामपंचायत निवडणूक होऊ घातल्या आहेत. या निवडणूका बिनविरोध व्हाव्यात, असे आमचे मत आहे.

जत : तालुक्‍यातील 30 ग्रामपंचायत निवडणूक होऊ घातल्या आहेत. या निवडणूका बिनविरोध व्हाव्यात, असे आमचे मत आहे. गाव पातळीवर असणारे सर्व मतभेद, गट तट, राजकीय द्वेष, बाजूला सारून गावाच्या विकासासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन ही निवडणूक बिनविरोध करावी, ज्या गावांची ग्रामपंचायत बिनविरोध होईल, अशा ग्रामपंचायतीला आमदार फंडातून 30 लाखांचा निधी देऊ, असे आवाहन आमदार विक्रमसिंह सावंत यांनी पत्रकार बैठकीत केले. 

कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढू नये, यासाठी शासन विविध पातळ्यांवर प्रयत्न करत आहे. त्यातच ग्रामपंचायत निवडणूकीचा बिगुल वाजला आहे. या संकट काळात निवडणूका बिनविरोध झाल्याने समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण होईल. यासोबतच निवडणुकीत होणारा अनावश्‍यक खर्च व प्रशासनावर पडणारा ताण कमी होईल, असे ही आमदार सावंत यांनी सांगितले. 

आमदार विक्रमसिंह सावंत पुढे म्हणाले, कोरोना विषाणूचे संकट टळलेले नाही. आजही काळजी घेणे गरजेचे आहे. या निवडणुकीच्या तोंडावर या संकटाला तोंड देण्यासाठी गावकऱ्यांनी एकत्रित येऊन आपली ग्रामपंचायत बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न करावे. या माध्यमातून गट तट, भावबंधकी व राजकीय द्वेष व सामाजिक तेढ निर्माण होणार नाही. यावेळी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार, माजी सभापती बाबासाहेब कोडग, समाधान शिंदे, आदी उपस्थित होते. 

आपण ही गावातील प्रतिष्ठित नागरिकांशी संवाद साधून याबाबत जनजागृती करत आहे. यासह नवा आदर्श घडवू पाहणाऱ्या ग्रामपंचायतीला आमदार फंडातून व इतर मार्गाने तीस लाखांचा निधी देऊ. 
- विक्रमसिंह सावंत, आमदार

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Make Gram Panchayat unopposed, get 30 lakhs