कायमस्वरूपी "बदल' घडावेत...! 

कायमस्वरूपी "बदल' घडावेत...! 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी (ता. 18) साताऱ्यात मुक्कामी होते. मुख्यमंत्र्यांच्या या अल्प दौऱ्यामुळेही अनेक विकासात्मक "बदल' घडले. नेहमीच समस्यांच्या गर्तेत अडकलेल्या सातारकरांना त्यातून काही काळ का होईना दिलासा मिळाला. प्रशासनाने ठरवले तर "बदल' होऊ शकतो, हे या निमित्ताने स्पष्ट झाले. मग, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचीच प्रशासनाने का वाट पाहावी, असा प्रश्‍नही मनात येतो. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या उद्‌घाटन व अन्य कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री साताऱ्यात आले होते. हा दौरा तसा अचानकच ठरला. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. मुख्यमंत्री येणार म्हटल्यानंतर तयारीही तशीच करावी लागणार... त्यादृष्टीने जिल्हा प्रशासन गतिमान झाले. नगरपालिकेतील अधिकारीही खडबडून "जागे' झाले. स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. शासकीय विश्रामगृह, जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यानचा रस्ता चकाचक करण्यात आला. रखरखत्या उन्हाळ्यातही दुभाजकात वृक्षारोपण करण्यात आले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला जंतूनाशक पावडर टाकण्यात आली. रस्त्यांच्या बाजूंची अतिक्रमणे हटवली. रस्त्याकडेला वाहनांचे पार्किंग होणार नाही, याची खबरदारी घेतली गेली. या सर्व "अथक' प्रयत्नांतून सारा परिसर चकाचक झाला... काही का असेना मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे तरी ही कामे तरी झाली. 

निसर्गाच्या कुशीत वसलेल्या सातारा शहराला "स्मार्ट' करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, शासनाचा दट्ट्या असल्याने केवळ कागदांचा खेळ करण्याशिवाय साताऱ्यात "स्मार्ट' झालेले काहीच दिसत नाही. रोजच्या समस्या तशाच आहेत. रस्त्यांची रखडलेली कामे, दिवसेंदिवस वाढणारी अतिक्रमणे, पदपथ असून नसल्यासारखा, रस्त्यावर भरणारी भाजी मंडई, वाहतूक कोंडी, वाहन तळ, स्वच्छतागृह... असे एक ना अनेक प्रश्‍न तसेच आहेत. हे प्रश्‍न सोडवण्यासाठी तात्पुरता "इलाज' केला जातो. राजकीय दबावामुळेही अधिकाऱ्यांवर मर्यादा येतात. मतांच्या राजकारणात व राजकीय कुरघोड्यांतून काही दिवसांतच पुन्हा तेच प्रश्‍न त्याच ठिकाणी उभे राहतात. या स्थितीमुळे सातारा नक्की कधी "स्मार्ट' होणार हे कोणीही सांगू शकणार नाही. 

दुभाजकात लावलेली पामची झाडे यापूर्वीही लावता आली असती; पण तसा प्रयत्नच झाला नाही. ज्या ठिकाणी आहेत, ती ही पाण्यावाचून वाळत चालली आहेत. या झाडांना पाणी देण्याचे नियोजन नाही. पोवई नाका ते विसावा नाका दरम्यान असलेले काही पथदिवे कित्येक दिवसांपासून बंद आहेत; पण पालिकेच्या अधिकाऱ्यांना व स्थानिक नगरसेवकांनाही ते दिसत नाही. हे प्रश्‍न किरकोळच आहेत. फक्त ते सोडवण्यासाठी पुढाकाराची गरज आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे जी काही किरकोळ कामे झाली. त्यातून हे प्रश्‍न सुटू शकतात, हे स्पष्ट होते. आता अधिकारी व लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांच्या पुढच्या दौऱ्याची वाट न पाहता हे प्रश्‍न मार्गी लावावेत, अशी अपेक्षा करायला हरकत नाही...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com