साताऱ्यात 300 जणांची तडीपारी ? निवडणूका शांततेत होण्यासाठी पोलिसांकडून हालचाली 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील अनेक मातब्बरांना मतदान व मतमोजणीच्या कालावधीत मतदारसंघाबाहेर राहावे लागणार आहे. त्याचा शहरात शांतता प्रस्थापित करण्याला नक्कीच हातभार लागणार आहे.

सातारा : विधानसभा व लोकसभा निवडणुकीतील चुरस लक्षात घेता मतदान व मतमोजणीची प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी शहर व शाहूपुरी पोलिसांनी तडीपारीचे शस्त्र उगारले असून, शहर व शाहूपुरी हद्दीतील तब्बल 300 जण पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यामुळे नेत्यांच्या जवळच्या अनेकांना ऐन निवडणुकीत मतदारसंघाबाहेर राहावे लागणार आहे. 
 

विधानसभा निवडणुकीबरोबर सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लागली आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्यामुळे दर वेळी सातारा जिल्ह्यामध्ये एकतर्फी असल्यासारखेच निवडणुकीचे चित्र असायचे. विरोधामध्ये उभे करायला उमेदवार शोधायला लागायचे. मात्र, भारतीय जनता पक्षाने या वेळी जिल्ह्यामध्ये ताकद पणाला लावली आहे. उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजे, मदन भोसले व जयकुमार गोरे या आघाडीच्या नेत्यांना भाजपने आपल्याकडे ओढत त्यांनी बालेकिल्याला खिंडार पाडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीनेही बालेकिल्ला अबाधित राखण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे सर्वच मतदारसंघांमध्ये युती व आघाडीमध्ये जोरदार लढत पाहायला मिळणार आहे. त्यातच विधानसभेबरोबरच लोकसभेची पोटनिवडणूकही होत आहे. त्यामुळे एकंदरच पोलिस दलावरील ताण वाढलेला आहे. 

मतदारांना कोणत्याही परिस्थितीत निर्भय वातावरणात मतदान करता यावे, याची पोलिस दलावर मोठी जबाबदारी आहे. त्यासाठी पोलिसांकडून विविध पातळ्यांवर उपाययोजना आखल्या जात आहेत. संवेदनशील मतदारसंघाबरोबरच संवेदनशील बुथच्या पातळीवर जावून त्यांचे नियोजन चालले आहे. 

21 ऑक्‍टोबरला मतदान तर, अवघ्या दोनच दिवसांत मतमोजणी आहे. त्यामुळे मतदानावेळचा तणाव मतमोजणीपर्यंत कायम असणार आहे. त्यातच सर्व विधानसभा मतदारसंघांबरोबरच लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणीही साताऱ्यात घेण्याचे नियोजन आहे. त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलिसांच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. त्यामुळे मतदान व मतमोजणीच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करू शकतील, अशांना मतदारसंघाबाहेर ठेवण्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे अधिक सोपे जावू शकते.

त्यामुळे शहर व शाहूपुरीमधील अवैध व्यावसायिक, पोलिस यादीवरील संशयित व निवडणूक काळात उपद्रव निर्माण करू शकतील अशांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार शाहूपुरी व शहर पोलिसांनी सुमारे 300 जणांचे तडीपारीचे प्रस्ताव तयार केले आहेत. निवडणुकीच्या प्रचारासाठी आता अवघा बारा दिवसांचा कालावधीत उरला आहे. त्यामुळे संबंधितांना नोटीस बजावून सुनावणीच्या पुढील प्रक्रिया करण्याकडे पोलिसांचा कल आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: To make Polling and counting peacefull police may take strict action against who can create nuisance