लग्नसोहळा अविस्मरणीय करण्यासाठी... 

lagan
lagan

सोलापूर : लग्न म्हणजे वधू-वरांच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असतो. हा क्षण चांगल्या पद्धतीने फुलविण्यासाठी सध्या सोईसुविधा पुरविणाऱ्या विविध इव्हेंन्ट कंपन्या सोलापुरात आहेत. आता मंगल कार्यालयांकडेही सुविधा उपलब्ध आहेत. लग्नसराईचा मुहूर्त असल्याने नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात सर्वत्र लग्नाची धामधूम पाहण्यात येते. विवाहस्थळ, निमंत्रण पत्रिका, फोटोग्राफर यासोबतच वधू-वराचे दागिने, कपडे वेगवेगळ्या आभूषणांची वैविध्यता, संगीत, मेंदी अशी मोठी यादी असते. अविस्मरणीय सोहळ्यादिवशी प्रत्येकाची नजर नवरा मुलगा आणि मुलगी यांच्यावरच असते.
-


इव्हेंन्ट मॅनेजमेंट कंपनी 
इव्हेंन्ट मॅनेजमेंट कंपनी सुरवातीला ग्राहकांना केटरिंग, डेकोरेशन, भटजी व विधी पूजनाचे साहित्य, मंगलाष्टक ऑडिओ आणि म्हणणारा व्यक्ती याची माहिती देते. त्याचबरोबर कार्यालय सजविण्यासाठी ग्राहकांच्या मागणीनुसार विद्युत रोषणाई व साउंड यांची व्यवस्था केली जाते. बॅंड, घोडा त्याशिवाय कार्यालयाच्या गेटवर व वधू-वरांच्या कारवर लावण्यासाठी बॅनर, स्टीकर, लग्नावेळी लागणारी मिठाई यांची तयारी केली जाते. वधूला लग्नाच्या मंचावर थाटात आणण्यात येते. 
-

मंगल कार्यालय आणि लॉन 
सोलापुरातील मुले-मुली नोकरीनिमित्त पुणे-मुंबई येथे आहेत. त्यांचे पालक सोलापुरात वास्तव्यास आहेत. त्यामुळे पालकांना पारंपरिक पद्धतीने मंगलकार्यात लग्न करायचे असते. नव वधू-वरांना मुंबई, पुण्याप्रमाणे फॅशन सोलापुरात असाव्यात असे वाटते. त्यामुळे दोन्हींचे कॉम्बिनेशन असणाऱ्या मंगल कार्यालयास सध्या जास्त मागणी आहे. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर लग्न करण्याचे प्रमाण वाढल्याने लॉन असणाऱ्या कार्यालयांना जास्त मागणी आहे. 


केटर्स 
लग्नातील महत्त्वाचा भाग म्हणजे जेवण. पूर्वी सर्व साहित्य आणून लग्नात आचाऱ्याकडून स्वंयपाक करून घेत असत. मात्र, सध्या त्यात बदल झाला आहे. सध्या केटरिंग व्यवसायातील केटरर्सनेच सर्व साहित्य आणून अन्नपदार्थ बनवून देण्याची पद्धत आहे. सोलापुरात महाराष्ट्रायीन, दाक्षिणात्य, गुजराती यांसह मागणीनुसार व चवीनुसार अन्नपदार्थ बनवतात. त्याचबरोबर त्याच्या आकर्षकरीत्या मांडणीला जास्त मागणी आहे. अलिकडे केटरर्समधील प्रत्येकाल ड्रेसकोड आहेत. त्याचबरोबर दाक्षिणात्य पद्धतीचे मांडे, उकडीचे मोदक महाराष्ट्रायीन गाजर हलवा, पुरळपोळी यांसारख्या पदार्थांना जास्त मागणी आहे.
-


स्टेज डेकोरेशन 
पूर्वी मंगल कार्यालयातील मंचावर थर्माकॉलमध्ये कोरलेले वधू-वरांचे नाव आणि बाजूने फुलांच्या माळा सोडल्या की मंचाची सजावट होत असे. मात्र, आता सोलापुरात मुंबई, पुणे आणि अन्य शहराप्रमाणे सजावटीला खूप महत्त्व आले आहे. लग्न धूमधडाक्‍यात आणि चांगले होण्याकरिता मंचावर सजावट चांगली दिसावी याकरिता शोभेच्या आणि नैसर्गिक फुलांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. झाडांच्या वाळलेल्या फांद्यांचे डेकोरेशन करण्याचा कल सध्या वाढला आहे. कार्यालयाच्या प्रवेशद्वारापासून संपूर्ण मंगल कार्यालयात सजावट करा अशी मागणी असते. त्यात फ्लॉवर शॉवर, कोल्ड शॉवरला मागणी आहे. सध्या सजावटीचे दर 15 हजारांपासून ते चार लाखांपर्यंत आहेत. त्याचबरोबर लग्न समारंभात सेल्फी पॉइंटकडे कल आहे. 
-


बॅंडबाजा 
पूर्वी लग्नात फक्त बॅंडबाजा असत. आता काळानुसार आणि ग्राहकांच्या मागणीनुसार मुंबई, पुण्याच्या धर्तीवर 407 रिव्हर्स गाडीची क्रेझ वाढत आहे. यात गायक आणि गायिका असते. त्याचबरोबर इको पॅड, कच्ची, ढोल, ताशा, पराग या वाद्यांचा समावेश असतो. यात मराठमोळ्या गाण्यांना जास्त मागणी आहे. ब्रॉझ बॅंड, म्युझिकल बॅंड, सनई, चौघड्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्याचबरोबर वरातीत नाचणारा घोडा आणि घोडीला जास्त मागणी आहे. 

हेही वाचा : अजित पवार यांच्या बंडखोरीचा सात बारा

विद्युत रोषणाई 
पूर्वी लग्नात कार्यालयाबाहेर प्रकाशझोतासाठी मोठे हॅलोजन लावत. घरासमोर हॅलोजन लावण्याची पद्धत होती. त्यानंतर मंगल कार्यालय इमारत आणि घराच्या इमारतीवर विद्युत रोषणाईसाठी माळा सोडण्यात येत होत्या. आता त्या पद्धतीत बदल होऊन विविध रंगाच्या माळा त्याचबरोबर सध्या एलईडी लाइटला जास्त मागणी आहे. फिक्‍सल कलर लाइट, मल्टिकलर याचे हॅलोजन आणि एलईडी लाइट वापरून विद्युत रोषणाई करण्यात येते. ग्राहकांच्या मागणीनुसार रोषणाई केली जाते. डेकोरेशनसाठी 10 हजारांपासून लाखापर्यंत रक्‍कम.
-
मंडप 
सध्या जुन्या पद्धतीचे लग्न मंडप हद्दपार झाले आहेत. मंडपांत डेकोरेशन मंडप, बंगाली पद्धतीचा मंडप, राजस्थानी मंडप अशा मंडपांचे आकर्षण वाढत आहे. स्वागत समारंभासाठी बंगाली आणि राजस्थानी पद्धतीच्या मंडपाला जास्त मागणी आहे. घराच्या एका भिंतीवर एका रंगाचा तर दुसऱ्या भिंतीवर दुसऱ्या रंगाचा पडदा असतो त्याप्रमाणे मंडपास वेगवेगळ्या बाजूने वेगळा आणि आकर्षक रंगाच्या पडद्याला जास्त मागणी आहे. 
-

पेहराव 
आजची तरुणाई कितीही आधुनिक असली तरी लग्नसोहळ्यातील पेहराव मात्र रूढीनुसार करत आहे. आजकाल लग्नात नवरी जास्त करून नऊवारी साडीत दिसत आहे. नऊवारी साडी, जरीचा शेला, डोक्‍यावर मुंडावळ्या, भरगच्च दागिने, हातात हिरवा चुडा, कपाळावर चंद्रकोर आणि नाकात नथ अशी अस्सल मराठमोळी नवरी पाहण्यात येत आहे. मुलींसोबतच मुले आपला लग्न दिवस हा मराठमोळ्या फॅशनने सजवतात. त्यात धोतर, कुर्ता, डोक्‍यावर पगडी, फेटा असा पेहराव करतात. नववधू घागरा किंवा लेंहगा वापरण्याकडे जास्त भर देत आहे. काही घागरा स्लीम फीट तर काही घेरदार असतात. नवरदेवाच्या इंडो-वेस्टर्न लूकलाही आजकाल पसंती दिली जात आहे. पूर्वीची शेरवानी आजही त्याच जोमात पाहण्यात येत आहे. काळानुसार मुलेही आता दागिने घालण्यास पसंती देतात. मोत्यांच्या माळा, ब्रोच, कडा घालण्याकडे त्यांचा कल दिसतो. 
-

नववधूच्या दागिन्यांतील वैविध्यता 
नववधूच्या कपड्याप्रमाणेच दागिन्यांतही अगदी बारकाईने पाहिले जाते. सोन्यासोबतच प्लॅटिनम, कुंदन, अँटिक गोल्डचा वापर होऊ लागला आहे. रंगीत खडे मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहे. तसेच लग्नात आर्टिफिशियल दागिन्यांना जास्त पसंती दिली जात आहे. दागिन्यांत पारंपरिक आकारांची जागा नवीन आकारांनी घेतली आहे. 

वधू-वरांची पादत्राणे 
लग्नात वेगवेगळ्या कपड्यांसोबतच पादत्राणांचाही प्रामुख्याने विचार केला जातो. नववधूंचा स्टायलीश पादत्राणे घेण्याकडे कल असतो. सध्या लग्नात चप्पल, सॅंडल, जुती, कोल्हापुरी चप्पल अचे चार-पाच जोड खरेदी केले जातात. मणी, स्टोन, डायमंड, जरदोसी वापरून नाजूक नक्षकाम केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या चपला खरेदी करण्याकडे जास्त भर दिला जात आहे. पूर्वी मरून, गोल्डन, सिल्व्हर या रंगांत उपलब्ध होणाऱ्या चपलांत आता पिवळा, हिरवा, निळा, लाल असे रंग आले आहे. साधारण हजार रुपयांपासून आपल्या आवडीनुसार डिझायनर चपलांची किमत असून उपलब्ध आहेत. 
---- 
मेंदी 
भारतीय संस्कृतीत हातांना मेंदी लावल्याशिवाय कोणताही समारंभ पूर्ण होत नाही. लग्नात नवरीच्या हातावर मेंदी काढणे हा तर खास सोहळाच बनला आहे. नववधूचे पूर्ण हात आणि पाय भरून मेंदी काढली जाते. हल्ली अगदी चित्रपटांसारखेच मेंदी कार्यक़्रम घेतले जातात. नववधू सोबतच पूर्ण नातेवाईक, मैत्रिणी त्या कार्यक़्रमात मेंदी काढताना डान्स, मस्ती, धमाल करतात. 


मैफल संगीताची 
चित्रपट- मालिकांप्रमाणेच आता खऱ्याखुऱ्या लग्नातही विविध कार्यक्रम केले जात आहेत. त्यात लक्षवेधी असतो तो संगीत सोहळा. आपल्या मराठमोळ्या लग्नविधीत संगीत हा विधी नसतोच. आज आपण अशा अनेक रूढी आणि संस्कार आत्मसात केले आहेत. ते आपल्याला सुखावून जातात आणि लग्नसोहळ्याचा आनंद आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाइकांसोबतच द्विगुणीत करतात. संगीत म्हणजेच धमाल, मस्ती, नाचणे. आता विविध पद्धतीने हा संगीत सोहळा रंगतोय. संगीताचा कार्यक़्रम आजच्या लग्नांत मस्ट बनला आहे.
-
सोलापुरात इव्हेंन्ट मॅनेजमेंट कंपनीची गरज आहे. कंपनीला चांगला प्रतिसाद मिळतो. आम्ही लग्नासोबतच अन्य विविध कार्यक्रमांचे मॅनेजमेंट करतो. 
- अनिष सहस्त्रबुद्धे, इव्हेंट मॅनेजर 
-
सध्या बदलत्या काळानुसार सुविधा देणाऱ्या कार्यालयांना मागणी जास्त आहेत. जुन्या पद्धतीच्या मंगल कार्यालयांत मोठ्या प्रमाणावर लग्न होतात. मंगल कार्यालयासोबतच अन्य सुविधा असलेल्या लॉनलाही मागणी वाढलेली आहे. 
- सोज्वळ राऊळ, मंगल कार्यालय मालक 
-
केटरर्सकडून ग्राहकांच्या अपेक्षा वाढत आहेत. त्याचबरोबर लग्नात हळदीच्या दिवशी एकप्रकारचे जेवण तर लग्नाचे जेवण दुसऱ्या पद्धतीने करण्याचा ट्रेंड सध्या वाढला आहे. 
- प्रसाद कुलकर्णी, केटर्स 

मुंबई, पुण्याच्या धर्तीवर सोलापुरात सजावटीचा कल वाढत आहे. सजावटीसाठी सोलापूरसह इंचलकंरजी, पुणे, हैद्राबाद येथून फुले मागविली जातात. 
- लखन सलगर, डेकोरेटर्स 
-
पारंपरिक बॅंडबरोबर सध्या 407 रिव्हर्स गाडीला प्राधान्य दिले जात आहे. मराठमोळी गाणी आणि लावणी त्याचबरोबर जुन्या जमान्यातील गाणी वरातीत वाजविली जातात. त्यातून गाणे म्हणणाऱ्या गायकांना रोजगार मिळत आहे. 
- राजाराम जाधव, बॅंड वादक 

सध्या विविध पद्धतीच्या लाइट डेकोरेशनला मागणी आहे. त्यासाठी ग्राहक मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करण्यासाठी तयार असतात. पूर्वीच्या पद्धतीत बदल झाला आहे. 
- गणेश भोसले, लाइट डेकोरेटर 
-
सध्या मंडप व्यवसायातील जुन्या व्यावसायिकांचे ना नफा ना तोटा या तत्त्वावर व्यवसाय सुरू आहेत. मंगल कार्यालय आणि लॉन वाढल्याने मंडप व्यवसाय काही प्रमाणात अडचणीत आला आहे. 
- शशिकांत पाटील, 
मंडप कंत्राटदार 

 


मार्केटमध्ये वधू- वरांसाठी नवनवीन पादत्राणे उपलब्ध असून त्यात व्हरायटीचे आकर्षण अनेकांना आहे. त्यामुळे या पादत्रणांना जास्त मागणी आहे. पूर्वीपेक्षा मरून, गोल्डन, सिल्व्हर या रंगांव्यतिरिक्त नवीन रंगांकडे कल दिसून येत आहे. 
- राहुल अंकम, विक्रेते 
-
नववधूच्या हातावर मेंदी काढणे तसेच त्यातील डिझाईन, त्या मेंदीचा रंग उजळण्यासाठी जास्त लक्ष द्यावे लागते. पूर्वीपेक्षा आता मेंदीत अनेक डिझाईन आहेत. त्यामुळे वधूसोबत  नातेवाईकदेखील पार्लरकडून मेंदी काढून घेतात. 
- रेखा पारेकर, ब्युटीशियन 
-
"प्री-वेडिंग शूट'साठी वधू-वर उत्सुक ! 
पुणे, मुंबईसह अन्य भागात येणारी फॅशन सगळीकडे डोकावत आहे. त्यात प्री-वेडिंग ही संकल्पना विवाह जमलेल्या वधू-वरांच्या मनात अवतरली आहे. नव्या किमयागारांनी ही वेगळी फिल्मी दुनिया नव्या कल्पनांसाठी वास्तवात उतरवली आहे. प्री-वेडिंग शूट हा शब्द सध्या तरुणाईला हवाहवासा झाला आहे. फेसबुक इन्स्टाग्रामवरून हे सर्व अल्बम पाहताना जसा आनंद होतो त्याप्रमाणे आपणही केले पाहिजे असे प्रत्येकाच्या मनात येत आहे. प्री-वेडिंग शूट हे सध्याचं वेड आहे. प्री-वेडिंग असे हे हळवे महत्त्वाचे क्षण चित्रित करणाऱ्या वेगवेगळ्या संकल्पना दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहेत. 

प्रकार दर (रुपयांत) 
फोटोशूट- 15 ते 20 हजार 
व्हिडिओ शूट- 35 ते 45 हजार 
फोटो विथ व्हिडिओ शूट- 50 हजार 
-
हा आहे ट्रेंड
हल्ली प्री-वेडिंग शूट करण्याचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत आहे. प्री-वेडिंग फोटोशूट म्हणजे प्रत्येक फोटोग्राफरसाठी संघर्ष असतो. परंतु आता त्याचा वाढता ट्रेंड लक्षात घेता क्रेझ वाढली आहे. मी आतापर्यंत सोलापूरसह, पुणे, कोकण येथे शूटसाठी जाऊन आलो आहे. 
- निखिल चिप्पा, फोटोग्राफर 

प्री- वेडिंग शूटकडे कल
हौसेला मोल नसते, ते प्री-वेडिंग शूटवरून सध्या जास्त दिसून येत आहे. सध्याची तरुणाई प्री-वेडिंग शूट करण्याकडे आकर्षिली आहे. 
- सिद्धेश्‍वर पुजारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com