तंत्रज्ञानातील शब्दांना आपलेसे करावे मराठीने - डॉ. अक्षयकुमार काळे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 डिसेंबर 2016

सोलापूर - वाढत्या तंत्रज्ञानाबरोबर अनेक नव्या शब्दांचीही निर्मिती होत आहे. या शब्दांना मराठीत पर्यायी शब्द तयार करून ते भाषेत समाविष्ट करणे अधिक जिकरीचे आहे. यापूर्वीही अनेक भाषांतून शब्द मराठीत आले आहेत. त्यामुळे तंत्रज्ञानातून आलेले शब्द आपण आहेत तसे स्वीकारले पाहिजेत असे मत डोंबिवली येथे होणाऱ्या 90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी मांडले.

अ.भा. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सोलापूरच्या दौऱ्यात त्यांनी सकाळ कार्यालयास रविवारी भेट दिली. यावेळी सकाळ चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी यांनी त्यांचा सत्कार केला. डॉ. काळे म्हणाले, वाचन संस्कृतीचा विकास होणे साहित्य, भाषा विद्यार्थी कसे शिकतात त्यावर अवलंबून आहे. वाचनसंस्कृतीचा विकास होणार नाही तोपर्यंत साहित्य आस्वादकांपर्यंत पोचणार नाही. अन्यथा साहित्य पुस्तकांच्या कपाटातच बंदिस्त राहील. वाचनाची आवड समाजात निर्माण व्हावी याकरिता कमी किमतीत पुस्तके कशी उपलब्ध होतील याचा विचार व्हावा. प्रकाशकांनी ग्रंथांना सजावट करून महागडे ग्रंथ बनविण्यापेक्षा गरिबांनाही परवडतील असे ग्रंथ दिल्यास मराठी भाषा तळागाळातील व्यक्तींपर्यंत पोचण्यास मदत होणार आहे. यासाठी शासनाचे सहकार्य मिळण्याची आवश्‍यकता आहे.

जातींवर आधारित साहित्य संमेलने होणे गैर नाही. अखिल भारतीय साहित्य संमेलनात सर्वांनाच संधी मिळत नसल्यामुळे अशा छोट्या संमेलनातून साहित्यिकांच्या प्रतिभेला वाव मिळतो. मात्र अशा संमेलनाचे प्रयोजन जातीशी संबंधित आहे की साहित्याशी संबंधित आहे यावर ते योग्य कि अयोग्य हे ठरवावे लागेल. जातीपातीतील वैमनस्य समाजातून नष्ट झाले पाहिजे. प्रसारमाध्यमांनीही यात भूमिका बजावणे आवश्‍यक असल्याचे डॉ. काळे यांनी सांगितले.

जागृत करूया मनातील चेतना
भाषा संवर्धनासाठी केवळ शासनाकडून अपेक्षा करून भागणार नाही. शासनाची मदत संस्था, जनतेपर्यंत पोचतच असते. परंतु संवर्धनाचे काम मूलत: नागरिकांनी करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी सरकारच्या पैशांकडे पाहण्यापेक्षा मानवी मनातील चेतना जागृत करण्याचे काम आपल्याला करायचे आहे असेही डॉ. काळे म्हणाले.

Web Title: Make words to marathi technology