देसाई-पाटणकर गटांत संघर्ष अटळ

विलास माने
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

मल्हारपेठ - मारुल हवेलीसह मल्हारपेठ जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायत निवडणुकीत देसाई-पाटणकर या पारंपरिक गटांतच संघर्ष अटळ आहे.

शिवसेनाही रिंगणात उतरत आहे. दोन्ही गटांना आव्हान देण्यासाठी शिवसेनेने केलेली व्यूहरचना चर्चेचा विषय ठरत आहे. कोणत्या गटाला दिवाळी गोड लागणार, याचे राजकीय आखाडे गावोगावी रंगू लागले आहेत. जेवणावळींना ऊत आला आहे. ऐन सण अन्‌ सुगीच्या काळात उमेदवार बांधापर्यंत जाऊन शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेताना दिसत आहेत. 

मल्हारपेठ - मारुल हवेलीसह मल्हारपेठ जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायत निवडणुकीत देसाई-पाटणकर या पारंपरिक गटांतच संघर्ष अटळ आहे.

शिवसेनाही रिंगणात उतरत आहे. दोन्ही गटांना आव्हान देण्यासाठी शिवसेनेने केलेली व्यूहरचना चर्चेचा विषय ठरत आहे. कोणत्या गटाला दिवाळी गोड लागणार, याचे राजकीय आखाडे गावोगावी रंगू लागले आहेत. जेवणावळींना ऊत आला आहे. ऐन सण अन्‌ सुगीच्या काळात उमेदवार बांधापर्यंत जाऊन शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेताना दिसत आहेत. 

बदललेल्या सरपंचपदाच्या निवडीच्या निकषामुळे सत्ता स्थापन करण्याचे समीकरण बदलू पाहत आहे. राजकीय गटाचा सरपंचपदावर डोळा आहे. काही ग्रामपंचायतींवर महिला सरपंच विराजमान होणार असल्याने राजकीय पुढाऱ्यांची उपसरपंचपदावर नजर दिसते. काही ठिकाणी दुरंगी, तर काही ठिकाणी तिरंगी लढत होणार असल्याचे वातावरण आहे. मल्हारपेठ जिल्हा परिषद गटात शेडगेवाडी, निसरे, उरुल, आबदारवाडी, नाडे, आडुळ, आडुळपेठ, डिगेवाडी, डावरी, वेताळवाडी ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

त्यात निसरे, उरुल, आडुळ, नाडे या मोठ्या ग्रामपंचायती आहेत. निसरेत पाटणकर गटाची सरशी आहे. उरुलमध्ये देसाई गट सत्तेत आहे.

सरपंचपदासाठी पाटणकर गटाने नवी चाल खेळली आहे. त्यामुळे उरुलमध्ये सत्ता बदलणार का, याची उत्सुकता आहे. आडूळमध्ये देसाई गटाची सत्ता आहे. आडुळपेठमध्ये पाटणकर गटाची सत्ता आहे. जिल्हा परिषद सदस्य विजय पवार यांच्या नाडे ग्रामपंचायतीत धुमशान पाहायला मिळणार आहे. सरपंचपद सर्वसाधारण पुरुषासाठी आरक्षित आहे. देसाई व पाटणकर गटांकडून तोडीस तोड उमेदवार देण्याची चढाओढ सुरू आहे. विजय पवार यांचीही जबाबदारी वाढली आहे. 

मारुल हवेली जिल्हा परिषद गटात मारुल हवेलीसह बहुले, गारवडे, नाटोशी अशा मोठ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. मारुल हवेलीची निवडणूक वेगळ्या वळणावर आहे. सलग दोन पंचवार्षिक निवडणुका माजी खासदार व सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचे पुत्र व युवा नेते सारंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध पार पडल्या आहेत. देसाई गटाशी हातमिळवणी करत सारंग पाटील यांनी निवडणुका बिनविरोध केल्या आहेत. देसाई गटाचे कट्टर समर्थक व कारखान्याचे अध्यक्ष आशोकराव पाटील हे निवडणुकीत काय भूमिका घेतात, याकडे लक्ष आहे. गारवडे, बहुलेत देसाई गटाचे मिलिंद पाटील हे कशी जुळवाजुळव करतात, त्याकडे मतदारांचे लक्ष आहे.
 

नाटोशी गणात देसाई गटाला अडविण्याचा डाव
नाटोशी हा पंचायत समितीचा गण आहे. तेथेही दोन्ही गट समसमान चालतात. मात्र विभागात शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष हर्षद कदम यांनी कार्यकर्ते तयार केले आहेत. या निवडणुकीत ते काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मुळातच देसाई गटाचा हा बालेकिल्ला असल्याने तो अभेद्य ठेवण्यासाठी देसाई गट कामाला लागला आहे. त्याला हर्षद कदम व युवा नेते सत्यजिय पाटणकर यांच्या गनिमाकाव्याशी सामना करावा लागणार आहे. 

Web Title: malharpeth satara news grampanchyat election