कराडनजीक अपघातात मलकापूरच्या नगरसेवकांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जुलै 2019

टायर पंक्चर झाल्याने रस्त्यावर थांबलेल्या डंपरला पवार यांच्या कारची जोरदार धडक बसली. त्यात पवार यांच्यासह गाडीत बसलेले आणखी तिघे गंभीर जखमी झाले होते.

मलकापूर (कराड) : मलकापूर नगरपालिकेचे नगरसेवक व नियोजन, शिक्षण सभापती दत्ता सीताराम पवार (वय 38) यांचे अपघाती निधन झाले. पुणे-बंगळुरू महामार्गावर कराडनजीक मलकापूरच्या हद्दीत शनिवारी (ता.13) मध्यरात्री बाराच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात त्यांच्यासह आणखी तिघेजण जखमी झाले होते.

शनिवार रात्री एका कामानिमित्त ते परगावी गेले होते. परत कराडला येत असताना त्यांचा अपघात झाला. टायर पंक्चर झाल्याने रस्त्यावर थांबलेल्या डंपरला पवार यांच्या कारची जोरदार धडक बसली. त्यात पवार यांच्यासह गाडीत बसलेले आणखी तिघे गंभीर जखमी झाले होते. काल रात्रीच त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले होते. मात्र, आज दुपारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

पवार यांचे संघटन कौशल्य अतिशय चांगले होते. ते आगाशिवनगर येथील इंद्रप्रस्थ काॅलनी येथील स्थानिक रहिवासी होते. फेब्रुवारीमध्ये झालेल्या मलकापूरच्या निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले होते. त्यांचा जनसंपर्क व युवकांशी मोठा संपर्क आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त कऱ्हाड व मलकापूर परिसरात समजताच हळहळ व्यक्त होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Malkapur corporators killed in a road accident near Karad