'मलकापूरला क वर्ग नगरपरिषदेचा दर्जा मिळावा'

Sakal | Sunday, 6 May 2018

नगरपरिषदोचा दर्जा देण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत एकमताने झाला होता. मात्र जो ओबीसी उमेदवार नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत खुल्या वर्गाच्या जागेवरून उभा राहून विजयी झाला तीच व्यक्ती आज नगराध्यक्षपदाच्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करून उपोषणाला बसली होती.

मलकापूर (ता. कऱ्हाड) : येथील नगराध्यक्षपदाचे ओबीसी आरक्षण कायम ठेवून क वर्ग नगरपरिषदेचा दर्जा मिळावा, असा ठराव उपाध्यक्ष मनोहर शिंदे यांनी मांडला. 

नगरपरिषदोचा दर्जा देण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत एकमताने झाला होता. मात्र जो ओबीसी उमेदवार नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत खुल्या वर्गाच्या जागेवरून उभा राहून विजयी झाला तीच व्यक्ती आज नगराध्यक्षपदाच्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करून उपोषणाला बसली होती. विकासात अडथळा आणणारी प्रवृत्ती आमची नाही त्यामुळे सध्याचे नगराध्यक्षपदाचे ओबीसी आरक्षण कायम ठेवून नगरपरिषद दर्जा द्यावा असेही यावेळी शिंदे यांनी स्पष्ट केले. नगराध्यक्षा सुनिता पोळ अध्यक्षस्थानी होत्या.

सभेत रस्त्यांसह साडेतीन कोटींच्या विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली. विषय पत्रिकेवरील 20 विषयांवर चर्चा झाल्यानंतर ऐनवेळच्या विषयात बोलताना शिंदे म्हणाले, शहराच्यादृष्टीने नगरपंचायतीचे सभागृह सर्वोच्च आहे. या सभागृहातच हणमंतराव जाधव, राजेंद्र यादव, शंकरराव चांदे यांच्यासह सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत क वर्ग नगरपरिषद करण्याचा ठराव झाला. नगरपरिषद झाल्यावर शहराला जादाचा निधी मिळणार आहे. मात्र काहीजण सध्याच्या नगरपंचायतीच्या आरक्षणाचा मुद्दा पुढे करून उपोषणाला बसली होती. वास्तविक जे उपोषणाला बसले होते त्यांना स्वतःला आमच्या पार्टीतून खुल्या वर्गाच्या प्रभागातुन उमेदवारी दिली होती. त्यांच्यासाठी खुल्या वर्गातील चार मातब्बर इच्छुकांनी माघार घेतली होती. राजकारण करताना विकासाच्या आड येणारी आमची प्रवृत्ती नाही. त्यामुळे त्यांच्या मागणीनुसार सध्याचे नगराध्यक्षपदाचे ओबीसी पुरूष आरक्षण कायम ठेवण्याचा ठराव मांडत आहे. हा ठराव घेऊन नगरसेवकांचे शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटून विनंती करणार आहे. 

कोयना वसाहतीचे सांडपाणी मलकापूरच्या हद्दीतील खंडोबानगर परिसरात येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आल्याचा मुद्दा शिंदे यांनी उपस्थित केला. यावर राजेंद्र यादव म्हणाले, त्या सांडपाण्याची विल्हेवाट लावताना पुन्हा मलकापुरकरांना त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. शिंदे म्हणाले, या विषयावर एक बैठक झाली असून त्या बैठकीत बंदीस्त पाईपद्वारे सांडपाणी ओढय़ाला सोडण्याचा निर्णय झाला आहे. मात्र सांडपाणी पुन्हा उघडय़ावर आले नाही पाहिजे. यासाठी नगरसेवक, मुख्याधिकारी आणि कोयनावसाहतीचे पदाधिकारी, अधिकारी संयुक्त पाहणी करूयात. पाहणीनंतर योग्य त्या ठिकाणी पाण्याची विल्हेवाट लावण्याचा आपण प्रयत्न करू असे सांगण्यात आले.