शेतीत 25 हजार कोटींची गुंतवणूक करू - मुख्यमंत्री फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

मलकापूर - नरेंद्र मोदी सरकारने कृषी सिंचाई योजनेंतर्गत 26 हजार कोटी रुपये राज्याला दिले. त्यातून सिंचनाचे रखडलेले प्रकल्प मार्गी लावले जातील. गुंतवणुकीचे क्षेत्र म्हणून विकास करण्यासाठी आगामी काळात शेतीत 25 हजार कोटींची गुंतवणूक केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. प्रत्येक निवडणुकीत भाजप नंबर एक पक्ष ठरत आहे. विरोधकांनी त्यांची ऊर्जा विरोधासाठी न वापरता "जलयुक्त'च्या कामांमध्ये सकारात्मक पद्धतीने वापरून शेतकऱ्यांना मदत करावी, असा खोचक सल्लाही त्यांनी विरोधकांना दिला.

मलकापूर येथे भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे चिटणीस अतुल भोसले, प्रवक्ते माधव भंडारी, आमदार महेश लांडगे, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, महिला प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, मदनराव मोहिते, डॉ. सुरेश भोसले, भरत पाटील, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, गजानन बाबर, जगदीश जगताप, डॉ. दिलीप येळगावकर, अनिल देसाई, पृथ्वीराज देशमुख, एकनाथ बागडी, दीपक पवार, मनोज घोरपडे, सागर शिवदास आदी उपस्थित होते.

श्री. फडणवीस म्हणाले, 'शेती क्षेत्राकडे मदत आणि पुनर्वसनाच्या पलीकडे पाहिले जात नव्हते. त्यामध्ये बदल करून हे क्षेत्र आम्ही गुंतवणुकीचे क्षेत्र म्हणून विकसित करण्यासाठी प्राधान्य दिले. आगामी काळात राज्यात शेतीमध्ये 25 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल. सातारा जिल्ह्यात जलयुक्त शिवारमधून प्रचंड काम सुरू आहे.

हजारो लोकांच्या मेहनतीतून जिल्ह्यातील दुष्काळी चित्र पालटेल.'' ते म्हणाले, 'राज्यातील सिंचनाचे प्रकल्प रखडले आहेत. मोदी सरकारने कृषी सिंचाई योजनेंतर्गत 26 हजार कोटी रुपये दिलेत. त्यातून ही कामे मार्गी लागतील. कृष्णा खोऱ्यातील प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मागच्या 15 वर्षांत केवळ चर्चा झाली, काम झाले नाही. त्यासाठी आलेला निधी कुठे गेला, हे माहीत नाही. त्याही प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात निधी दिला जाईल. सोलर फिडरवर शेतकऱ्यांना 12 तास वीज दिली जाईल. राज्यात उत्पादकता कमी असल्यामुळे हमीभाव कमी वाटतो. उत्पादन वाढीसाठी शासनाने योजना सुरू केली आहे. समूह शेतीलाही प्राधान्य देत आहोत. एकीकडे असे चित्र असताना काही लोक विरोध करत आहेत.

विरोधकांनी त्यांची ऊर्जा विरोधासाठी खर्च न करता दोन गावे दत्तक घ्यावीत, तेथील शेतकऱ्यांना "जलयुक्त'च्या कामात मदत करावी, त्यातून शेतकऱ्यांचे भले होईल.'' "जलस्वराज्य' योजनेतून वडगाव हवेली, मुंढेच्या पाणी योजना मार्गी लावू, मलकापूर नगरपंचायतीऐवजी नगरपालिका करण्यासाठी व महाबळेश्‍वरला देशातील उत्तम शहर बनवण्यासाठी प्रयत्न करू आदी आश्‍वासनेही मुख्यमंत्र्यांनी दिली.
पश्‍चिम महाराष्ट्र हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्याला आता सुरुंग लागला आहे. कॉंग्रेसचे अनेक नेते "आमच्याकडे काही शिल्लक ठेवा', असे म्हणत आहेत, असे सांगून महसूलमंत्री श्री. पाटील म्हणाले, 'आम्हाला जे घेता येणार नाहीत, ते तुमच्यासाठी शिल्लक ठेवू. आज खूप जणांचा पक्षात प्रवेश झाला. काही जणांचा निर्णय झालेला नाही. पुढच्या आठ-दहा दिवसांत त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश होईल.'' बळिराजा संघटनेचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आले. पण, ते मागण्याच सांगायला विसरले, हा प्रकारही त्यांनी निदर्शनास आणून दिला. अतुल भोसले यांनी मलकापुरातील प्रश्‍नांचा आढावा घेतला. बाळासाहेब घाडगे यांनी आभार मानले.

मुख्यमंत्री म्हणाले...
- शेतीत गुंतवणुकीला प्राधान्य देणार
- सोलर फिडरवर शेतकऱ्यांना 12 तास वीज
- कृष्णा खोऱ्यातील रखडलेल्या प्रकल्पांना निधी देणार
- "जलयुक्त'मधून साताऱ्यातील दुष्काळाचे चित्र बदलेल
- महाबळेश्‍वर देशातील उत्तम शहर बनवणार

Web Title: malkapur news 25000 crore investment in agriculture