चित्तथरारक ! तलवारीसह मल्लखांबाची प्रात्यक्षिके (व्हिडिओ)

संदीप खांडेकर
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

वयाच्या आठव्या वर्षी सिद्धेशने अंगाला पीळ दिला. शालेय चौदा वर्षाखालील गटात जिम्नॅस्टिक्स,‌मल्लखांब, डायव्हिंगमध्ये‌ त्याने कास्यपदकावर मोहोर उमटवली.

कोल्हापूर - सिद्धेश सुरेश गवळी याने दोन्ही हातात तलवारी घेतल्या. उडी मारून मल्लखांबाला पायांची कैची केली. सिद्धेश जमिनीवर कोसळल्याची भावना होऊन उपस्थितांच काळीज हाललं. अंगभूत कौशल्य सादर करत सिद्धेश मात्र खांबावर स्वार झाला. चपळता, काटकता, लवचिकतेचा लेप त्याच्या अंगावर चढला. तो मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर करत असताना उपस्थितांचे डोळे विस्फारले. तलवारीच्या साह्याने त्याने केलेल्या मल्लखांबातील कौशल्याला टाळ्या-शिट्यांचा जोर चढला.

चोपडे सरांचे मार्गदर्शन

वयाच्या आठव्या वर्षी सिद्धेशने अंगाला पीळ दिला. गांधी मैदानापासून जिम्नॅस्टिक हाॅल हाकेच्या अंतरावर त्याचे घर. विश्वास चोपडे शिस्त व हाडाचे प्रशिक्षक. सिद्धेशची हाडं मोडण्याचं कसब त्यांना नवं नव्हतं. शिक्षणाचा श्रीगणेशा करण्यासाठी महाराष्ट्र हायस्कूलमध्ये सिद्धेशचा दाखला जोडला गेला होता. चोपडे सरांच्या मार्गदर्शनाखाली त्याच शरीर आकार घेत होतं. विशाल पाटील यांच्या ‌करड्या नजरेपासून त्याची सुटका नव्हती.‌ सकाळी सातला हाॅलमध्ये टच झालं पाहिजे, हा तिथला पायंडा. तो मोडल्यानंतर काय ‌होते, याचा अनुभव त्याने अनेकवेळा घेतला. वाॅर्म-अपमधील ‌कसूरही महागात पडली होती.

विभागीय स्तरावर सुवर्णपदक

जिम्नॅस्टिक्स व मल्लखांबमधलं बेसिक पक्कं‌ होत असताना, चोपडे सरांची त्याच्या पाठीवर थाप पडत होती. स्पर्धेत उतरण्यासाठी आवश्यक बळ त्याला मिळत होतं. शालेय चौदा वर्षाखालील गटात जिम्नॅस्टिक्स,‌मल्लखांब, डायव्हिंगमध्ये‌ त्याने कास्यपदकावर मोहोर उमटवली. एकोणीस वर्षाखालील गटात जिल्हा पातळीवर चमकल्यानंतर विभागीय स्तरावर तो सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. त्याचा परफाॅर्मन्स भरात असताना अभ्यासातील दगा फटक्याची किंमत मोजण्याची त्याची तयारी नव्हती. मल्लखांबमधील अनेक प्रकार अंगात मुरवत असताना नवं शिकण्याची त्याच्यात अस्वस्थताही होती. दोरी, ऊस, पुरलेला, टांगता व बाटलीवरचा मल्लखांब शिकणं म्हणजे मान मोडून घेण्याचं काम. तलवार घेऊन मल्लखांब शिकण्याची त्याची ओढ चोपडे सरांनी हेरली.

हातात मशालींसह ‌सिद्धेशचा‌ मल्लखांब डोळ्यात भरणारा

दोन्ही पायांची मल्लखांबावर कसरत सुरू झाली. हातात प्लास्टिकच्या तलवारी घेऊन पायांची बिनचूक कैची खांबाभोवती कशी टाकावी,‌ याचे धडे सुरू झाले. शरीरावरील दुखापतीमुळे घरचे डोळे वटारणार नाहीत, याची काळजी तो घेत होता. चाकू घेऊन तो मल्लखांबाला बिलगत राहिला. बॅलन्स ढळणार नाही, यावर त्याचा कटाक्ष होताच. धारेच्या लोखंडी तलवारीवर त्याचा सराव सुरू झाल्यानंतर चोपडे सरांनी डोळ्यात तेल घातले. त्याच्या भोवती त्यांचा संरक्षक पहारा होता. पाठीवर शाबासकीची थाप मिळत असल्याने ठिकठिकाणी प्रात्यक्षिकांवेळी ‌तो तलवारी घेऊन वीजेप्रमाणे तळपत राहतो. हातात मशालींसह ‌त्याचा‌ मल्लखांब डोळ्यात भरणारा ठरतो.

आजही त्याच्या प्रात्यक्षिकांचा बोलबाला सर्वत्र होत आहे. महाराष्ट्र हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये तो बारावी‌ एमसीव्हीसीचे धडे शिकत आहे. आजही त्याचा सराव सुरू आहे. आगळ्या-वेगळ्या स्किलमधून मल्लखांबाच्या प्रसाराचे ध्येय चोपडे सरांसमोर आहे. त्याला सिद्धेशसारखे खेळाडू हातभार लावत आहेत. कोल्हापुरी टॅलेंटची प्रचिती देत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Malkhamb Player With A Sword In His Hand Kolhapuri Skill