मेव्हणीने प्रेमात धोका दिल्याने 2 मुले व मुलीस विष पाजून आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

- माढा तालुक्‍यातील बेंबळे येथील घटना
- आरोपी पुणे जिल्ह्यातील

टेंभुर्णी : मेव्हणीने प्रेमसंबंधामध्ये विश्वासघात केल्याच्या कारणावरून दोन मुले आणि एका मुलीस भजी व शितपेयामधून विष पाजून स्वतः झाडास गळफास घेऊन एकाने आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री यातील दोन मुलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून मुलीवर उपचार सुरू आहेत.

बेंबळे (ता. माढा) येथील उजनी डावा किलोमीटर एक्कावन्न नजीक ही हृदयद्रावक घटना गुरूवारी सायंकाळी घडली. मयत व्यक्ती पुणे जिल्ह्यातील वडापूरी ( इंदापूर) येथील रहिवासी असून काल मुलांना घेऊन बेंबळे येथील मेव्हणीकडे तो आला होता. या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. 

रवींद्र प्रभाकर लोखंडे ( वय-35 ), मुलगी अनुष्का (वय-11), मुलगा अजिंक्‍य (वय-9) व आयुष (वय- 6 सर्वजण राहणार वडापूरी ता. इंदापूर जि. पुणे) येथील असून रविंद्र लोखंडे याने गळफास लावून आत्महत्या केली. विष पाजल्याने अजिंक्‍य व आयुष यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अनुष्कावर उपचार सुरू आहेत. 

रविंद्र प्रभाकर लोखंडे हा गुरूवारी दुपारी दोन मुले व एका मुलीस घेऊन बेंबळे येथील मेव्हणी सुनिता हरी कांबळे यांच्याकडे आला होता. परंतु त्यांच्या घरी कोणी नव्हते. त्यामुळे तो मुलांना घेऊन उजनी कालवा किलोमीटर एक्कावन्न मधील एका झाडाखाली जाऊन थांबला. तेथे त्याने मुलांना भजी व शितपेयामधून विष पाजले. मुलांना तहान लागल्याने शेजारच्या वस्तीवर जाऊन पाणी पिऊन या असे त्याने सांगितले. तीनही मुले शेजारच्या भारत शामराव हुलगे यांच्या वस्तीवर जाऊन पाणी पिऊन माघारी परत आली; तेव्हा वडील रविंद्र लोखंडे यांनी झाडाला गळफास घेतल्याचे दिसले. त्यांनी परत भारत हुलगेंकडे जाऊन आत्महत्येविषयी सांगितले.

मुलांनी आपण वडापूरी (ता. इंदापूर ) येथील राहणार असून बेंबळे येथील काका हरी नारायण कांबळे यांच्याकडे आल्याचे सांगितले. भारत हुलगे यांनी हरी कांबळे याच्या शेतमालक पिंटू भोसले यांना तातडीने या घटनेची माहिती दिली. दरम्यान या तीनही मुलांच्या उलट्या होऊ लागल्याने भारत हुलगे, पिंटू भोसले व हरी कांबळे यांनी प्रथम टेंभुर्णी येथे आणले. मुलांची प्रकृती चिंताजनक असल्याने नंतर इंदापूर येथे पुढील उपचारासाठी हलविले. आज अजिंक्‍य व आयुष या दोन्ही मुलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर मुलगी अनुष्कावर सोलापूर येथील सिव्हील हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत. 

टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम, हवालदार विलास बनसोडे, पोलीस कॉन्स्टेबल केशव झोळ हे रुग्णवाहिका घेऊन बेंबळे येथे आले. मयत रविंद्र लोखंडे याच्या कपड्याची तपासणी केली असता एक मोबाईल व खाकी रंगाचा बंद लिफाफा आढळून आला. लिफाफा उघडला असता त्यातील चिठ्ठीमध्ये मेव्हणी सुनिता कांबळे हिने प्रेमसंबंधामध्ये विश्वासघात केल्याने तिच्या गावी (बेंबळे) येथे त्याचा व मुलांचा अंत करीत असून त्यांच्या मरणास सुनिता कांबळे जबाबदार असल्याचे लिहिले आहे. या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात पोलीस पाटील बिभीषण किर्ते यांनी फिर्याद दाखल केली असून पुढील तपास हवालदार विलास बनसोडे करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: man committing suicide with two boys and a girl in Madha