लोणीतील गोळीबारात तरुणाचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 डिसेंबर 2019

लोणी येथील साई छत्रपती हॉटेलमध्ये रविवारी (ता. एक) रात्री साडेनऊच्या सुमारास पाच ते सात जण जेवणासाठी बसले होते. किरकोळ वादातून सुरवातीला त्यांच्यात आपसांत शाब्दिक बाचाबाची झाली.

लोणी (ता. राहाता) : गावातील हसनापूर रस्त्यावरील साई छत्रपती हॉटेलच्या आवारात रविवारी (ता. एक) रात्री दोन गटांत झालेल्या शाब्दिक वादातून गोळीबार करण्यात आला. त्यात एका तरुणाचा दवाखान्यात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. फरदीन ऊर्फ भय्या आबू कुरेशी (वय 18, रा. श्रीरामपूर), असे मृताचे नाव आहे. 

अशी घटली घटना 

लोणी येथील साई छत्रपती हॉटेलमध्ये रविवारी (ता. एक) रात्री साडेनऊच्या सुमारास पाच ते सात जण जेवणासाठी बसले होते. किरकोळ वादातून सुरवातीला त्यांच्यात आपसांत शाब्दिक बाचाबाची झाली. काही वेळाने त्यांच्यातील वाद वाढतच गेला. त्यातून एकाने अचानक जवळच्या गावठी पिस्तुलातून फरदीन ऊर्फ भय्या आबू कुरेशी याच्यावर दोन गोळ्या झाडल्या. त्यात कुरेशी गंभीर जखमी झाला. काही जणांनी त्याला तत्काळ लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला. 

हेही वाचा इथं पाणी पण मिळत नाही

आर्थिक व्यवहारातून प्रकार

दरम्यान, या घटनेनंतर सगळे आरोपी पसार झाले आहेत. या गोळीबारामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, आर्थिक देवाणघेवाणीतून हा प्रकार झाला असावा, असा पोलिसांचा कयास आहे. तूर्तास पोलिसांनी तात्कालिक कारण असल्याचे नमूद करून गुन्ह्याची नोंद केली आहे. 

हेही वाचा वडनेरच्या धर्तीवर टाकळीकर जलक्रांती करणार... 

संशयीत आरोपींची नावे

उमेश नागरे, अक्षय बनसोडे, सुभाष कदम, अरुण चौधरी (चौघेही रा. लोणी). संतोष सुरेश कांबळे, सिराज ऊर्फ आयूब शेख, शाहरुख शहा पठाण (तिघेही रा. श्रीरामपूर) अशी संशयित आरोपींची नावे असल्याचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Man dies in firing at loni