Crime News: धक्कादायक! करणी केल्याच्या संशयातून सपासप वार करत केली शेजाऱ्याची हत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

Crime News: धक्कादायक! करणी केल्याच्या संशयातून सपासप वार करत केली शेजाऱ्याची हत्या

कोल्हापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने करणी केल्याच्या संशयातून शेजाऱ्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मद्यधुंद अवस्थेत शेजारच्या घरात घुसून तलवारीने हल्ला करत एकाचा खून केला आहे.

आझाद मकबूल मुलतानी (वय, ५४) असं या हल्ल्यात मयत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. मुलतानी यांची सून अफसाना मुलतानी ही या हल्ल्यात जखमी झाली आहे. शहरातील टेमलाई नाका परिसरात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, काल (मंगळवार १६,मे) रोजी रात्री आझाद मुलतानी हे आपल्या सुनेसह रात्री साडे आठच्या सुमारास जेवण करण्यासाठी बसले होते. यावेळी अचानक शेजारी राहणारा निखिल गवळी हा दारूच्या नशेत तलवारीसह घरात घुसला आणि माझ्या घरावर करणी करता का? असं म्हणत मुलतानी यांच्या सुनेवर हल्ला केला.

यावेळी आझाद मुलताने हे आपल्या सुनेच्या बचावासाठी पुढे आले. त्यांना पाहताच आरोपीने त्यांच्यावरही तलवारीने जोरदार हल्ला करत मुलतानी यांच्या खांद्यावर छातीवर आणि मांडीवर सपासप वार केले.

या हल्ल्यात हातावर वर्मी घाव बसल्याने रक्ताच्या ठराव्यात ते जागीच कोसळले. कुटूंबियांनी आरडा ओरडा करताच हल्लेखोर पसार झाला. यानंतर मुलांसह नातेवाईकांनी आझाद मुलतानी यांना सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

हल्ल्यानंतर आरोपीने स्वतः पोलिस ठाण्यात हजर होत खूनाची कबुली दिली. ज्यामध्ये त्याने करणी केल्याच्या संशयातून ही हत्या केल्याचे सांगितले आहे. या भयंकर घटनेने शहर हादरुन गेले आहे. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

दरम्यान, निखिल गवळी हा घरात घुसला असताना घरातील तीन लहान मुले बाहेर खेळण्यासाठी गेली होती. त्यामुळे सुदैवाने या तीन मुले बचावल्याचे सांगण्यात येत आहे.