तो मारतो बैठका ; पाठीवर ७० किलोचे पोते घेऊन ( व्हिडीओ )

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

भाजी मार्केटमधील एका हमालाने इतरांचा तर सोडा स्वत:च्या हातांचाही वापर न करता ७० किलो वजनाचे मिरचीचे पोते उचलण्याची किमया केली आहे. त्याचा वजन उचलण्यासंबंधीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगला व्हायरल झाला आहे.

बेळगाव - ओझे उचलणे हे नेहमीच कष्टाचे काम. त्यासाठी स्वत:च्या हातांबरोबरच कधीकधी इतरांचीही मदत लागते. पण, बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) भाजी मार्केटमधील एका हमालाने इतरांचा तर सोडा स्वत:च्या हातांचाही वापर न करता ७० किलो वजनाचे मिरचीचे पोते उचलण्याची किमया केली आहे. त्याचा वजन उचलण्यासंबंधीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगला व्हायरल झाला आहे.या कामगिरीबद्दल त्याचे उत्स्फूर्त कौतुक होत आहे.

असे केले आव्हान पार

सोमवारी नेहमीप्रमाणे एपीएमसी भाजी मार्केटमध्ये बाजार भरला होता. अनेक शेतकऱ्यांनी बटाटे, रताळी, मिरची आदी माल विक्रीसाठी आणला होता. वाहनातील माल हमालांनी खाली केला. यावेळी एपीएमसी भाजी मार्केटच्या सी-ब्लॉकमध्ये हमालांनी मजेमजेत मिरचीचे ७० किलोचे पोते हात न लावता कोण उचलेल, याबाबत पैज लावली. शिवाजी सावंत यांनी ते आव्हान स्वीकारले. एवढ्यावरच न थांबता एका दमात हात न लावता केवळ दोन मिनिटातच ते पोते उचलले. पोते उचलल्यानंतर त्यांनी ते घेऊन दोन बैठकाही मारल्या. यानंतर सर्वांनी त्यांच्या या कामगिरीला टाळ्या वाजवून दाद दिली.

 आधी ही केलाय हा प्रयोग

शिवाजी सावंत भाजी मार्केटमध्ये १९८३ पासून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी दोनवेळा हात न लावता पोते उचलले होते. तसेच दोन दिवसांपूर्वी त्यांनी हा प्रयोग केला होता. सोमवारी पुन्हा त्यांनी हात न लावता पोते उचलले. 

आपण १९८३ पासून भाजी मार्केटमध्ये काम करत आहे. यापूर्वी दोनवेळा हात न लावता पोते उचलले आहे. दोन्हीवेळा यशस्वी झालो आहे. आजची ही तिसरी वेळ होती. मजेमजेत ही पैज लागली अन्‌ जिंकली.
- शिवाजी सावंत, हमाल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Man Pick Up A Pepper Vessel Weighing 5 kg Without The Use Of A Hand.