भिगवण स्थानकातून माथेफिरूने पळविली बस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

भिगवण - पुण्यातील संतोष माने बस प्रकरणाची आठवण करून देणारी घटना काल सायंकाळी साडेसहाच्या सुमारास भिगवण बस स्थानकात घडली. बारामती आगाराची बस भिगवण स्थानकात आल्यानंतर चालक बस नोंदविण्यासाठी गेले असता, एका माथेफिरूने बस सुरू करून सेवा रस्त्याने भरधाव नेली. सेवा रस्त्यावरील वाहनास ठोकरत एक किलोमीटर अंतरावर सोनाज पेट्रोल पंपाजवळ चारीत चाक घुसून बस बंद पडल्याने मोठा अनर्थ टळला.

बालाजी गोपाळ रेणके (वय ३५, रा. तक्रारवाडी, ता. इंदापूर) असे बस पळवून नेणाऱ्या माथेफिरूचे नाव आहे. त्यास पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी बसचालक सुनील रामचंद्र सोनवणे (रा. रुई, ता. बारामती) यांनी भिगवण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

बारामती आगाराची एसटी बस (एमएच १४, बीटी २९५६) सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास भिगवण बसस्थानकात आली होती. सर्व प्रवासी उतरल्यानंतर चालक सुनील सोनवणे हे बसची नोंद करण्यासाठी आतमध्ये गेले. त्या वेळी त्या ठिकाणी असलेल्या बालाजी रेणके यांनी बसमध्ये चढून बसचा ताबा घेतला. त्यानंतर त्याने बस सुरू करून तो सेवा रस्त्याने भरधाव निघाला. एसटी बसने स्थानकाच्या वळणावर असलेल्या राष्ट्रीय महामार्ग गस्तीच्या पिकअप वाहनास (एमएच ४२, एआर १६२८) ठोकरले. त्यानंतर एक किलोमीटर अंतरावर सोनाज पेट्रोलपंपाजवळ असलेल्या पीक वाहनास (एमएच ०५, आर ५६२७) धडकून बाजूच्या मोरीत चाक अडकून बस बंद पडली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने रेणके याला ताब्यात घेतले. 

...तर मोठी दुर्घटना घडली असती
माथेफिरू चालकाने बस भिगवण स्थानकातून भरधाव बाहेर काढल्यानंतर अनेकांचा थरकाप उडाला. पीकअपला धडकून बस बंद पडल्यामुळे अनर्थ टळला. बस जर रहदारीच्या मदनवाडी चौकापर्यंत गेली असती, तर त्या ठिकाणी मोठी दुर्घटना घडली असती. चालकाने चावी काढली असतानाही बस कशी सुरू झाली, असा सवाल उपस्थित होत आहे.

Web Title: man run away with bus in Bhigwan st bus depo