माणची वाटचाल संपूर्ण टॅंकरग्रस्त तालुक्‍याकडे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 मे 2017

३६४ वाड्या-वस्त्यांना टॅंकरद्वारे पाणी; ९६ पैकी ७५ टॅंकर प्रस्ताव मंजूर

दहिवडी - माण तालुक्‍यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. पाण्यावाचून जनावरांचेही मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. गावोगावचे पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आटू लागले आहेत. विहिरी कोरड्या पडल्या असून बोअरवेलने तळ गाठला आहे. हंडाभर पाण्यासाठी मैलभर पायपीट करावी लागत आहे. हळूहळू संपूर्ण तालुका टॅंकरग्रस्त होऊ लागला आहे. 

३६४ वाड्या-वस्त्यांना टॅंकरद्वारे पाणी; ९६ पैकी ७५ टॅंकर प्रस्ताव मंजूर

दहिवडी - माण तालुक्‍यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. पाण्यावाचून जनावरांचेही मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. गावोगावचे पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आटू लागले आहेत. विहिरी कोरड्या पडल्या असून बोअरवेलने तळ गाठला आहे. हंडाभर पाण्यासाठी मैलभर पायपीट करावी लागत आहे. हळूहळू संपूर्ण तालुका टॅंकरग्रस्त होऊ लागला आहे. 

तालुक्‍यातील १०५ महसुली गावांपैकी ५० गावे व ३६४ वाड्या-वस्त्यांना टॅंकरव्दारे पाणीपुरवठा सुरू आहे. माण पंचायत समितीच्या पाणीपुरवठा शाखेकडे टॅंकर मागणीचे ९६ प्रस्ताव प्राप्त झाले असून, त्यातील ७५ प्रस्ताव मंजूर झाले आहेत. उर्वरित प्रस्ताव हे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रलंबित आहेत. 

तालुक्‍यातील १२ ठिकाणी टॅंकर भरले (फिडिंग पॉइंट) जात आहेत. त्यामध्ये कारखेल जीवन प्रादेशिक योजना, दहिवडी मोरेमळा, वावरहिरे, ढाकणी, लोधवडे तलाव, शिंदी, गोंदवले बुद्रुक, शेवरी व खटाव तालुक्‍यातील दरजाई यांचा समावेश आहे. आंधळी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे वीज कनेक्‍शन तोडल्यामुळे खटाव तालुक्‍यातून उकिर्डे, महिमानगड, कोळेवाडी, दिवडी, पांढरवाडी, तर माण तालुक्‍यातून खटावमधील आवळेपठार येथून टॅंकर सुरू आहे. दहिवडीला आंधळी जीवन प्रादेशिक योजनेमधून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र, गेल्या दहा दिवसांपूर्वी वीज वितरण कंपनीने थकीत वीज बिलापोटी पाणी योजनेचे कनेक्‍शन तोडले होते. त्यामुळे दहिवडीत पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. ग्रामस्थांना दिवसभर पाण्यासाठी वणवण हिंडावे लागत होते. पाणी नसल्याने दहिवडीवासीय त्रस्त झाले होते. आमदार जयकुमार गोरे यांनी लक्ष घातल्यामुळे दहिवडीचा पाणीपुरवठा पूर्वपदावर येऊन सुरळीत झाला. मात्र, वाड्या- वस्त्यांवर केवळ माणसांसाठी पाणी दिले जाते. जनावरांसाठी टॅंकर मंजूर नाहीत, असे सांगितले जात आहे. तालुक्‍यातील सर्व भागात जनावरांसाठी टॅंकर मंजूर आणि सुरू आहेत. मग, दहिवडीत तीन महिने जनावरांना टॅंकर का दिला जात नाही? असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे. स्थानिक नेते मंडळी या प्रश्नी बोलण्यास तयार नाहीत.

दहिवडीमधील वाड्या-वस्त्यांवर पाणी साठवण्यासाठी बॅलर घ्यावे लागत आहेत. ज्यांच्याकडे टाक्‍या आहेत, त्या टाक्‍यांमध्ये पाणी सोडण्यास नगरपंचायतीचे कर्मचारी नकार देत आहेत. त्यामुळे शेतकरी व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याप्रश्‍नी मुख्याधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालावे.

- अशोक जाधव, संचालक, विकास सेवा सोसायटी, दहिवडी

 

Web Title: man tahsil all tanker free movement