बिबट्याच्या दहशतीखाली जगतोय माणूस 

आनंद गायकवाड
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

प्रवरा नदीकाठच्या या गावांमध्ये बऱ्यापैकी बागायती क्षेत्र आहे. मुबलक भक्ष्य, पाणी आणि लपण्यासाठी जागा असल्याने, या परिसरातील बिबट्यांच्या संख्येत वाढ होत आहे. 

संगमनेर : जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून दरारोज बिबट्याचे दर्शन होत आहे. पिंपळगाव रोठा(ता. पारनेर) येथे वनविभागाने बिबट्या जेरबंद केला. संगमनेर तालुक्‍यातील प्रवरा नदीकाठच्या परिसरात काही दिवसांपासून बिबट्याची संख्या वाढली आहे. बिबट्याचे पाळीव प्राण्यावरील आणि माणसावरील हल्ले वाढल्याने, या परिसरातील शेतकरी, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

बिबट्यांच्या संख्येत वाढ 
तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील निमगाव पागा, नांदुरी, निमज, धांदरफळ खुर्द व बुद्रुक, गोडसेवाडी, कौठे येथे मोठ्या प्रमाणात शेतकरी वस्त्यांवर राहतात. शाळा-महाविद्यालय, किराणा, दूधसंकलन केंद्र, तसेच छोट्या-मोठ्या कामांसाठी दुचाकी, सायकल किंवा पायी प्रवास करतात. प्रवरा नदीकाठच्या या गावांमध्ये बऱ्यापैकी बागायती क्षेत्र आहे. मुबलक भक्ष्य, पाणी आणि लपण्यासाठी जागा असल्याने, या परिसरातील बिबट्यांच्या संख्येत वाढ होत आहे.

हेही वाचा बिबट्या घरात अन्‌ माणस दारात 

बिबट्याची नवी पिढी आक्रमक 
मानवी वस्तीजवळ राहणारा बिबट्या काही दिवसांत काहीसा आक्रमक झालेला दिसतो. माणसांपासून फटकून राहणाऱ्या बिबट्याच्या वर्तनशैलीतही बदल होत असल्याची जाणीव ग्रामस्थांना होत आहे. पूर्वी दुचाकी, चारचाकी वाहनांचे हॉर्न व प्रखर प्रकाशापासून दूर पळणाऱ्या बिबट्याची नवीन पिढी आता त्यास घाबरत नाही. उलट, रस्त्यातून बाजूला होण्याचे कष्टही घेत नाही.

दुचाकीचा पाठलाग करतो बिबट्या 
उसाच्या शेतात जन्माला आलेली "शुगरकेन लेपर्ड'ची नवी पिढी जन्मापासून या वाहनांच्या आवाजाला सरावल्याने, त्यांना मानवाची भीती वाटेनाशी झाली आहे. त्यामुळे कुत्र्यांप्रमाणे बिबट्यांनी दुचाकीचा पाठलाग केल्याच्या घटना तालुक्‍यात, विशेषतः प्रवरा नदीकाठच्या पट्ट्यात समोर आल्या आहेत. जन्माला आलेल्या अधिवासात कायम राहण्याची त्यांची नैसर्गिक सवय व अधिसूची-एकमध्ये समावेश असल्याने बिबट्यांना मारता येत नसल्याचा परिणाम, त्यांची संख्या झपाट्याने वाढण्यात होत आहे. मात्र, ते मानवी समूहाला उपद्रवी ठरतानाही दिसतात. विद्यार्थी, शेतकरी, दूधव्यावसायिक व सर्वसामान्यांच्या जीविताला असलेला धोका पाहता, या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी होत आहे. 

हेही वाचा बिबट्यालाही पाजले "त्या'ने पाणी 

शेतकऱ्यांमध्ये भीतीचे सावट 
धांदरफळ खुर्दचे सरपंच रोहिदास खताळ म्हणाले, ""प्रवरा नदीकाठच्या धांदरफळ खुर्द व परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांची संख्या वाढते आहे. अद्याप कोणा मनुष्यप्राण्याच्या जीविताला धोका झाला नसला, तरी या भागातील शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर भीतीच्या सावटाखाली आहेत. या बिबट्यांचा वन विभागाने बंदोबस्त करण्याची आवश्‍यकता आहे.'' 

बिबट्या दिसल्यास माहिती द्या : आखाडे 
वनक्षेत्रपाल नीलेश आखाडे म्हणाले, ""बिबट्यापासून बचावासाठी मानवी वस्तीच्या परिसरात विजेचे दिवे लावणे, लहान मुलांना एकटे न सोडणे, कमरेत वाकून शेतात काम करणे धोकादायक ठरू शकते. बिबट्या त्याच्या उंचीच्या प्राण्यावरच शक्‍यतो हल्ला करीत असल्याने त्यापासून दूर रहावे. बिबट्या दिसल्यास त्वरित वन विभागाला त्याची कल्पना द्यावी.'' 
... 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The man under fear of leopard