नव्या वर्षात बंपर नोकरभरतीचा संकल्प

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

सांगली - नव्या वर्षात महापालिकेतील दीर्घ काळापासूनची प्रलंबित नोकरभरती होऊ शकते. आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी रखडलेली ही प्रक्रिया मार्गी लावली आहे. बिंदुनामावली अपूर्ण असून ती पूर्ण करण्यात आली असून 4 हजार 900 इतकी पदसंख्या निश्‍चित झाली आहे. शासन यातील किती पदांना मान्यता देते हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र किमान दीड ते दोन हजार नव्याने पदांची भरती येत्या वर्षभरात होऊ शकते.

सांगली - नव्या वर्षात महापालिकेतील दीर्घ काळापासूनची प्रलंबित नोकरभरती होऊ शकते. आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी रखडलेली ही प्रक्रिया मार्गी लावली आहे. बिंदुनामावली अपूर्ण असून ती पूर्ण करण्यात आली असून 4 हजार 900 इतकी पदसंख्या निश्‍चित झाली आहे. शासन यातील किती पदांना मान्यता देते हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र किमान दीड ते दोन हजार नव्याने पदांची भरती येत्या वर्षभरात होऊ शकते.

पुढील वर्षात पालिकेतील सर्व कार्यालयांचे अधीक्षक निवृत्त होत आहेत. सेवा पुस्तिकाच पूर्ण नसल्याने पदोन्नतीपासून अनेक कर्मचारी वंचित आहेत. मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे प्रस्ताव मान्यतेअभावी रेंगाळले आहेत. या पार्श्‍वभूमीवर गेले वर्षभर ही प्रक्रिया मार्गी लागावी अशी अपेक्षा होती. स्थायी समिती सभापती आल्यानंतर संतोष पाटील यांनी तशी घोषणाही केली होती. सध्या पालिकेच्या आस्थापनेवर 40 टक्केच कर्मचारी आहेत. गेल्या तेरा वर्षांत आवश्‍यक कर्मचारी भरती झालेली नाही. मध्यंतरी विभागीय आयुक्तांकडे भरतीचा प्रस्ताव पाठवला होता. त्यावेळी बिंदुनामावली पूर्ण नसल्याने आयुक्तांनी मान्यता दिली नाही. महापालिकेची स्थापना होऊन 17 वर्षे उलटली तरी स्वतंत्र आस्थापना मंजूर नाही. आजही सांगली आणि मिरजेच्या दोन स्वतंत्र आस्थापनावरच काम निभावून नेले जाते. आस्थापनाच नसल्याने स्वतंत्र सेवानियम नाहीत. ते शासनाच्या सुधारित आदेशाप्रमाणे मंजूर करून घेतलेले नाहीत. मागासवर्गीय अनुशेषातील 139 जागांची भरती बंदिस्त पेटीत आहे. मागील महाआघाडीच्या काळात ही भरती झाली होती. त्याबद्दल तक्रारी असल्याचे सांगत निकाल रोखून धरण्यात आला. त्याचा न्यायालयीन वाद शमला आहे, मात्र सत्ताधाऱ्यांनी सत्तेत येताच भरती फेरप्रक्रियेने करावी असा ठराव केला आहे. पदोन्नतीसाठी वर्षानुवर्षे बैठकाच झालेल्या नाहीत. 12 वर्षे सेवा पूर्ण झाली तर नियमानुसार पदोन्नतीचा पगार आपोआपच कर्मचाऱ्यांना मिळतो. मात्र त्याची जबाबदारी मात्र दिली जात नाही. हा सारा सावळा गोंधळ एकदाचा संपेल अशी आशा निर्माण झाली आहे.

पदांवर एक दृष्टिक्षेप
सांगली-मिरजेत आस्थापनावर 2377 पदे मंजूर
सध्या 1600 कार्यरत कर्मचारी
त्यापैकी 900 कर्मचारी कायम
आस्थापना मंजूर झाल्यास पदसंख्या 4 हजार 900
मागासवर्गीय भरतीच्या 139 जागांची भरतीप्रक्रिया रेंगाळली.
अनुकंपावरील 22 जागा आजही रिक्तच

""मनुष्यबळ अपुरे आहे. जे आहे त्यात योग्य कामगिरीसाठी योग्य माणसांचा अभाव आहे. भरती प्रक्रिया स्पर्धात्मक आणि पारदर्शक असेल. आस्थापना मंजुरीसाठीचा प्रस्ताव तयार असून लवकरच त्याला शासनाची मंजुरी मिळेल. येत्या वर्षभरात नोकर भरतीची प्रक्रिया पूर्ण होईल.''

रवींद्र खेबुडकर, आयुक्त, सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिका

Web Title: man will recruit new year