#जगणंलाईव्ह! - पैलू पाडणारे माणदेशी ‘हिरे’

#जगणंलाईव्ह! - पैलू पाडणारे माणदेशी ‘हिरे’

खाणीतून हाती येतो तेव्हा तो काचेचा तुकडाच असतो... त्याला पैलू पाडले की मग तो हिरा होतो! हा हिरा जितका मूल्यवान असतो, तितकं मूल्य त्याला पैलू पाडणाऱ्याला मिळत नाही. या कामात माणदेशी माणसाचा हात धरणारं कुणी नाही. नवी पिढी माणदेशी मातीतून डाळिंब, कापूसरूपी हिरे पिकवण्याची स्वप्न पाहू लागल्यानं ती संख्या कमी झाली असली तरी पैलू पाडण्याच्या कलाकुसरीतील वारसा टिकून आहे. 

माणदेशी माणूस दुष्काळाच्या नावानं उर बडवत बसला नाही. तो रडला नाही, तो लढत राहिला. दुष्काळ ही संधी माणून त्यानं नवनव्या क्षेत्रात जगण्याचं साधन शोधलं. ती कला साध्य केली. त्याला आपलं बलस्थान बनवलं. या माणसांनी जसा सोन्याच्या गलई व्यवसायात जम बसवला, शेळ्या-मेंढ्या पाळून तो उभा राहिला, तसाच त्यानं दागिने विश्‍वात शीर्षस्थानी असलेल्या हिऱ्याला पैलू पाडण्याचं कौशल्य आत्मसात केलं. 

या भागातील डझनभर गावांतून हिरे घडवणारी माणसं घडली... आटपाडी, गुळेवाडी (विभूतवाडी), पारेकरवाडी, झरे, जांभूळणी, पडकळरवाडी बाळेवाडी ही आटपाडी तालुक्‍यातील, तर त्याला जोडून गारुडी, कापूसवाडी, इरळी, जमालवाडी, पानाडेवाडी, काळचौंडी, वीरकरवाडी, बागलवाडी ही माण, खटाव तालुक्‍यातील ही गावं म्हणजे हिरे घडवणाऱ्या माणसांची खाणच. 

सुमारे अडीचशेहून अधिक कुटुंबांनी या व्यवसायात आपलं प्रभुत्व निर्माण केलं आहे. १९७२ चा दुष्काळ माणसांची परीक्षा पाहणारा होता. त्यानंतर खटाव तालुक्‍यातील पाचवड गावातील लोक पहिल्यांदा या व्यवसायात उतरले. मुंबईत हिऱ्याला पैलू पाडण्याचे कारखाने होते. पुढे १५-२० वर्षे या कारखान्यांना कारागीरांची वानवा जाणवलीच नाही. ‘एल अँड टी’सारख्या मोठ्या कंपनीतील नोकरी सोडून लोकांनी ही कला शिकली. मिल कामगारही हिरे कारागीर झाले. 

इथल्या माणसांनी हिरे व्यापारी होण्याचं स्वप्न पाहिलं, काहींनी ते पूर्ण केलं. श्‍यामराव थोरात हे कामगार म्हणून गेले अन्‌ उद्योजक झाले. तुकाराम पडळकर, आप्पा थोरात, आप्पा लिगाडे, रघुनाथ घाडगे अशी काही मोठी नाव सांगता येतील. पुढे प्रचंड स्पर्धा, बड्या उद्योगांचा त्यात शिरकाव यामुळे स्पर्धा वाढली. घडी विस्कटली. ही खंत आजही या भागात उघडपणे बोलून दाखवली जाते. 

पूर्वी माणदेशातही हिरे घडवण्याचे कारखाने होते; मात्र इकडे काम देणे बंद झाल्याने ते बंद पडले. मायणीत हणमंत काळे यांचा एकमेव कारखाना सध्या सुरू आहे. २५ कारागीर आहेत. 

प्रामाणिक माणदेशी कारागिरांना मागणी 
खाणीतून कच्चा हिरा काढल्यानंतर तो कारखानदाराकडे येतो. कारखानदार कलाकुसरीसाठी कारागिराकडे देतो. हा सारा चोख धंदा. प्रामाणिकपणाचा. हा प्रामाणिकपणा हीच माणदेशी माणसाची ओळख. त्यातूनच या क्षेत्रातील त्यांचा कारागीर म्हणून दबदबा टिकून आहे. गुजरात राज्यात हिरे कारखान्यांची संख्या प्रचंड आहे. तेथून माणदेशी कारागिरांना मोठी मागणी आहे. इथला माणूस वर्षातून दोनवेळा गावी येतो. मे महिन्यात उद्योग थंड असतो, तर दिवाळीत कारखान्यांना फारसे काम नसते. या काळात येथे शेतीवाडीच्या विकासाकडे लक्ष दिले जाते. नवीन मुलांना इच्छा असेल तर कारागीर म्हणून घडवण्याची प्रक्रिया या काळातच होते. चार ते सहा महिन्यांचे प्रशिक्षण घेतल्यानंतर हिऱ्याला पैलू पाडण्याचे काम कामगाराला कुशलतेने करता येते. 

एका हिऱ्याला पैलू पाडण्यासाठी १०० ते १० हजार रुपयांपर्यंत दर आहेत. व्यापाऱ्यांनी या भागात काम द्यायचे बंद केल्याने इथले कारखाने अडचणीत आले; मात्र कारागिरीत माणदेशी माणूसच अव्वल आहे. आपण हिरे व्यापारी होऊ शकलो नाही; मात्र कारागिरीत आपली जागा कुणी घेऊ शकले नाही.
- भीमराव थोरात,
गुळेवाडी विभूतवाडी,
शिवराम मासाळ, जांभूळणी, 
हिरे उद्योगातील जाणकार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com