दिलीप मानेंचे ठरले; आता प्रतीक्षा भालके-म्हेत्रेंच्या निर्णयाची

विजयकुमार सोनवणे
शनिवार, 24 ऑगस्ट 2019

वर्षानुवर्षे कॉंग्रेस की जय म्हणणाऱ्या देश व राज्यातील नेत्यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिलीे. सोलापुरात माजी आमदार दिलीप माने यांनी पक्ष सोडण्याची घोषणा करून त्याची सुरवात केली. आता प्रतीक्षा आहे ती आमदार सिद्धाराम म्हेत्रे आणि आमदार भारत भालके यांच्या निर्णयाची. 

सोलापूर : वर्षानुवर्षे कॉंग्रेस की जय म्हणणाऱ्या देश व राज्यातील नेत्यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिलीे. सोलापुरात माजी आमदार दिलीप माने यांनी पक्ष सोडण्याची घोषणा करून त्याची सुरवात केली. आता प्रतीक्षा आहे ती आमदार सिद्धाराम म्हेत्रे आणि आमदार भारत भालके यांच्या निर्णयाची. 

माजी आमदार ब्रह्मदेव मानेंचा वारसा जपत माजी आमदार दिलीप माने यांनी कॉंग्रेसचा झेंडा हाती घेतला. वर्षानुवर्षे कॉंग्रेसमध्ये राहिल्यावर आता त्यांना पक्षांतराचे वेध लागले आणि त्यानुसार त्यांनी तशी घोषणाही केली. आमदार सिद्धाराम म्हेत्रे आणि आमदार भारत भालके यांनी अद्याप निर्णय जाहीर केला नाही. त्यामुळे ते काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

कॉंग्रेस सोडणाऱ्यांमध्ये खुर्ची आणि सत्ता हेच कारण आहे. संधी कोणत्या पक्षाकडून मिळते याचे त्यांना महत्त्व नाही. मिळेल त्या ठिकाणी झेंडा रोवायचा या त्यांच्या भूमिकेमुळे कॉंग्रेसचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे. कौतुक करा अथवा चार शिव्या घाला, पण आम्हाला खुर्चीशिवाय करमत नाही, असे म्हणत वर्षानुवर्षे कॉंग्रेसचे मीठ खालेल्ले नेते भाजप-शिवसेनेच्या वाटेवर आहेत. अशा नेत्यांमुळेच सव्वाशे वर्षांची परंपरा असलेल्या कॉंग्रेसची धुळधाण उडाली, त्याचवेळी सामान्य कार्यकर्त्यांची माती झाली. स्थानिक पातळीवरील नेत्यांनीही दलबदलूंबाबत कधीच कडक धोरण अवलंबिले नाही. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसमध्ये अनेक घडामोडी होत आहेत, मात्र त्याबाबतही नेते मूग गिळून गप्प आहेत. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या निवडणुकीत कॉंग्रेससमोर आता भाजप-शिवसेनेसह वंचित बहुजन आघाडीचे आव्हान असणार आहे. त्यापेक्षा खुर्चीसाठी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन इतर पक्षात जाणाऱ्यांचे आव्हान मोठे असेल. लोकसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीने सारखीच कामगिरी करत सर्व निवडणूक पंडितांना धक्का दिला.

यामध्ये दोन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांची मेहनत आहेच, पण एक छुपा हातही या विजयामागे होता तो ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचित आघाडीचा. अक्कलकोट, पंढरपूर आणि सोलापूर शहर मध्य हे कॉंग्रेसच्या ताब्यातील मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी भाजपने मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे प्रणिती शिंदे यांचे राजकीय अस्तित्व पणाला लागणार आहे. माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे भाजपमध्ये जाण्याचे संकेत आहे, मात्र त्यांचा निर्णय अद्याप झाला नाही. पंढरपूरचे आमदार भारत भालके हेही दोलायमान मनःस्थितीत आहेत. या दोघांचाही अधिकृत निर्णय कधी होणार याबाबत उत्सुकता असणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The mane were decided; Now wait for the decision of the MLA bhalke and mehtre