कोल्हापूर जिल्ह्यातील 'हे' गाव ठरले स्मार्ट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

राज्य शासनाने काही वर्षापूर्वी पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजना जाहीर केली होती. या योजनेच्या निकषात बदल करत 21 नोव्हेंबर 2016 रोजी "स्मार्ट ग्राम' नावाने ही योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोल्हापूर - राज्य शासनाने जाहीर केलेल्या स्मार्ट ग्राम योजनेत हातकणंगले तालुक्‍यातील माणगावने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. योजनेसाठी जिल्ह्यातील 12 तालुक्‍यातील 12 गावे सहभागी झाली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी या सर्व गावांची पाहणी करून गुणांकन केले होते. त्या आधारे बुधवारी (ता. 13) स्मार्ट ग्रामची घोषणा करण्यात आली. पहिला क्रमांक पटकावलेल्या माणगावला 50 लाखांचे बक्षीस मिळणार आहे. 

राज्य शासनाने काही वर्षापूर्वी पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजना जाहीर केली होती. या योजनेच्या निकषात बदल करत 21 नोव्हेंबर 2016 रोजी "स्मार्ट ग्राम' नावाने ही योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. योजनेत पात्र होण्यासाठी शासनाने अनेक निकष दिले होते. शासनाच्या निधीचा सुयोग्य वापर, स्वच्छता, यामध्ये सार्वजनिक, वैयक्‍तीक व शालेय स्वच्छतेस गुणांकण देण्यात आले. तसेच निधीचे व्यवस्थापन व दायित्व, अपारंपरिक ऊर्जेचा वापर, पर्यावरण, पारदर्शकता व तंत्रज्ञानाचा वापर या आधारावर 100 गुणांचा विभागणी करण्यात आली होती. 

जिल्ह्यातील 12 गावांनी स्पर्धेत भाग घेतला. यात माणगाव (ता. हातकणंगले), माजगाव (ता. राधानगरी), कोंडिंग्रे (ता. शिरोळ), सावर्डे दुमाला (ता. करवीर), भेडसगाव (ता. शाहूवाडी), पार्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा), बाचणी (ता. कागल), पाळ्याचाहुडा (ता. भुदरगड), शृंगारवाडी (ता. आजरा), हसूरचंपू (ता. गडहिंग्लज), कोवाड (ता. चंदगड), शेणवडे (ता. गगनबावडा) या गावाचा समावेश होता. या सर्व गावांची मित्तल यांनी तपासणी केली. त्यात माणगाव सर्वाधिक उत्कृष्ट व सर्व निकषात बसत असलेले गाव आढळून आले. 

राज्यातील आदर्श गाव करणार 
राज्यात हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच आदर्श गाव आहेत. या गावांची लोकसंख्याही मर्यादित आहे; मात्र आमच्या गावची लोकसंख्या 16 हजार आहे. तरीही गाव आदर्श करण्यासाठी सत्ताधारी, विरोधक हातात हात घालून काम करत आहोत. गावात अनेक उल्लेखनीय कामे केली आहेत. पुढील टप्प्यातही लोकविकासाच्या नावीन्यपूर्ण योजना राबवून गाव राज्यात स्मार्ट ग्राम करण्याची तयारी सुरू केली आहे. 
- राजू मगदूम, माजी सरपंच माणगाव 

माणगावातील विकासकामे 
गावातील स्मशानभूमीचे मोठ्या प्रमाणात सुशोभीकरण करण्यात आले आहे. चौकाचौकात सीसीटीव्ही बसवण्यात आले आहे. गल्ली बोळातील रस्ते करण्यात आले आहेत. दारूबंदी करण्यासह गाव डिजिटल मुक्‍त करण्यात आले आहे. हायमास्ट दिवे, लहान मुलांसाठी बालोद्यान, स्वच्छ पाण्यासाठी फिल्टर हाउस, तंदुरुस्तीसाठी ओपन जीम, वृक्षारोपण व ठिबकने पाणीपुरवठा, एलईडी स्ट्रीट लाईट या माध्यमातून गाव चकाचक करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mangaon Kolhapur Smart Village