"नेमाडेंच्यासह काही लेखकांच्या ताब्यात पुरस्कार देणाऱ्या संस्था "

"नेमाडेंच्यासह काही लेखकांच्या ताब्यात पुरस्कार देणाऱ्या संस्था "

इस्लामपूर - पुरस्कार संस्कृती संशयास्पद असल्याची टीका करत कवी व समीक्षक मंगेश नारायणराव काळे यांनी आज येथे ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त लेखक भालचंद्र नेमाडे यांच्यावर जोरदार टीका केली. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनाही त्यांनी लक्ष्य केले.

येथील लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महाराष्ट्र साहित्य परिषद व राजारामबापू ज्ञानप्रबोधिनी यांच्यावतीने आयोजित मराठी साहित्य संमेलनात ते बोलत होते. वक्ते प्रा. डॉ. संजय थोरात यांच्या हस्ते उदघाटन झाले. प्रा. शामराव पाटील, दि. बा. पाटील, प्रा. दशरथ पाटील, मंगल कोकाटे प्रमुख उपस्थित होते. डॉ. राजेंद्र माने (सातारा) याना उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्काराने गौरविण्यात आले. वैजनाथ महाजन, सर्जेराव कचरे, बसवेश्वर स्वामी, डॉ. वासमकर यांचे सत्कार झाले.

मंगेश काळे म्हणाले, "नेमाडेंच्यासह काही लेखकांच्या ताब्यात अनेक पुरस्कार देणाऱ्या संस्था आहेत. आजवरचा आढावा घेतल्यास अपवाद वगळता त्यांच्या तंबूतीलच लेखकांना पुरस्कार मिळाल्याचे दिसतील. एकीकडे दिनकर मन्वर सारख्या कवीला जाहीर माफी मागायला भाग पाडले जाते, गुजरात मधील नरसंहारानंतर विजय तेंडुलकर गोळी घालण्याची भाषा करतात, देशातील अराजक पाहून सर्वत्र पुरस्कार वापसीची लाट येते आणि असे असताना नेमाडेंना त्यांच्या 'हिंदू' पुस्तकावर मोदींच्या हस्ते ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारतानाचा फोटो प्रसिद्ध करावा लागतो, हे कशाचे लक्षण आहे?"

काळे म्हणाले, "व्यवस्थाशरण लेखकांची टोळी आणि वाङ्मयीन राजकारणामुळे मराठी साहित्याची मोठी हानी झाली आहे. मी लेखक - कवी का आहे? हा प्रश्न सातत्याने विचारावा लागेल. आपल्या लेखक असण्याचे प्रयोजनच अनेकांना माहीत नाही. प्रत्येजण आपल्या भवतालाला प्रतिसाद देण्यासाठी लिहीत असतो. प्रश्न विचारणे हेच कवी - लेखकाचे काम असते. माध्यमक्रांतीमुळे जगाचे खेड्यात रूपांतर झाले आहे. जागतिकीकरणाने घुसळण झाली. एकीकडे चंगळवाद आणि दुसरीकडे अभावाचे जगणे या दोन टोकांवर आपण उभे आहोत. या सर्वांच्या केंद्रस्थानी बाजार आला आहे. माणसाची किमत वस्तू म्हणून गणली जात आहे. याचा संबंध आपल्या व्यक्त होण्याशी आहे. अनेक भाषा मृतप्राय होण्याच्या मार्गावर आहेत. इंग्रजीकरण हाच एकमेव पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे भाषासंकराचा बाऊ करून चालणार नाही. अशावेळी भाषा शुद्धीकरणाचा आग्रह गैर आहे. मराठी मरणार नाही. भाषासंकराला विरोध न करता आपण आपापल्या भाषेतून व्यक्त होत राहिले पाहिजे. देशपातळीवर मराठी साहित्याची स्थिती असमाधानकारक आहे. अनुवादाच्या पातळीवर आपण कमी पडतो."

ते म्हणाले, "लेखकाचे न बोलणेसुध्दा व्यवस्थेचे समर्थन असते. लेखकाला भूमिका असलीच पाहिजे. लेखक म्हणून आपले आदर्श काय आहेत याचा विचार केला पाहिजे. देशातील अराजकविषयी कुणी बोलणार नाही का? लिखाणाच्या मागची जाणीव महत्वाची आहे. त्याने स्वतःशी आधी संवाद साधला पाहिजे. भवताल टाळून तो लिहू शकत नाही. भवविश्वाला जे भिडते-डाचते ते लिहावे. पण त्याला जे पटणार नाही त्याविरुद्ध त्याने प्रश्न विचारलाच पाहिजे.

उद्घाटक डॉ. संजय थोरात म्हणाले, "राज्यात २०० हुन अधिक ग्रामीण आणि शहरी साहित्य संमेलने होतात. तिथे गंभीर चर्चा होते, हे सुखद आहे. ही संमेलने टिकणे गरजेची आहेत, त्यामुळे वाचन संस्कृती वाढेल. जगात सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांत मराठी १९ वी भाषा आहे.

पारंपरिक पुस्तकांना ई पुस्तकांनी आव्हान दिले आहे. गुणवत्ता, व्यक्तिमत्त्व विकास व जीवन समृद्धीसाठी वाचन आवश्यक आहे. मौखिक परंपरा वाचनविकासाच्या विरोधी नाही. सोशल मीडिया, ई बुक्स आणि मौखिक परंपरा यांची सांगड घालण्याची गरज आहे."

- डाॅ संजय थोरात

प्रा. प्रदीप पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सुरज चौगुले, डॉ. दीपक स्वामी यांनी सूत्रसंचालन केले.

लक्ष्मीकांत देशमुख यांच्यावर टीका
लक्ष्मीकांत देशमुख यांचे नाव न घेताही काळे यांनी टीका केली. ते म्हणाले, "सेवेत असेपर्यंत यांनी कधी ब्र शब्द काढला नाही, त्यांना निवृत्तीनंतरच राजाची जबाबदारी कशी लक्षात आली? आधी हीच भूमिका मांडली असती तर ते खऱ्या अर्थाने लेखक म्हणून पुढे आले असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com