सांगली जिल्ह्यातील मांगलेचे आरोग्य केंद्र बनले वनौषधींचे आगार 

भगवान शेवडे
Friday, 30 October 2020

शिराळा तालुक्‍यातील मांगले गावातील जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र वनौषधीचे केंद्र बनले आहे. आरोग्य केंद्राच्या परिसरात शंभरच्यावर वेगवेगळ्या वनौषधीसह विविध फळांची, फुलांची झाडे लावण्यात आली आहेत. काही दुर्मिळ वनस्पतीही यामध्ये आहेत. आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एन. एम. घड्याळे यांनी हा अभिनव उपक्रम राबविला आहे.

मांगले : शिराळा तालुक्‍यातील मांगले गावातील जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र वनौषधीचे केंद्र बनले आहे. आरोग्य केंद्राच्या परिसरात शंभरच्यावर वेगवेगळ्या वनौषधीसह विविध फळांची, फुलांची झाडे लावण्यात आली आहेत. काही दुर्मिळ वनस्पतीही यामध्ये आहेत. आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एन. एम. घड्याळे यांनी हा अभिनव उपक्रम राबविला आहे. 

डॉ. घड्याळे आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपवून केवळ देखरेख करीत नाहीत तर दिवसातील काही वेळ प्रत्येक झाडाजवळ जाऊन देखरेख तर करतातच मात्र काही देशी रोपांना कलमे बांधण्याचे काम ते करतात. झाडांना कायमस्वरुपी पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून त्यांनी टाकावू, जुन्या ठिबक सिंचनाच्या पाईप वापरल्या आहेत. वृक्षारोपाणाचा शासनाचा आदेश आहे म्हणून वृक्षारोपण करणारे अधिकारी केवळ वृक्षारोपाण करतात त्यानंतर त्याकडे फिरकत नाहीत. पर्यायाने पुढल्या वर्षी त्याच खड्डयात पुन्हा वृक्षारोपण करण्यात येते. मात्र, मांगले येथील प्राथमिक आरोग्य केंद्र त्याला अपवाद आहे. सुमारे दीड एकर क्षेत्र आरोग्य केंद्रासाठी आहे.

कायाकल्प योजनेंतर्गत 50 हजारांचे बक्षीस मिळाले आहे. एक एकर क्षेत्रावर विविध फळझाडे, फुलझाडे व इतर प्रकारची झाडे आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात असणाऱ्या औषधी वनस्पतीमध्ये गुळवेल, शतावरी, ओवा, पुदिना, कोरफड, इन्शुलीन गवती चहा, भृगराज (माका) आवळा, चंदन, दालचिनी, ब्राह्मी, ऑल 
स्पाइसेस, केवडा, तुळस, कडीपत्ता, अन्नपूर्णा, मेहंदी, आळू, बेल आदी औषधी वनस्पती आहेत. तर आंबा, नारळ, चिक्कू, फणस, पेरू, कवठ, केळी, शेवगा, लिंबू, रामफळ, सीताफळ, हनुमानफळ, पपई, चिंच, डाळिंब, अशा प्रकारची फळझाडे आहेत. गुलाब, शेवंती, कण्हेर, सोनचाफा, जास्वंद, लिली, फ्लावर, ब्रह्मकमळ ही फुलझाडे आरोग्य केंद्राच्या परिसरात गेल्यानंतर स्वाद देतात. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mangle's health center became a depot of herbal medicines