किसान संस्थेचा शाळेचा आंबा घरोघरी पोच

किसान संस्थेचा शाळेचा आंबा घरोघरी पोच

वाळवा- किसान शिक्षण संस्थेने जोपासलेल्या दीड हजार झाडांचे हापूस आंबे यंदाही घरोघरी पोहचले. हा आंबा शाळेचा आंबा म्हणून परिचित आहे. ग्रामीण भागात बुत्ती वाटपाची परंपरा आहे. त्याच तंत्राने या संस्थेचे आंबे गेल्या 65 वर्षांपासून न चुकता घरोघरी पोहोच होतात. विशेष म्हणजे यंदा 98 हजार रसाळ, मधूर आंबे उत्पादीत झाले होते. वाळवा व शिराळा तालुक्‍याच्या काही भागात हे आंबे वाटप केले जातात. देश पातळीवर एखाद्या शिक्षण संस्थेने राबवलेला हा उपक्रम अपवादात्मक आहे. 

येथील किसान शिक्षण संस्था क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी 1949 ला स्थापन केली. माळ भागात या संस्थेला प्रशस्त परिसर मिळाला आहे. या परिसरात जातीवंत हापूस आंब्याची झाडे लावण्यात आली आहेत. वयोमानानुसार वृध्द झालेली झाडे काढून पुन्हा त्याच ठिकाणी रत्नागिरी परिसरातून आणलेल्या आंबा झाडांची रोपे जोपासण्यात आली आहेत. संस्थेच्या परिसरात सध्या वाळव्यात 38 झाडे व संस्थेच्या सोनवडे (ता. शिराळा) येथील हुतात्मा नानकसिंग विद्यालयाच्या परिसरात 1100 झाडे आहेत. संस्थेने उभारलेल्या हुतात्मा साखर कारखान्याच्या परिसरात 279 आंबा झाडे आहेत. 

या झाडांच्या देखभालीसाठी कारखान्याच्या शेती विभागाने स्वतंत्र यंत्रणा उभारली आहे. मोहोर आल्यानंतर निपजलेल्या फळांची विशेष काळजी घेण्यात येते. मिळालेली आंबा फळे उच्च तंत्रज्ञानाने पिकवली जातात. त्यानंतर हुतात्मा साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात घरटी एक या प्रमाणे आंबे वाटप केले जाते. त्या शिवाय सोनवडे परिसरात काही गावात आंबे वाटप होतात. दरवर्षी घरोघरी पोहोचणारा हा आंबा " शाळेचा आंबा ' म्हणून प्रसिध्द आहे. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी ही अनोखी परंपरा कायम जोपासली आहे. त्यांच्या पश्‍चात संस्था त्याच ताकदीने हा अभिनव उपक्रम राबवत आहेत. 

" शिक्षण संस्थेने साखर कारखाना उभारला हे उदाहरण जगात दुर्मिळ आहे. तसेच शिक्षण संस्थेने उत्पादीत केलेले आंबे साडे सहा दशके न चुकता दरवर्षी घरोघरी वाटप करणे हे ही अद्‌भुत आहे.''

- वैभव नायकवडी
अध्यक्ष, किसान शिक्षण संस्था.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com