भुकटीच्या माध्यमातून सुडाचे राजकारण 

Manish Deshmukh
Manish Deshmukh

सोलापूर : जिल्ह्यात दररोज जवळपास 13 त 14 लाख लिटर दूधाचे संकलन केले जाते. एवढ्या मोठ्या दुधाची विक्री करणे शक्‍य होत नाही. त्यावर पर्याय म्हणून दूध भुकटी प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या प्रकल्पाबाबत तक्रार केल्याने तो रद्द झाला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून विरोधकांकडून केवळ सुडाचे राजकारण करून सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मत लोकमंगलचे संचालक मनीष देशमुख यांनी व्यक्त केले. 

शासनाने लोकमंगल मल्टिस्टेटचा 10 मेट्रिक टन दूध भुकटीचा प्रकल्प रद्द केला आहे. हा प्रकल्प मंजूर करून घेण्यासाठी संस्थेने बोगस कागदपत्रे दाखल केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अप्पाराव कोरे यांनी केला होता. त्याबाबत आज श्री. देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतचा खुलासा केला. प्रस्ताव सादर करताना जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकाऱ्यांकडे जो प्रस्ताव दाखल केला होता. त्या प्रस्तावासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडली होती. याची यादीच त्यांनी पत्रकार परिषदेत वाचून दाखविली. कोणत्याही प्रकारची बोगस कागदपत्रे दिली नसतानाही केवळ सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव असल्याचेही त्यांनी सांगितले. 

जिल्ह्यात अतिरिक्त होणाऱ्या दुधाची विल्हेवाट लावण्यासाठी दूध भुकटी प्रकल्पाची गरज आहे. अशाप्रकारचा एकही प्रकल्प जिल्ह्यात नाही. हा प्रकल्प झाला तर त्याचा निश्‍चितच सकारात्मक परिणाम दूध उत्पादक शेतकऱ्यांवर होणार आहे. मात्र, विरोधकांनी केवळ राजकारण करत या प्रकल्पाविषयी तक्रार केल्याचेही त्यांनी सांगितले. शासनाने जरी प्रकल्प रद्दचा आदेश दिला असला तरी पुन्हा नव्याने प्रस्ताव दाखल करण्यासही मुभा दिली आहे. त्यामुळे पुढील 15-20 दिवसात फेरप्रस्ताव दाखल करणार असल्याचेही श्री. देशमुख यांनी सांगितले. 

बोगस कागदपत्रे दिली कुणी? 
जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकाऱ्यांच्या चार जुलै 2015 च्या पत्रान्वये प्रस्ताव सादर करताना संस्थेने 17 प्रकारची कागदपत्रे दिली आहेत. परिपूर्ण कागदपत्रे असलेला हा प्रस्ताव त्यांनी प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी पुणे यांना दिला होता. मग, या प्रस्तावातील कागदपत्रे नेमकी बदलली कुणी हा संशोधनाचा विषय झाला आहे. याचा खोलात गेल्याशिवाय त्यातील सत्यता स्पष्ट होणार नाही. लोकमंगल मल्टीस्टेट याच्या खोलात जाणार का? याबाबत उत्सुकता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com